सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी… – लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
(20 मार्च…जागतिक चिमणी दीन — दिन नव्हे दीनच—)
माझी आवडती, कष्टकरी चिमणी बघता बघता निर्घर झाली, दिसेनाशी झाली— वळचणी रिकाम्या करून,अदृश्य झाली — मोबाईल टॉवरवाल्यांसाठी आता फक्त अस्थमॅटीक कबुतरं उरली…….
माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी —-
टुण टुणी चिमणी
टुण टुणी चिमणी
कुळ कुळ करडी
मणी मणी डोळ्यांनी
लुक लुक बघुनी
वण वण फिरुनी
कण कण वेचूनी
इलु इलु चोचीनी
टिप टिप टिपुनी
काडी काडी जोडुनी
खपू खपू लागुनी
मऊ खोपा बांधुनी
घर घर सजुनी
लुसलुशी पिल्लांना
मऊ किडा भरवी
टुण टुणी चिमणी
टुण टुणी चिमणी
रोज रोज दिसली
चिव चिव ऐकली
दाणे दाणे टाकुनी
घरी दारी नाचली
आणि काही वर्षांनी …
टॉवरल्या अंबरी
धूर धूर गगनी
रण रण पेटूनी
उष्ण उष्ण वाफुनी
जीर्ण जीर्ण झाडूली
शीर्ण शीर्ण पानुली
शीण शीण होऊनी
पळ पळ पळाली
दम दम दमली
झीज झीज झिजली
थक थक थकली
रित्या रित्या घरटी
तिळ तिळ रडली
पुन्हा घर शोधूनी
लांब लांब उडाली
सुन्न झाली बेघरी
नाही आली माघारी
टुण टुणी चिमणी
गुणी गुणी चिमणी
शोध शोध शोधली
पुन्हा नाहीं दिसली
सुन्यासुन्या वळचणी
सुकलेल्या आठवणी …
लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈