श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “रिमोट कंट्रोल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
हा आपल्याला नवीन नाही. आपण सगळेच तो घरात वापरतो. फक्त त्यासाठी आपला टि.व्ही. त्याच्या रेंज मध्ये किंवा तो टी.व्हि.च्या रेंज मध्ये असावा लागतो. आपण हा टि.व्ही. समोर धरुनच उपयोगात आणतो. टी.व्ही. च्या मागच्या बाजूस धरुन याचा वापर करतो का?……. तर नाही.
पण एक असा रिमोट कंट्रोल आहे, जो मला समोरुन, बाजूने कंट्रोल तर करतोच, पण घरातील कोणत्याही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो मला कंट्रोल करतो. भिंतीचा अडथळा याला येत नाही. थोडक्यात रेंज म्हणजे सीमा याबाबत याची परिसीमा असते. तो मला कंट्रोल करतो तसेच माझ्या वागण्याबाबत मला ट्रोल देखील करतो. (ड्युअल फंक्शन)
हा चालता, बोलता, फिरता आहे. याचा सेल बदलायची गरज नसते. त्याच्या मनासारखे काही झाले तर तो आपोआपच चार्ज होतो………. आणि झाले नाही तरीही होतो…….. (फक्त फंक्शन मध्ये फरक जाणवतो.) रिमोट कंट्रोल ने आपण टि.व्ही. म्यूट करु शकतो. पण मनासारखे झाले नाही तर हा आपोआप चार्ज होतो तसाच कधी कधी म्यूट देखील होतो. हा एकमेव रिमोट कंट्रोल आहे, जो आपल्याला म्यूट करतोच, पण कधीकधी (म्हणजे बऱ्याचदा) तोच म्यूट होतो. (कारण सांगत नाही, उगाचच त्यावरून का….. रण पेटवायचे?……)
टि.व्ही. च्या रिमोट कंट्रोलवर तुम्हाला कोणतेही हावभाव दिसणार नाहीत. पण माझ्या या रिमोट कंट्रोलच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. (आणि आपल्याला दिसेपर्यंत ते तसेच असतात……. जमतंबुवा काही जणांना.) त्यामुळेच आपल्या बद्दल याच्या मनात सध्या काय भाव आहे? हे काहीवेळा समजते. काहीवेळा आपली ही भाव समजून घेण्याची हाव महागात पडते. (हाव भाव)
टि.व्ही. चा रिमोट कंट्रोल काही वेळा व्यवस्थित काम करत नसेल तर आपण त्यावर हलक्या हाताने किंवा जोरात चापट मारायचा प्रयत्न करतो. पण असा प्रयोग या माझ्या रिमोट कंट्रोलवर सफल होईलच हे सांगता येत नाही. (कारण तो सफल होण्यापेक्षा विफल होण्याची शक्यता जास्त असते. आणि फसणारे प्रयोग करण्यात काय मजा?)
त्याच्या आवाजावरून माझा (घरातला) आवाज कसा असावा हे आता मला आपोआप समजायला लागले आहे. त्याच्या आवाजाच्या चढ उतारावर माझ्या आवाजाची उतार चढ अवलंबून असते.
काय सांगता……… तुमच्या जवळ देखील या प्रकारचा आहे?………. मग जास्त काही सांगावे लागणार नाही. कंपनी वेगळी असली तरी फंक्शन साधारण सारखीच असतात.
आता तो समोरून, बाजूने आपल्याला कसा कंट्रोल करतो हे तुम्हालाही परिचित असेल. हा माझा रिमोट कंट्रोल मागे बसून सुध्दा मला कंट्रोल करतो.
कसा ते सांगतो. आम्ही दुचाकीवर जातांना हा मागे बसलेला असतो. आणि याचा एक हात असतो माझ्या खांद्यावर. मी कुठे बघतोय याचा (अचूक) अंदाज तो मागे बसून देखील घेत असतोच, पण मान डावी उजवीकडे झाली की काहीवेळा यांच्या खांद्यावरील हाताच्या बोटांची हालचाल सुरू होते. आणि त्या बोटांच्या दाबातील फरक जाणवतो. आणि अशा नुसत्या बोटांच्या हालचालींनी तो मागे बसून सुध्दा माझे फंक्शन कंट्रोल करतो. माझे इकडेतिकडे बघण्याने मागे बसून सुध्दा कधी कधी या रिमोट कंट्रोल मधून आवाज देखील येतो. तो आवाज अं, अहं, हं, असा थोडावेळ चालणारा पण मला ऐकू जाईलच इतका मोठा असतो. मग काय…….. नाईलाजाने मी काही वेळ समोर बघतो. बघावच लागतं.
अगोदर तो खांद्यावरचा हात प्रेमळ आधारासाठी असेल असाच माझा (गैर) समज होता. पण आता लक्षात आले तो मला कंट्रोल करण्यासाठी असतो.
एक मात्र खरं, कसाही असला तरी तो जवळ आणि सोबत असावा असे वाटते.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈