श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆  वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

“आजी! काय करताय?”

“काही नाही, थोडी सफाई करतेय पोरा!”

सामजिक सेवा संस्थेत हजर झाल्यापासुन या वृध्दाश्रमात माझी पाचवी फेरी. आमच्या संस्थे मार्फत काही खाण्या पिण्याची पाकिटे या वृध्दाश्रमात घेवुन यायचो. मी जेंव्हा कधी यायचो तेंव्हा या वृद्ध आजी खराटा घेवुन साफ सफाई करतांना दिसत. त्यांचे वय आणि कुबड निघालेल्या त्या शरीरला असं काम करून पाहताना मला मनातल्या मनांत खुपच दुःख होई. त्याच बरोबर त्यांना या परिस्थीतीत सोडणाऱ्या घराच्या सदस्यांबद्दल देखिल प्रचंड चीड येई. खरंच माणुसकी संपलीय असे वाटे.

माझं काम महिन्यातुन एकदा त्या वृध्दाश्रमात खाण्याची पाकिटे देणं. म्हणजे फक्त दहा- पंधरा मिनिटांचं काम, मात्र त्या दहा-पंधरा मिनिटांत मला जे अनुभवायला मिळायचे ते इतके दुःखद आणि वेदनादायी असायचे की, दोन-तीन दिवस मला नीट झोप देखिल लागत नसे. नेहमी  वृध्दाश्रमातील त्या वृद्ध आजी आजोबांचे दुःखी चेहरे दिसत.

आज नेहमी प्रमाणे मी आमच्या संस्थेमार्फत या महिन्यात दान म्हणून दिली जाणारी खाण्याची पाकिटे घेवुन त्या वृध्दाश्रमात माझ्या नेहमीच्या वेळेत गेलो. साधारणतः सकाळचे आठ वाजले असतील.आज देखिल त्या कुबड निघालेल्या आजी झाडु मारताना दिसल्या आणि काळजात चर्रर्रर्र झालं. मी सामान देवून त्या आजीकडे गेलो. “आजी! तुम्ही इतक्या म्हाताऱ्या असुन रोज झाडु का मारता?”

“काय करु पोरा, आता सवय झालीय!”

“आजी तुमच्या घरी कोण कोण आहेत?”

“पोरा! मला दोन मुलं आहेत. एक बाहेर देशात नोकरी करतो आणि दुसरा आपली पालिका आहे ना! त्यांत सगळ्यात मोठा साहेब आहे.”

“आजी! म्हणजे आयुक्त?”

“हो पोरा!”

“म्हणजे आपले समीर गायकवाड साहेब?”

“हो पोरा! तोच तो.”

आजीच्या त्या बोलण्याने मला धक्काच बसला. कारण गायकवाड साहेबांविषयी आजपर्यंत चांगले ऐकून होतो की, त्यांनी फार गरीबीतुन शिक्षण पुर्ण केले. ते खुप संस्कारी, इमानदार वगैरे वगैरे. शेवटी काय, तेही माणूसच.. भले ते चांगले असतील पण त्यांची पत्नी, ती खडूस असेल तर? पण तरिही आयुक्त असुन आपल्या आईला वृध्दाश्रमात ठेवणे हे कितपत योग्य आहे?

ते काही नाही! माझं पालिकेत संस्थेच्या कामानिमित्त जाणं होतेच, तेंव्हा साहेबांना विचारूच! असं मी मनोमन ठरवले. कारण त्या आजीची मला फार काळजी वाटायची.

येथील वृध्द आपल्याच मुलांविषयी काय-काय विचार करत असतील? किती स्वप्न, इच्छा, अपेक्षा ठेवल्या असतील त्यांनी त्यांच्या मुलांकडुन. आणि आज काय वाटत असेल त्यांना? मी विचार करता करता आश्रमाच्या गेट बाहेर पडलो. तोपर्यंत त्या आजी झाडु मारतच होत्या. माझ्या भावनिक काळजावर तो एक आणखी प्रहार होता.

आता तर मी मनाशीच ठाण मांडले की, या बाबत गायकवाड साहेबांना विचारायचेच!

दोन दिवसांनी मला संस्थेच्या कामानिमित्त पालिकेत जायची संधी मिळाली. मी आयुक्तांची भेट मागितली आणि मला ती लगेचच मिळाली, कारण आमची संस्था खुपच नावाजलेली संस्था होती.

“साहेब आत येवू?”

“हो! या बसा!!”

“सर! मी मोहन माळी, आधार सेवा संस्थे मार्फत आलोय!!”

“हा बोला! तुमची संस्था तर समाजात अतिशय चांगले काम करतेय!!  माळी साहेब काय करु शकतो मी आपल्यासाठी?”

“आयुक्त साहेबांचे हे इतके आदरयुक्त बोलणे ऐकून मी अगदी भारावून गेलो. इतके संस्कारी साहेब आपल्या स्वतः च्या आईच्या बाबतीत असं वागू शकतात? काय आणि कसं बोलावं काही सुचत नव्हतं.

“बोला माळी साहेब! काय करु शकतो मी आपल्या संस्थेसाठी?”

साहेबांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही साहेब जरा पर्सनल होतं !”

“पर्सनल?”

“हो साहेब! कसं सांगु तेच समजत नाही?”

“काय असेल ते स्पष्ट बोला माळी साहेब!”

“साहेब! मी आमच्या संस्थेमार्फत महिन्याच्या चार- पाच तारखेला सदानंद वृध्दाश्रमात जातो. तेथे एक आजी आहेत. त्या झाडु मारत असतात. एक दिवस मी त्यांची विचारपूस केली असता त्या आपल्या आई आहेत असं समजलं!”

माझ्या या बोलण्याने साहेब खुपच गंभीर झालेले दिसले. तश्याच गंभीर आवाजात ते म्हणाले. “काय सांगु माळी साहेब? खरंतर मलाही हे पटत नाही! पण माझा नाईलाज आहे हो!!”

“नाईलाज! कसला नाईलाज?”

“माळी साहेब प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात हो!”

“हो साहेब ! प्रत्येकाच्या अडचणी असतात हे खरं आहे, पण तुम्ही आयुक्त पदावर आहात. तुमच्या आईला एखाद्या नातेवाईकाकडे ठेऊ शकता. सरळ वृध्दाश्रमात?”

माझ्या या प्रश्नावर साहेब बराच विचार करून म्हणाले, “माळी साहेब, तुम्ही आश्रमात किती वेळ थांबता?”

“साधारणतः पंधरा- वीस मिनिटे फार तर अर्धा तास!”

“माळी साहेब, आता पुढच्या वेळेस अजुन एखाद दोन तास थांबा!”

“चालेल गायकवाड साहेब!”

मी साहेबांच्या केबिन बाहेर पडतांना विचार करत होतो की, साहेबांचा नक्की काय नाईलाज असेल? असो! पुढच्या वेळेस मी आश्रमात दुपार पर्यंत थांबतो. कदचित साहेबांचा नाईलाज समजेल!

जून महिन्याच्या पाच तारखेला मी समान घेवुन आश्रमात पोहोचलो. आजही नेहमीचं दृश्य. त्या आजी झाडु मारत होत्या. मी माझं काम आटोपून आजी जवळ गेलो. “कश्या आहात आजी?”

“मला कसली धाड भरलीय, मी बरी आहे पोरा! तु कसा आहेस?”

“मी पण बरा आहे आजी! काही दिवसांपूर्वी मी आपल्या मुलाला, म्हणजे गायकवाड साहेबांना भेटलो आणि तुमच्या विषयी बोललो!”

“असं! मग काय बोलला तो ?”

“काही विशेष नाही. ‘नाईलाज आहे’ असं म्हणाले!”

“वाटलंच मला, तो तसंच बोलणार! आणखी काही बोलला नाही ना?”

“नाही आजी!” मी साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आज थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला.

दहा- साडे दहा झाले असतील. आजी झाडु मारून थकलेल्या अवस्थेत झाडाखाली एका बाकड्यावर बसल्या होत्या. मी देखिल त्यांच्या बाजुला जावून बसलो. इतक्यात एक आलिशान गाडी वृध्दाश्रमात येतांना दिसली.

तसं ते नेहमीचं दृश्य होतं, कारण बहुतेक श्रीमंत घरची वृध्द मंडळी आश्रमात जास्त असतात. ज्यांची मुलं परदेशात नोकरीला वगैरे असतात. त्यांच्या अश्या गाड्या असतात.

आता मात्र त्या नेहमीच्या दृश्यात काहीसा बदल झालेला दिसला. ती आलिशान गाडी मी आजी सोबत बसलेल्या बाकड्याजवळ येवुन थांबली व गाडीचा मागचा दरवाजा उघडला तश्या आजी खराटा घेवूनच त्या आलिशान गाडीत बसल्या. ती गाडी तेथेच यु टर्न मारून निघुन गेली. ते पाहुन मी थक्क झालो. हा नक्की काय प्रकार आहे तो मात्र समजला नाही.

शेवटी न रहावून मी अधीक्षकांना भेटलो आणि हा काय प्रकार आहे ते विचारले.

“माळी साहेब! ह्या शांता आजी. आपल्या आयुक्त साहेबांच्या आई आहेत हे अगदी खरं आहे. मात्र त्या आपल्या सदानंद वृध्दाश्रमात राहत नाही तर आयुक्त साहेबांच्या, म्हणजे त्यांच्याच घरी अगदी सुखात आपल्या नातवंडां सोबत राहतात. आधी तर त्या नातवंडांना देखिल आणायच्या. मग त्यांना जाणीव झाली की, त्यामुळे येथील वृद्धांना त्यांच्या नातवंडांची आठवण येते म्हणुन आता आणत नाहीत.”

अधीक्षकांच्या या बोलण्याने मला धक्काच बसला, पण आता मात्र हा सुखद धक्का होता.

“म्हणजे मी समजलो नाही अधिक्षक साहेब?”

“माळी सर, त्याचं कसं आहे नां! शांताबाई आपल्या याच पालिकेत सफाई कामगार होत्या. त्या त्यांचे काम अतिशय इमाने इतबारे करीत. त्यांचे पती गिरणी कामगार होते. तेंव्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पतीची नोकरी अध्यात ना मध्यात होती. मात्र अश्या परिस्थीतीत शांताआजीने कुठूंबाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेवून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांत लहानग्याला विदेशात चांगली नोकरी मिळाली. तर मोठा म्हणजे आपले आयुक्त समीर गायकवाड साहेब.

शांताआजींनी सफाई कामगाराची नोकरी फक्त नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून केली. आणि आज सुद्दा त्यांनी ती सेवा सोडलेली नाही. म्हणून त्या रोज आठ ते दहा या वेळेत येवून साफ सफाई करतात फक्त सेवा म्हणून. खरंतर या वयात शांताआजीने काम करणे गायकवाड साहेबांना अजिबात पटत नाही. मात्र शांताआजींच्या हट्टापुढे त्यांचा देखिल नाईलाज होतो. पण त्यांना घ्यायला व सोडायला ते रोज गाडी मात्र पाठवतात.

त्यामुळे आयुक्त साहेब तर ग्रेट आहेतच पण शांताआजी त्या पेक्षाही  म्हणजे एकदम.. एकदम ग्रेट आहेत़.”

ओ! मला आणखीन एक सुखद धक्का. आता तर माझा देखिल हात आजीला सेल्यूट करण्यासाठी आपोआप कपाळा जवळ आला.

वृध्दाश्रमात आजी दिसल्या म्हणजे त्या येथेच राहत असतील असा गैरसमज झाल्यामुळे मी स्वतःशीच हसलो..

लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ,

मो 7350131480

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments