श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ दु:ख… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : पादाकुलक)
चिरते छाती आभाळाची
लखलख तलवारीची धारा
कधि दुःखाची अक्षय ज्योती
दे तिमिरावर मौन पहारा !
बाण कुणाचा?रुतला कोठे ?
स्थलकालाचे चाले मंथन
यज्ञ संपला उरे तरीही
समिधांचे रे ज्वलंत क्रंदन !
परदु:खांची जळते नगरी
तरी वाजवी कुणि सारंगी
कुणि करुणाकर पसरुन बाहू
गगन फाटके ह्रदयी घेई !
दुःख भुकेचे अन् दास्याचे
खोल जखम ही भळभळणारी
भविष्यातले सूचक तांडव
मिणमिण पणती थरथरणारी !
नवीन दृष्टी नवीन सृष्टी
दुःख विलक्षण दुःख चिरंतन
मातीमधल्या भग्न नभाचे
असेच चाले शाश्वत चिंतन !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈