विविधा
☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆
(26 मार्च :स्मृतीदिनानिमित्त)
ग्रेस(फुल)कवी
मला आठवते, स्व आई मॉरिस कॉलेज नागपूरला मराठीत एम ए करीत होती. रोज आई घरी आली की, वैचारिक मेजवानी बाबांसह आम्हाला मिळत असे. ती बाबांचे संस्कृत श्लोक प्रसंगोचीत असत. त्यामुळे आई बाबांचे संवाद हे सुसंस्कारित उच्च दर्जाचे असत. कधी कधी बाबांचे वैदर्भीयन उच्चार, शब्द आईचे पुणेरी उच्चार अन् शब्द यांची जुगलबंदी होत असे. तो अनुभव देखील आम्हा भावंडांसाठी एक संस्कारच होता. बाबांचे लिखाण मी फारसे कधी वाचले नाही. अर्थात गणित, विज्ञान या चौकटीत त्यांच्या साहित्य विषयक जाणिवा किंचित बोथट झाल्या असाव्यात. पण आणीबाणीच्या तुरूंगवासात, गजाआड गणित विज्ञानाच्या चौकटी शिथील झाल्या.
आईला मॉरिस कॉलेज नागपुर येथे द. भि. कुलकर्णी, माणिक गोडघाटे शिकवित असत. कामठी येथून बस प्रवास करून नागपूरला येऊन शिक्षण घेणाऱ्या एका विवाहितेला विद्यार्थिनी म्हणून आपण शिकवतो, याचे ह्या दोघांना खूप अप्रूप होते. अर्थातच आईचे साहित्य विषयक आकलन, उत्तम होते तेंव्हापासून ग्रेस आणि दभि या नावांचे गारूड माझ्या मनावर आरूढ झाले. ग्रेस आईला म्हणत की, तुमचे माझे नाव एकसारखेच आहे.. हो! माझ्या आईचे नाव माणिकच होते. लग्नापूर्वीचे आईचे नाव हिरा होते, बाबांनी ते प्रथेपणे बदलून माणिक केले.. ( परंतु अमूल्य रत्न, हा अर्थ कायम राखूनच)
प्राध्यापक ग्रेस आणि दभी यांची आई आवडती विद्यार्थिनी होती.
तसे माझे शालेय वयच होते ते!
ट ला ट, री ला री जोडून, ओढून ताणून कविता (?) मी करत असे.. एकदा कां कविता लिहिण्याचा निर्णय झाला मी डाव्या बाजूला एकसारखे शब्द (शेखर, ढेकर, येणे, जाणे, गाणे, नाणे, बुध्द वृध्द, सिध्द, बद्ध इत्यादी ) लिहून ते कवितेचे धृपद म्हणून एक लांबलचक कविता (?) लिहित असे.
आईने त्याला बडबड गीता पेक्षा अधिक मानण्यास नकार दिला. कविता तर नाहीच नाही. “अरे, ही काय कविता आहे? ” तेंव्हापासून, काव्य प्रकार हा माझा प्रांत नाही, या निष्कर्षाप्रत मी आलो. माझे शब्द भांडार हे किती अपुरे आहे, हे मला जाणवले. कल्पनेची देखील मर्यादा मला जाणवली. एकदा असाच सॉनेट (सूनित) लिहिण्याचा मी घाट घातला. पण आशय ना विषय, ते आरंभ शौर्य मनातल्या मनातच विरले. प्राध्यापक कविवर्य माणिक गोडघाटे यांचे विषयी, आई भरभरून बोलत असे. तेंव्हा एक अगम्य, गूढ, दुर्बोध, शब्द बंबाळ, अनाकलनीय लिहिणारे ( आईच्या शब्दात, ग्रेसफुल लिहिणारे ग्रेस ) कवी ग्रेस !. ही प्रतिमा माझ्या मनात रुजली. त्यांच्या प्रतिमांची उकल माझ्या क्षमतेच्या परीघा बाहेरची आहे. अनेक समीक्षकांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिभेने ग्रेस यांच्या प्रतिमांची उकल केली.. ती देखील माझ्या आकलनाच्या पल्याड आहे.
पण त्यामुळे मी अधिकच या कवीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलो. आज ग्रेस यांचा स्मृतिदिन, शब्दांची उणीव रेषांनी भरून श्रध्दांजली अर्पण करण्याचा हा प्रयत्न !
© श्री मिलिंद रथकंठीवार
पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈