सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्‌याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा. 

महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने  ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.  

असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्‌स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.

कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.

‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ  देण्याचे वचन  निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला. 

माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्‌यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्‌यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो. 

असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’  हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.

 मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश  झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले. 

ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत. 

एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.

कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.

इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची  हार्टफेलने डेथ  झाली.’  हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून  आजतागायत सुटलेला नाही. 

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments