सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झेप… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर 

 

बीज रूजले वाढले, मऊ गर्भाचे अस्तर ,

खुडण्याच्या भीतीने का क्षणोक्षणी ती अस्वस्थ.

जन्मा आली लेक जरी, तरी जगणं दुष्कर ,

तूप वंशाच्या दिव्याला, हिला कोरडी भाकर. ||१||

 

लज्जेची नि पावित्र्याची, हिने राखायची चाड,

लांडग्यांच्या नजरेला,नको पडायला नख,

झाकायचे तन सारे, जरी गुदमरे श्वास,

डोक्यावर टांगलेली, बदनामीची तलवार. ||२||

 

वाढताना पित्याघरी, लेक परक्याचे धन,

वरदक्षिणा देऊनी, करायाचे कन्यादान.

माय उठता-बसता, घाली सासरचा धाक,

सांभाळीसी परंपरा, नको ओलांडू तू वेस. ||३||

 

सून सासरच्या घरी, दावणीला मूक गाय,

रांधा, वाढा, उष्टी काढा, हेच जीवनाचं सार.

शेज पतीची सांभाळी, वाढविण्या त्याचा वंश,

तोच कुंकवाचा धनी, त्याचा शब्दच प्रमाण. ||४||

 

कोसळल्या भिंती आता, खुले ज्ञानाचे कवाड,

कायद्याच्या कचाट्यात, भ्रूणहत्येचे राक्षस.

तिच्या कर्तृत्वाला आता, नाही क्षेत्राचे बंधन,

करितसे राज्यघटना, तिच्या हक्कांचे रक्षण. ||५||

 

समानतेच्या विचारा, रूजवू मुला-मुलींत,

हात घालणार नाही, कोणी,  द्रौपदीच्या निरीस.

मानवतेच्या धर्माला, सह्रदयतेची जोड,

ज्योत ‘तिच्या’ सन्मानाची, संस्काराने उजळवूयात.

 

© सुश्री प्रणिता खंडकर

सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments