सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “सृजनोत्सव”… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आम्र वृक्षावरी
कोकीळ कूजन
सांगे पंचमात
वसंतागमन..
फुटता पालवी
नवा पर्ण भार
वृक्षांनी ल्यायला
जणू नटे नार…
जरी वात उष्ण
गंध मोगर्याचा
शीतलता देई
सुवास चाफ्याचा…
फुलला बहावा
सडा पीत रंगी
पलाश नटला
कसा अंगअंगी.,.
गुलमोहर हा
रक्तीमा चढला
ऐट पहा त्याची
वसंती रंगला…
कोकणचा राजा
केशरी रसाळ
हापुस पायरी
ऋतुत मधाळ
चैत्रगौर पूजा
पन्हे आंबाडाळ
पडदे वाळ्याचे
साराच सुकाळ..
गुंजारव करी
मधुप परागी
कृष्णप्रेमी राधा
रूसे अनुरागी
सृजन सृष्टीचे
मानवा सांगते
प्रीतीचा संवाद
वसंताशी बांधते..
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈