विविधा
☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर ☆
पिंपळ एकटा उभा
आप्पाजी गेले तेव्हा मी आठ नऊ वर्षांचा असेल ..त्यांच्या जाण्याच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यांनी मातीच्या मोठ्या भांड्यात लावलेला पिंपळ त्यांच्याशिवाय पोरका उभा होता. दर दिवशी मध्यान्ही ते त्याची तांब्याच्या छोट्या गडूतून बुडाशी पाणी ओतून पूजा करायचे.आप्पाजी गेल्यानंतर त्याला पोरकेपणाचे चटके बसायला लागले. त्याचा पुरुष भरा पेक्षाही उंच असलेला देह मलूलपणे उभा होता. मातीच्या भांड्यातील माती सुकत चालली होती. शेवटी वडिलांनी त्याला घराबाहेर लावायचे ठरवले. घराच्या मागच्या भागात असलेल्या मारुतीच्या देवळा समोर लावावे असे मी सुचवले. देवळाच्या बाजूला विहीर होती विहिरीच्या खालच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तीन हात खोल खड्डा खणला. मातीच्या भांड्यासह पिंपळाचे झाड उचलून त्या खड्ड्याजवळ आणले. भोवतालचे मातीचे भांडे फोडताच मातीत एकजीव झालेली एकमेकांना घट्ट धरून गुंतून असणारी त्याची मुळे मोकळी झाली. त्याला तसेच त्या खड्ड्यात सोडले आणि स्थानांतर होऊन एका जागी तो स्थिर झाला .
खड्ड्यात अजून थोडी माती ढकलली. त्याच्या खोडाभोवती वर्तुळाकृती छोटी नाली खोदली. विहिरीवर बाया सकाळ-संध्याकाळ पाणी भरायच्या. विहिरी भोवती पाणी सांडायचे .
विहिरीच्या उतारावरून एक छोटी नाली काढून पिंपळाच्या आळाशी जोडली. विहिरीच्या काठावर सांडलं उबडलं पाणी नालीतून थेट पिंपळाच्या आळ्यात पोहोचायचं. पिंपळाचे खोड हाताच्या मुठीत मावेल एवढे होते. त्याला गाय-बैल या कोणत्याही प्राण्याने अंग घासले तर मोडून जाईल या चिंतेनं त्याच्याभोवती बोराटीच्या काट्यांचे कुंपण केले. आता जोमाने वाढेल. आपल्यासोबत त्याची वाढही अनुभवता येईल…
त्याची वाढ अनुभवताना आपल्या बालवयाची किती वर्षे उलटून गेली कळलंच नाही.
आता त्याचे खोड दोन्ही हातांच्या पंजात मावण्यापेक्षाही मोठे झाले होते .त्याने आपली जागा कोणत्याही संरक्षणाशिवाय पक्की केली होती. काट्यांच्या बाह्य कुंपणाची गरजच नव्हती .
या आठ वर्षात विहिरही खोल गेली होती. आटत चालली होती .तिथे पाणी भरणाऱ्या बाया हातपंपा कडे वळल्या होत्या …त्याची मुळे खोलखोल गेली होती. आता त्याला बाहेरून मिळणाऱ्या पाण्याची गरज नव्हती. तो खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाला होता. त्यामुळे मीही निश्चिंत झालो होतो. तो सर्वांगानं फुलत होता .त्याच्या या फुलत्या वयात आपलेही फुलते वय मिसळत होते. त्याच्या उमलत्या तांबूस कोवळ्या पानांची लव वात्सल्य जाणीव फुलवत होती. कालांतराने पाने पोपटी होत गडद हिरवी होऊन सळसळत होती .त्या सळसळण्यातून आपण कितीदा मावळणारा चंद्र अनुभवला,कितीदा सूर्यास्त अनुभवला..त्याच्यापाठीमागे उमटलेले
सूर्यास्ताची फिके केशरी रंग गडद होई पर्यंत त्याचे सळसळणे अनुभवलेले.. बाल रंगात रंगविलेल्या चित्रांच्या जीर्ण कागदी स्मृतींच्या रंगछटा अजूनही जपून ठेवल्या आहेत.. आपण त्याच्यासोबत एकांत घालवलेले कितीतरी क्षण अंतर्मनाच्या तळ कप्प्यात साठवून ठेवले आहेत…..
…शेती माती जगवण्यास असमर्थ ठरली.. त्यामुळे पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागले ..
दररोजची त्याची भेट दोन तीन महिन्यांवर गेली. गावाला आलो की त्याला भेटल्याशिवाय आपली भेटच पूर्ण व्हायची नाही. घरासमोरच बाभूळबन, वाहणारी रायघोळ माय आणि आपला पिंपळ हेच खऱ्या अर्थाने आपलं जैव कुटुंब होतं बालपणात .त्यांची उराउरी भेट झाल्याशिवाय समाधान होत नव्हतं .त्यांच्या भेटीचा गंध उरात भरून पुढचे दोन-तीन महिने काढता यायचे .
पुढे पुढे बाभूळबन ,नदी यांच्या भेटीत त्रयस्थता जाणवायला लागली ..
त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची उदासीनता दिसायला लागली ..
ते पहिल्यासारखं मन उघडे करून वागत नव्हते. घर ही आपले खांदे पाडून बसलं होतं. त्याला कितीही डागडुजी केली तरी पहिल्यासारखं खुलत नव्हतं. पिंपळाचे मात्र तसे नव्हते, तो नव्या झळाळीने सळाळत होता. त्याची सळसळती भेट आपलं बालवय जागवून तीच सळसळ निर्माण करीत होती. आता त्याच्या खोडाने हाताच्या मिठी इतका आकार धारण केला होता. एका हाताच्या मुठीत मावणारा त्याचा आकार आणि आताचा ही त्याची वाढ स्तिमित करणारी होती .आपण त्याला घट्ट मिठी मारून कितीतरी वेळ बिलगलेलो.. त्याच्या खोडावर डोकं टेकवून त्याची सळसळ अनुभवलेली. पश्चिमेचे क्षितीज तेच आणि मावळणारा चंद्रही तोच .बाकी सर्व बदलत गेले. पिंपळ ,क्षितिज आणि चंद्र मात्र आपल्या अवस्थेत कायम असलेले .काहीही न बोलता त्याचा माझा संवाद सुरू व्हायचा …
……..गावावरून कोणी आलं की,आपली पिंपळाची चौकशी ठरलेली…
नेहमीप्रमाणे भावाकडे पिंपळा बद्दल बोलायला लागलो.. तेव्हा तो काही वेळ स्तब्ध राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याला पुन्हा विचारलं, त्यांनं जे सांगितलं ते ऐकून खूपच हादरलो ..शक्तिपात झाल्यासारखं वाटायला लागलं. पिंपळा शेजारी राहणाऱ्याने पिंपळाला मुळापासून तोडले होते. बालपणापासूनचा माझा जीवसखा एका मूर्ख माणसाच्या क्रूर कुर्हाडीचे घाव झेलून उन्मळला होता …..
आता गावात कसे जावे.. असे किती दिवस सुन्न गेले आपले ..
मोठा धीर धरून आपण गावात गेलेलो… घरा मागचे दार उघडून पिंपळाच्या जागेकडे पाहिले .बुडापाशी बुंध्याची निर्जीव खूण शिल्लक फक्त.. दार बंद केले डोळे डबडबले ..
त्याने पिंपळावर नाही घाव घातला.. आपल्या बालपणावर घातला….
ही तीव्र भळभळती जाणीव ओघळायला लागली..
आता गावात काय उरले..
बाभुळबनाची अनोळखी तिसरी पिढी म्हातारपण भोगत उभी आहे ,ती आपल्याला ओळखत नाही. वाहणार्या रायघोळ नदीमायचे रूप स्मृतिभ्रंश झालेल्या म्हातारी सारखे झालेले आहे ..
भावकीत घर ही हरवलं . गावात आता आपल्यासाठी उरलंच काय ही जाणीव देह मनाला कुरतडत राहते.
© श्री सुनील यावलीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈