(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी की स्व. अण्णा भाऊ साठे जी के स्मृति दिवस पर एक रचना।स्व अण्णा भाऊ साठे जी को सादर नमन )
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्या निमित्ताने ही रचना लोकार्पण. . . . ! – विजय यशवंत सातपुते, पुणे
☆ अण्णा माझा. . . ! ☆
भाऊराव वालुबाई
पोटी जन्मे तुकाराम.
जाईबाई नी शंकर
भावंडांचे निजधाम.
वाटेगावी जन्मलेला
साहित्यिक तुका थोर
कथा, काव्य, पोवाड्यांचा
अभिजात आहे जोर. . . !
लोककला, वगनाट्ये
गवळण , बतावणी
गण, वग , प्रबोधन
केली समाज बांधणी. . . . !
वर्ग विग्रहाचे ज्ञान
समाजात रूजविले
लाल बावटा संस्थेने
क्रांतीसूर्य घडविले. . . !
पोटासाठी तुकाराम
जागोजागी करी काम
आयुष्याचे केले रान
नाही घेतला आराम. . . !
अण्णा नावे प्रिय झाला
रूढ झाला कथाकार.
दीन दलितांची दुःखे
त्यांचा झाला भाष्यकार. . . !
एकवीस कथाग्रंथ
कादंबरी एकतीस
कम्युनिस्ट विचाराने
प्रबोधन साधलेस.. . . . !
वगनाट्ये तेरा चौदा
अजूनही काळजात
विघातकी रूढींवर
केली लेखणीने मात. . . !
महाराष्ट्र चळवळ
गोवा मुक्तीचा संग्राम
वार्ताहर, कथाकार
विचारात राही ठाम. . . . . !
रशियन , फ्रेंच आणि
इंग्रजीत भाषांतर
शोषितांचे अंतरंग
भावनांचे वेषांतर. . . . !
रंगभूमी कलावंत
‘इप्टा’ चाही कार्यभार
स्वीकारला कर्तृत्वाने
जग भरात संचार.. . . . !
भुका आहे देश माझा
त्याची भाकरी होईन
शब्दा शब्दातून त्याला
नवे जीवन देईन. . . . !
हीच जाणिव ठेवून
अण्णा माझा साकारला
स्मृतीदिन आज त्याचा
आठवात आकारला. . . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.