इंद्रधनुष्य
☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
समर्थ रामदासांना आठवताना त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रमप्राप्त ठरते, ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी ! होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला , त्यांची पत्नीच म्हणेन मी . आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही समर्थांना उपदेश करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वत: पेक्षा इतरांच्या घरात काय चाललंय याचीच जास्त चिंता असते. एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता, “त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्नमंडपात सोडलेल्या ?” – तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, ” मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हताे.” पण पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे हे खूपच कमी लोक करतात. इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे, त्यातीलच रामदासस्वामींच्या पत्नी या एक होत. आज त्यांना आठवणं त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते.
रामदासस्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले,” बाळ घरी चल.” तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली,” बाबा तुम्ही कन्यादान केले आहे, आता मी त्या घरात येणार नाही.” गंगाधरपंत, समर्थांचे वडीलबंधू, मुलीला म्हणाले,” मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन.” त्या वेळी ती मुलगी म्हणाली, ” दादा पाणिग्रहण झालेले नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.”
मग त्या मुलीने काय केले? ती चालत राहिली. गावे मागे पडली, नगरं मागे पडली, आणि तिला एक जंगल लागले. तिथे तिला झुडूपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली. एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत, त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरूवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे पाठवू लागली… सैन्यात भरती होण्यासाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपलीही फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही…. कोण पाठवतंय ही फौज? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं गनीम तर करत नसावा असं काही? आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी! त्यांनी आपल्या हेरखात्याला शोध घ्यायला सांगितलं.
हेरखात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते आहे. शिवाजी महाराज मग वेष पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला , गुळपाणी दिलं. तेव्हा तशी रीत होती.आजकालसारखे लोक कुणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत. शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायला, शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली… “काय तुमचा तो राजा ! का करता त्याच्यासाठी हे सगळं? ” असं खूप भलतेसलते शिवाजी महाराज बोलू लागले स्वत :विरुद्धच ! ते ऐकलं मात्र आणि त्या माऊलीने एकदम तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली ,”खबरदार” ती गरजली, ” शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर.” शिवाजी महाराजांनी ओळखलं ,काय पाणी आहे ते !आणि ते निघून गेले. दुसर्या दिवशी शिवाजी महाराज पूर्ण इतमामात त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला…. म्हणजे काय माहितीय का? तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असेच जणू शिवरायांना सांगायचं होतं . पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली,” हा तुम्हालाच शोभतो.”
समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येताहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसर्या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पातिव्रत्य होतं तिचं ! म्हणतो ना इतिहासाने काही लोकांवर खूप अन्याय केले.. त्यातीलच ही एक !
आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणार्या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कुणास ठावूक? जीवनात फ्लॅट व्हायला ? मुंबई कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात, पण त्याच वेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंबव्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे. अशावेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल. रशिया तुटला, झेकोस्लोवाकिया तुटला. इतरही खूप देशांचे तुकडे झाले. पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. कारण इथली कुटुंबव्यवस्था ! इथला शेजारपाजार !! माणसामाणसात असलेले संबंध. बघा एखाद्या शेजार्याची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो ,त्याला जेवण देतो ,सगळं काही पुरवतो. हे अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे हे उचितच ठरेल. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे, त्या काळात स्त्रीमुक्तीवादी संस्था नव्हत्या हे एका अर्थी बरं आहे . नाहीतर त्या…. त्या उर्मिलाला भेटल्या असत्या आणि नक्की सांगितलं असतं,’ घटस्फोट घे.’ लक्ष्मण आणि ऊर्मिलेचा चौदा वर्षांचा वियोग आहे .चेहरासुद्धा पाहिला नाही चौदा वर्षात ! म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं,” तुला त्यांनी टाकली चौदा वर्ष, घटस्फोट घे .” पातिव्रत्य ज्यांना कळत नाही, आदर्श जीवनमूल्यं काय आहेत हे ज्यांना कळत नाहीत ते असं काहीतरी बोलत असतात. पण असं झालं नाही . म्हणून तर रामायण, महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदासस्वामींच्या पत्नीतही दिसतो. त्यामुळे आज रामदास स्वामींना आठवताना त्या माऊलीला आठवणं ही उचित ठरेल.
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈