सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ मोहोर फाल्गुनीचा ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
संपत न्याहरी करून उठतच होता आणि त्याचा मोबाईल वाजला. सुनंदाचा त्याच्या मोठी बहीणीचा फोन होता मिरजेहून. ‘संपत, अरं उद्या होळीला येतंय मी घरला, सांगलीला. तुझ्या दाजींचं जरा तिकडं काम हाय आणि लेकरांना पण दोन दिवस सुट्टी! म्हणलं चला मामाकडे जाऊ होळीला.’
‘ बरं बरं या की! आमी वाट बघतो मंग!’ असं म्हणून संपतनं फोन ठेवला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन म्हणून आईनं विचारलंच.’ ताई आणि दाजी येतात इथं उद्या होळीला, लेकरांसंगट! दाजींचं काय काम हाय म्हणं इकडं ‘, सांगताना नाराजीची एक आठी
संपतच्या कपाळावर नकळत उमटलीच.’ पोरांना बी सुट्ट्या हायेत दोन दिस. ‘
‘ अग, शालू, सारजा, सुनंदा येतेय ग उद्या होळीला! हौसाबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना आवाज दिला.
‘येऊ द्या की ‘, असं सासूला म्हणताना,
‘पुरणा-वरणाचा बेत कराय लागणार ‘, दोघी जावांची नेत्रपल्लवी झाली. ‘
खरंतर सुनंदा एकुलती एक लाडकी बहिण! दोन्ही वहिन्यादेखील, माहेरवाशिणीचं कोण कौतुक करायच्या. पण आता परिस्थितीच अशी झाली होती.
हौसाबाईंना तीन मुलं! थोरला शंकर, मग सुनंदा आणि धाकटा संपत. सुनंदाचं सासर मिरजेला. तिच्या घरी भरपूर शेतीवाडी होती. हळदीचा व्यापार जोरात होता. त्यांच्या मसाला कांडायच्या दोन गिरण्यापण होत्या. जावई सुभाष, एकुलता एक मुलगा, त्यामुळे पैशाला तोटा नव्हता. मंगेश आणि मीना, बारा आणि दहा वर्षांची दोन लेकरं आणि सासू-सासरे अशी मोजकी माणसं घरात!
हौसाबाईंच्या नवऱ्याचं बबनरावांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. कोणाच्यातरी पिसाळलेल्या खोंडानं धडक दिली. त्याचं शिंग छातीत खुपसलं. घाव वर्मी लागला. औषधोपचारात खूप पैसा खर्च झाला. मुंबईच्या मोठ्या इस्पितळात नेऊन शस्त्रक्रिया केली. पण कश्याचा उपयोगच झाला नाही.
शंकर आणि संपत घरची शेती बघायचे. सलग दोन वर्षे अवकाळी पाऊस आणि गारपीट… कापसाच्या शेतीची पार वाट लागली. हातातोंडाशी गाठ पडणं मुश्किल झालं. हे कमीच होतं म्हणून की काय कोरोनाच्या पहिल्या लाटेत शंकर सापडला. होता नव्हता तो सर्व पैसा पणाला लागला. शंकर काही वाचला नाही.
संपतच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.
नवरा आणि मुलगा, दोघांच्या पाठोपाठ झालेल्या मृत्यूने हौसाबाई अगदी खचून गेली होती. जमेल तसं थोडंफार काम रेटत होती.
कोरोनामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. मजूर नाही, त्यात हवामानही लहरी. उत्पन्न जवळजवळ शून्य आणि घरात सात माणसं! हौसाबाई, शंकरची बायको सारजा, पंधरा वर्षांची मुलगी सुनिता, संपत,त्याची बायको शालू आणि मुलगा श्रीपती! २ एकर जमीन पतपेढीकडे गहाण पडली, कर्जाचे हप्ते भरणंही कठीण झालेलं.
दहावी पास झालेली सुनिता पैश्याअभावी पुढचं शिक्षण घेऊ शकत नव्हती. आईसोबत परसदारी भाजीपाला पिकवून ती घरखर्चाला थोडा हातभार लावत होती. श्रीपती सातवीत शिकत होता. शालू घरकाम सांभाळून, आजकाल साडीच्या फाॅलबिडिंगचं काम करून चार पैसे जोडत होती.
या परिस्थितीत सणवार कसे साजरे करणार? म्हणून सुनंदाताईंच्या येण्याचा म्हणावा तसा आनंद कोणालाच झाला नव्हता. शिवाय माहेरवाशीण म्हटलं की तिला साडीचोळी, जावयाला कपडा, मुलांना काही-बाही घेणं आलंच.सुनंदाताईचा स्वभावही थोडा चिकित्सक! त्यामुळे त्यांना आवडेल अशी साडीही भारीतलीच घ्यायला हवी. सणासुदीला पाहुणे म्हणजे जेवायला चार पदार्थ करायला हवेत. हा जास्तीचा खर्च आत्ता या कुटुंबाला झेपणारा नव्हताच. तरी बरं जावई बुवांनी कोणत्या महाराजांची दिक्षा घेतल्यामुळे, शाकाहारी होते.
हौसाबाईंनाही या परिस्थितीची जाणीव होतीच. मग शालू आणि सारजाबरोबर बातचीत करून, शालूच्या माहेरहून भाऊबीजेला आलेला संपतसाठीचा सदरा जावयाला द्यायचं ठरलं. बाजारातल्या चोरडिया मारवाड्याकडून साडी उधारीवर आणायचं ठरलं. शालू त्यांच्याकडूनच फाॅलबिडिंगचं काम आणायची. पुरणपोळीच्या सामानासाठी किराणा उधारीवर आणावा लागणार होता. कसंतरी जुगाड करायचं झालं!
दुसर्या दिवशी संध्याकाळी शालू-सारजा पुरणपोळ्या करत असतानाच सुनंदाताई आणि कुटुंबीय अवतरले. होळीची पूजा, नैवेद्य होऊन जेवणंही
हसत-खेळत पार पडली. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्टी रंगल्या.पोरं एकमेकांत गुरफटली. सकाळी नाश्ता करून जावई कामासाठी रवाना झाले.
मग दोन्ही सुना आपल्या रोजच्या कामात गुंतल्या. माय-लेकीचं हितगुज सुरू झालं. दिराच्या उपचारासाठी शालूने आपलं स्त्रीधन सुद्धा गहाण ठेवलं होतं, घेलाशेठ सावकाराकडे. सारजाने आपले मोजके दोन -चार डाग होते, ते पण विकले होते. आडवळणाने हौसाबाईनी लेकीला परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या कानात ते शिरलं की नाही कोण जाणे!
दुपारची जेवणं झाली. जावई आले की निघायची गडबड होईल म्हणून शालूनं लगेच नणंदेची ओटी भरली.साडी दिली. मुलांना मिठाईचा पुडा दिला. इतक्यात जावई पण आले. तशी सुनंदाने आपली साडी हातात घेऊन निरखली आणि ती आईला म्हणाली, ‘ मला काही हा रंग आवडला नाही बाई!चल शालू, आपण ही साडी बदलून आणूया का? ह्यांच्याबरोबर गाडीतून जाऊन येऊ पटकन!’ बिचारी शालू काय बोलणार? संपतही गेला बरोबर.
चोरडियांच्या दुकान खूप मोठं होतं. सुनंदाने ती साडी परत केली. आणि त्याऐवजी आणखी चार साड्या खरेदी केल्या. शालू आणि संपतचं धाबं दणाणलं होतं. पण सुनंदाताईंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांनी आपल्या यजमानांना खुणेनंच विचारलं, ‘का हो ह्या घेऊ ना? .’ तुला पाहिजे तेवढ्या घे की! तुम्ही बघा निवांत साड्या , आम्ही दोघं जरा एका ठिकाणी जाऊन येतो. ‘असं म्हणून संपतला घेऊन सुभाषराव बाहेर पडले सुद्धा! मग ते येईपर्यंत सुनंदाताईंनी मुलांच्या विभागातही थोडी खरेदी केली. चोरडिया ओळखीचे असल्याने,’ हिशोबाचं नंतर पाहू’, असं शालूला म्हणाले. मग या दोघी दुकानाबाहेर आल्या आणि ते दोघंही गाडी घेऊन पोचलेच. मंडळी घरी परतली. हौसाबाई आणि सारजा माजघरात लवंडल्या होत्या, त्या उठून बसल्या. मुलंही माजघरात आली. शालू चहा ठेवायला आत जाणार तोच सुनंदाने तिला थांबवलं आणि जवळ बसवलं. पहिले आईला आणि दोन्ही वहिन्यांना एक एक साडी तिनं हातात ठेवली. मुलांना कपडे दिले. तेवढ्यात सुभाषराव आपली बॅग घेऊन तिथे आले. त्यातून एक मिठाईच्या खोक्यासारखा दिसणारा खोका काढून, त्यांनी शालूच्या हातात दिला. ‘अग, उघडून बघ तरी’, असं त्यांनी म्हटलं तसं तिनं संपतकडे तो उघडायला दिला. त्या खोक्यामध्ये शालूचे, घेलाशेठकडे गहाण ठेवलेले दागिने होते. सगळेजण चकित होऊन बघू लागले. सुभाषराव म्हणाले, ‘ सासूबाई , मुली आता कायद्यानं बापाच्या संपत्तीत वाटा मागतात. भावाकडून हक्काने माहेरपण वसूल करतात. मंग माहेरच्या मोठ्या खर्चाची , कर्जाची जिम्मेवारी पण त्यांनी घ्यायाला नको का?’ ‘मला यांनी हे समजावलं आणि पटलंबी! माझे भाऊ-वहिनी चिंतेत, हलाखीत जगत असताना, मला माझी ही वाटणीदेखील घेयाला पाहिजेच की!आईकडून समदं समजल्यावर मी फोन केला होता यांना! म्हणून घरी येतानाच हे घेलाशेठचे पैशे देऊन आले आणि चोरडियांचं बिल ऑन लाईन दिलंय यांनी!
हौसाबाईनी लेकीला मिठी मारली. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. संपत, सुभाषरावांच्या पायाशी वाकला होता. शालू आणि सारजाचे डोळेही तुडुंब भरले होते.
मंगेशने बाबांचा मोबाईल पळवून, होळीचे हे मनोहारी रंग पटापट फोटोत कैद केले होते आणि तो आता आपल्या भावंडांसोबत सेल्फी घेण्यात दंग होता.
(ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता सामाईक करू शकता.)
© सुश्री प्रणिता खंडकर
दिनांक.. ०६/०३/२०२३.
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈