प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
कवितेचा उत्सव
☆ एका आईचं मनोगत… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆
(श्रीराम यांच्यासह रामायणातील काही पात्रांवर सगळीकडे वेगवेगळ्या पध्दतीचं लिखाण होत आहे. अनेकजण विविध पोस्ट, व्हिडिओ पाठवतात.रामायणातील एक पात्र- माता कैकेयी. तिचं मनोगत एका कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. – सतीश शिरसाठ)
राज्याभिषेकाचा डाव मोडून,
श्रीरामांनी वनाचा रस्ता धरला
तेव्हा ;
लोकप्रेम आणि लोकक्षोभाच्या वणव्यात
मी होरपळले होते.
महाराजांची तडफड पाहून
मी कळवळले होते.
पण क्षणभरच !
आठवले होते,
एका घनघोर युध्दात
महाराजांची मी
ढाल झाले होते.
रामलक्ष्मणांच्या बाळलिलांनी
मी सुखावत होते.
आकाशातले तारे वेचून
त्यांना खेळायला मी देत होते.
उर्मिला आणि सीतेला
मी माहेर आणून दिले होते.
कसं सांगू ?
वासरासाठी गायही शिंगं उगारते;
आईपण जगताना,
राजधर्म मी विसरले होते.
श्रीरामाच्या वनगमनानं
नियतीनं मला खलनायिका केलं .
रामप्रासादात कुणाच्याही
डोळ्याला डोळा
मी भिडवू शकले नाही,
अगदी मंथरेच्याही !
तरीही,
नव्हता खेद त्याचा मला.
तू आलास,
तुझ्या बंधुप्रेमाच्या तेजाने-
दिपून गेले मी;
बाळा,
गुन्हेगार मी आयोध्येची,
महाराजांची आणि
इतिहासाची;
पण हे भविष्या,
तू तरी मला समजून घेशील का ?
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈