श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “ळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
ळ…
अगोदर ‘क’ बद्दल देखील मी काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पण ‘ळ’ बद्दल लिहिण्यासारखे काही वाटले ते “जोगळेकर” या आडनावाच्या एका व्यक्तींमुळे.
यांनी एक ऑडीओ व्हिडिओ क्लिप केली आहे. आणि त्यात “जो ग ळे क र” असा उच्चार करतांना “ळ” वर खास जोर दिला आहे. कारण त्यांचे काही मित्र त्यांना “जोगलेकर” अशी हाक मारत असत. ल आणि ळ यातला फरक आणि ळ चे महत्व सांगण्यासाठी त्यांची क्लिप.
ही क्लिप ऐकल्यावर मी पण या ळ च्या प्रेमळ विळख्यात अडकलो. विळखा घातल्यावर ळ समजतो.
ळ आणि ळ ची बाराखडी चा संबंध माझ्या जन्मापासून आहे, आणि शेवटपर्यंत तो राहणार आहे. अगदी जन्माला आल्यावर पहिला संबंध असतो तो नाळ शी. आणि मग सांगितले जाते ते असते बाळ.
माझ्या बालपणी छान, सुंदर, गुटगुटीत अशी विशेषणे मला नसली तरी मी काटकुळा देखील नव्हतो. घरच्यांना माझा लळा लागला होता.
बाळाच्या रंगावीषयी देखील बोलले जाते. मी गोरा नाही. त्यामुळे काळा, किंवा सावळा असाच आहे, किंवा उजळ नाही असेच म्हणतात. तिथेही ळ शी संबंध ठेवलाच.
नंतर टाळू भरणे, जाऊळ, पायात वाळा, खेळायला खुळखुळा, पांगुळ गाडा, असा ळ शी संबंध वाढवला. गोंधळ घातला तो आंघोळीचा. मी एकदा मीचकावला तो डोळा. याचेही कौतुक झाले. (डोळा मीचकवण्याचे कौतुक लहानपणीच असते हे लक्षात घ्या.)
पुढे संबंध आला तो शाळा आणि फळा यांच्याशी. फळा सुध्दा काळा. शाळेत मी अगदीच ढ गोळा नव्हतो हे नशीब. पण त्यामुळे एक (गो)ळा मात्र कमी झाला. शिकतांना सुध्दा कावळा, बगळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, चाफेकळी, करंगळी, तळ हात, मळ हात, न नळाचा, क कमळाचा, घ घड्याळाचा असेच शिकलो. यात ळ कशाचा हेच शिकायचे राहिले, पण ळ नकळत लक्षात आला. (तळहात, कमळ, घड्याळ यांचा आणि माझा संबंध किती काळापासून पासून आहे हे कळले.)
शाळा, महाविद्यालय असे करत धरली ती नोकरी. पण यातही कपाळावर कर्तृत्वाचा खास असा टिळा काही लागला नाही. पण कामात घोळ घातला नाही.
इतर कामात देखील मी नामानिराळा असतो. कामाचा कळवळा दाखवत नाही. किंवा काम करायला उतावळा देखील नसतो. म्हणूनच माझा उल्लेख कोणी(च) साधा भोळा असा करत नाही. पण मी आवळा देऊन कोहळा काढणारा नाही. किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील मी सोवळा नाही. तसाच मी आगळा वेगळा देखील नाही.
मी देवळात जातो, तसेच सोहळ्यात देखील जातो. सकाळ आणि संध्याकाळ नजरेत साठवतो. काही काळ मित्रांसोबत घालवतो, तर काही वेळ घरासाठी.
येतांना नाळ तोडून आलो, आणि जातांना गोतावळा सोडून जाणार आहे. म्हणून वर म्हटले ळ माझ्या जन्मापासून आहे आणि शेवटपर्यंत राहील.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈