श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘भय…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆
का कुणास ठाऊक पण तिचे ते बोलणं ‘ रात गई, बात गई ‘ अशात मोडणारं नाही असा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. सारखा तोच विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने तो मनोमन अस्वस्थ ही झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे गजर न लावताही त्याला जाग आली. बाबा उठलेले होतेच. ती जागीच आहे असे त्याला वाटलं पण तिच्याशी काहीही न बोलता तो किचनमध्ये गेला आणि चहाचं पातेलं घेऊ लागला.
“ काय चिरंजीव, आज लवकर उठलाय ? … आणि हे काय चिरंजीव ? तुम्ही चक्क चहा ठेवताय ? अरे कशाला? मी करतो माझा चहा. तू जा झोप जा हवंतर. की चहा घेणार आहेस ? माझ्या हातचा फक्कड चहा घेऊन तर बघ.”
बाबांच्या या वाक्यावर तो हसून काहीतरी बोलून चहाचे आदण गॅसवर ठेवायला वळणार इतक्यात ती आत येत म्हणाली,,
“ हे हो काय? मला नाही का उठवायचं ? जाग आली पण पुन्हा जरा डोळा लागला माझा. सरका बाजूला.. मी असताना तुम्ही कुणी नाही हं काही काम करायचं ..“
“ नको. आज मी करतो…आणि माझ्या हातचा चहा तू पिऊन तर बघ… तुझ्याइतका चांगला नाही पण तसा बरा करतो हं मी चहा..”
“ खरंच, आज करू दे त्याला चहा. त्याच्या हातचा चहा पिऊन तर बघू ? “
तिने ‘ नाही हं बाबा..’ म्हणत त्याला बाजूला करून स्वतः चहा केला. बाबा ‘आपल्याला किती चांगली सून मिळालीय.. ‘ अशा विचारानं समाधानानं आणि अभिमानानं तिच्याकडे पहातच राहिले होते.
तो मात्र मनातून अस्वस्थ झाला होता. त्याला तिच्या वागण्याचं कोडे काही सुटेनासे झालं होतं .
बाबा चहा घेऊन फिरायला बाहेर पडले. ती बेडरूममध्ये गेली तरी तो बराच वेळ तिच्या वागण्या-बोलण्याचा विचार करीत तिथंच हॉल मध्ये बसून राहिला होता. तिने बेडरूममधूनच त्याला हाक मारली तसा तो दचकला आणि झटकन आत गेला.
“ कसला विचार करतोयस ?”
“ कसला नाही ..असाच बसलो होतो.”
“ असाच म्हणजे..? तुला सांगितलं होतं ना मी .. की मी नाही म्हणले तरी चहा तूच करायचास म्हणून.. मग..? “
“ पण तू कुठे करून दिलास ?… आणि अशी का वागतेस ? माझे काही चुकलंय काय? “
“ लक्षात ठेव..मला गृहीत धरण्याचा, माझ्यावर नवरेपणा गाजवण्याचा विचारही मनात आणू नकोस..”
“ अगं पण मी कधी नवरेपणा गाजवलाय ? मी तसा कधी वागलोय का तुझ्याशी..?”
“ कधी वागलोय का म्हणजे ? तसे वागायचा विचार आहे की काय ? तसा विचार मनात असेल तर तो काढून टाक मनातून. माझ्याजवळ चालणार नाही ते कधीच. आधीच सांगून ठेवतेय.. “
ती म्हणाली तसे तो काहीच न सुचून तिच्याकडे पहातच राहिला.
” काय रे तुला चारशे अठठ्यांणव कलम माहीत आहे ना ? नसेल तर माहीत करून घे लगेच. “
तो काहीसा दचकला. काहीच प्रत्युत्तर न देता, काहीही न बोलता तिच्याकडे फक्त पहातच राहिला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते.. त्याला चारशे आठठयांण्णव कलमच काय इत्तर अनेक गोष्टी या फक्त वाचून, ऐकूनच ठाऊक होत्या. तिच्या वाक्क्याने भयाची एक थंडगार लाट त्याच्या पूर्ण मनाला गिळून गेली. क्षणभर वाटले,सारं काही बाबांना सांगावं ..पण त्यांचा विश्वास बसेल आपल्या बोलण्यावर..? तिचे बेडरूम बाहेरचं वागणे, बोलणे असे होते की बाबाच काय जगातलं कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवण्याची सुतराम शक्यताच नव्हती.
बऱ्याचदा ती त्यांच्याशीही चांगली वागायची पण मधूनच कधीतरी कायदा स्त्रीच्या बाजूने असल्याची जाणीव ती त्याला करून द्यायची. ती कधी कसे वागेल याचा काहीच अंदाज त्याला यायचा नाही. ती अधूनमधून अशी का वागते ? का धमकावते ? याचं कोडं खूप विचार करूनही त्याला सुटत नव्हतं. आपण तिचा विश्वास संपादन करायला कमी पडलो काय? हा प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालत होता. त्याला तिचे ते वागणं सहन होत नव्हते आणि त्याला त्याबद्दल कुणाला सांगताही येत नव्हतं.. त्याचा आत्मविश्वासही दिवसेंदिवस कमी होत चालला होता.. तो मनोमन खचत चालला होता.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈