श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी (अलका) ☆ प्रस्तुती श्री मेघःशाम सोनवणे ☆
गेल्या वर्षीची गोष्ट…
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अगदी तसंच महत्त्वाचं काम निघालं म्हणून अगदी टळटळीत उन्हातून दुपारी रविवार पेठ भागात गेले होते ….एरवी या गजबजलेल्या व्यापारी पेठेत जाणं नको वाटतं…
कोविडची भीती बरीच कमी झालेली. त्यामुळे नेहमीसारखंच वातावरण होतं. अरुंद रस्ता.. दुतर्फा लहानमोठी दुकानं.. टेम्पोमधून माल उतरवून घेण्याची घाई.. वाट काढत नागमोडी जाणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा.. वाहनांना चुकवत चालणारे पादचारी.. कर्कश हॉर्न…
एरवी अशा गदारोळात चालताना इकडे तिकडे न बघता मी वाहनाचा धक्का लागणार नाही ना या काळजीने स्वतःला सांभाळत चालते…. पण त्या दिवशी त्या गर्दीत सुद्धा डावीकडे असलेल्या एका साड्यांच्या दुकानाकडे लक्ष गेलं…
लहानसं दुकान. शोकेसमध्ये पाच सहा साड्यांचा सुरेख display. दाराजवळ हिरवीकंच साडी परिधान केलेली मॉडेल. तो रंग दुरून सुद्धा मनात भरला. साडी खरेदीचा विचार त्या क्षणापर्यंत मनात आला सुद्धा नव्हता, पण आपसूकच पावलं दुकानाकडे वळली.
पुतळ्याचा सुबक चेहरा, ओठांवर छानसं स्मितहास्य कोरलेलं. डौलदार हातावर जरीचा पदर लहरत होता. त्या हिरव्यागार रंगाच्या, बारीक जरी बॉर्डर आणि नाजूक बुट्टे असलेल्या आकर्षक साडीमुळे पुतळ्याला सोज्वळ सौंदर्य प्राप्त झालेलं…!
साडी हातात धरून पोत पाहिला. सिल्क बरं वाटलं. लहान बॉर्डर तर माझी आवडती. किंमत सुद्धा परवडण्यासारखी. आणि झाडाची पालवी तरुण होताना जो हिरवा रंग धारण करते त्या रंगाची सुरेख हिरवीगार छटा. म्हटलं मंगळागौर येईल तेव्हा सुनेच्या हातात हीच साडी ठेवावी. परत अशी सुरेख साडी मिळेलच असं नाही. आणि दूर रहायला गेल्यामुळे लक्ष्मी रोडवर सारखं येणं सुद्धा आताशा होत नाही… अशाच विचारांमध्ये दुकानात शिरले.
दुकानदार तरुण मुलगा होता. 27/28 वर्षांचा असेल. “अगदी सेम अशीच साडी दाखवा…” पुतळ्याकडे निर्देश करून त्याला म्हटलं…
“Sorry मॅडम… हरएक पीस अलग है.. लेकिन और साडी तो देखो….”
मी थोडी नाराजीने दुकानात गेले. त्याच्या व्यापारी कौशल्यानुसार त्याने ‘सकाळपासून एकही साडी विकली गेली नाही.. तुमच्या हातून भोवनी होऊ दे.. नवीनच स्टॉक आहे… discount पण मिळेल…’ अशी सर्व बडबड करत माझ्यापुढे साड्यांचा एक लहान ढीग टाकला. मला एकही साडी आवडली नाही. “नको” म्हणत मी दुकानातून बाहेर पडण्याची तयारी केली…
मघापर्यंत टळटळीत वाटणारी उन्हं अचानक खूप मंदावली होती. थोडा वाराही होता. अवेळी पावसाची शक्यता वाटत होती…
“आपको वही साडी पसंद आई है ना मॅडम? कल मै आपको वह साडी दे सकता हुं… कल आके लेके जाना प्लीज… क्षमा करे लेकिन आज नहीं दे सकते…”
दुसर्या दिवशी केवळ साडी साठी दूरवरून परत त्या भागात मी येणं शक्य नव्हतं. मुलगा नम्र होता म्हणून म्हटलं, “ठीक है, कोई बात नही, फिर कभी दुसरी एखाद साडी लेके जाऊन्गी।” म्हणत मी बाहेर पडले आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला लागलेच. तो मुलगा धावतच बाहेर आला आणि सांभाळून त्याने पुतळा दुकानात नेला.
पावसात भिजत जाणं शक्य नव्हतं म्हणून मीही परत दुकानात दाराजवळ थांबले. आता परत थोडा वेळ त्याची बडबड ऐकावी लागणार म्हणून माझा चेहरा थोडा त्रासिक झाला…
“कल चाहिये तो कुरिअर कर सकते है.. वह चार्जेस आप देना.. आज भागीदार कामकी वजहसे बाहर गया है.. कल उसको कुरिअर के लिये बोलता हूॅं।”
“मॉडेलची साडी नको. तुम्ही किती दिवस ती बाहेर ठेवत असाल. धूळ बसत असणारच. तसाच दुसरा पीस असला तरच मला हवा होता…”
“क्या है ना मॅडम, बिझिनेस छोटा है.. नया भी है.. तो बहुत ज्यादा stock नही रखते। Model की साडी दुकान बंद होनेके बादही रोज चेंज करते है… ताकी साडी खराब ना हो….” आणि मग पुतळ्याकडे निर्देश करून म्हणाला, “इनका भी सन्मान रखते है.. इनमे जान नही है तो क्या… नारी है… किसीकी नजर बुरी होती है इसलिये दुकान बंद होनेके बादही चेंज करते है।”
त्या शब्दांनी एकदम मनात काहीतरी चमकलं….असेच किंवा या अर्थाचे शब्द मी फार पूर्वी याच संदर्भात ऐकले आहेत…. स्मृतींचे दरवाजे उघडले… सर्व लख्ख आठवलं….
मी तेव्हा कॉलेजमध्ये अगदी पहिल्या दुसर्या वर्षात होते. माझी मामेबहीण माणिक मुंबईहून आमच्याकडे आली होती. लग्नाच्या वयाची, सुरेख, पदवीधर मुलगी…. योगायोगाने त्याच वेळी माझ्या आई वडिलांच्या घनिष्ठ ओळखीच्या एका डॉक्टरांचा मुलगा सुद्धा रत्नागिरीत आला होता. आईला माणिकसाठी ते स्थळ फार योग्य वाटलं होतं. त्यामुळे तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला…
माणिक तयार झाली आणि आमचे डोळे विस्फारले! मुळात माणिकला अनुपम सौंदर्याची देणगी होतीच…आणि त्यात तिने नेसलेल्या सुरेख साडीमुळे ते सौंदर्य आणखी खुललं होतं… त्या वेळी मैसूर जॉर्जेट साड्यांची फार फॅशन होती. केशरी रंग, लहान बॉर्डर आणि अंगभर नाजूक सोनेरी बुट्टे… माणिकचा केतकी वर्ण त्या केशरी साडीमध्ये तेजस्वी वाटत होता…
नंतर माणिकने सांगितलं की पदवीधर झाल्याचं बक्षीस म्हणून वडिलांनी… म्हणजे माझ्या मामाने तिला साडी घेण्यासाठी पैसे दिले…. माणिक दुकानात गेली तर आतमध्ये मॉडेल च्या अंगावर ही सुरेख केशरी साडी होती. माणिकला तीच साडी पसंत पडली. दुकान मोठं होतं. त्यांनी ढीगभर साड्या दाखवल्या. पण तिला दुसरी कुठलीच साडी आवडेना.
दुकानातल्या लोकांनी तिला सांगितलं की ती साडी आज मिळू शकत नाही. त्यासाठी परत दुसर्या दिवशी यावं लागेल. मुंबईतल्या अंतराचा आणि लोकल ट्रेन, बस यांच्या गर्दीचा विचार करता ते शक्य नव्हतं… तरुण वय…. डोळ्यांना पडलेली साडीची भूल यामुळे तिथून तिचा पायही निघत नव्हता…
दुकानाचे मालक प्रौढ गृहस्थ होते… ते तिला म्हणाले, “बेटा, ही साडी बदलण्याचा एक रिवाज आम्ही सांभाळतो. रोज दुकान बंद केल्यावर या मूर्तीच्या चारही बाजूनी पडदे लावून मग आम्ही मूर्तीची साडी बदलतो. दुकानातला बाकी स्टाफ तेव्हा काम आवरत असतो. साडी बदलणारे लोकही ठराविक दोघे आहेत. इतर कोणाच्या नजरेसमोर हे काम केलं जात नाही. ही दगडी मूर्ती आहे. पण देह तर स्त्री चा आहे ना… तिला योग्य मान देणं… तिचं लज्जारक्षण करणं आमचं कर्तव्य आहे !”
माणिक प्रभावित झाली… लगेच म्हणाली की “मी उद्या परत येऊन ही साडी घेऊन जाईन…”
आम्हाला तेव्हा त्यांचे विचार ऐकून फार भारी वाटलं होतं….
ते दुकान मुंबईत होतं… हे पुण्यात… ते गृहस्थ या मुलाचे आजोबा.. पणजोबा असण्याची शक्यता पण कमीच… पण तरीही जवळपास तशाच प्रसंगात आज इतक्या वर्षांनी मी त्याच अर्थाचे शब्द या तरुण मुलाच्या तोंडून ऐकत होते…. कदाचित साड्या विकण्याचा बिझिनेस करताना समस्त स्त्री वर्गाबद्दल आदर वाटावा यासाठी सुद्धा असे संस्कार करत असतील… ते प्रत्येक पिढीत झिरपत येत असतील… असं मला वाटून गेलं!
इतक्यात त्याचा बाहेर गेलेला भागीदार परत आला. पाऊस कमी झाला होता म्हणून मी निघण्याची तयारी केली. त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं.
भागीदार म्हणाला, “ऐसा एक अलग कलर का पीस है… वह दिखाया क्या?” त्याने कोणत्या कपाटात ती साडी आहे ते सांगितलं. दोघांनी मला आणखी दोन मिनिटं थांबून ती एक साडी बघण्याची कळकळीची विनंती केली. खरंच दुसर्या मिनिटाला तो मुलगा साडी घेऊन आला. तशीच सेम लहान बॉर्डर, तसेच नाजूक बुट्टे, तसाच पदर…. रंग मात्र जांभळा होता….
ही पण साडी चांगली होतीच…पण त्याहून चांगले होते ते त्या तरुण दुकानदाराचे विचार… त्याचे संस्कार.. त्याची स्त्री कडे पाहण्याची दृष्टी…
मी लगेच ती जांभळी साडी खरेदी केली… पैसे दिले.. आनंदाने दुकानातून बाहेर पडले… न ठरवता केलेली ही साडी खरेदी मला अविस्मरणीय वाटते!
एकीकडे रोज खून, बलात्कार, चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, याबद्दल च्या बातम्या वाचून निराशेने मनाचं शुष्क वाळवंट होत असताना हे असे तुरळक ओअसिस मनाला उभारी देतात!
लेखिका – सुश्री श्वेता कुळकर्णी (अलका)
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈