श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

सिंहगड एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला प्रवास करत होतो. बहुधा रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, आज दादरनंतर गाडीला बऱ्यापैकी कमी गर्दी होती. दादर स्टेशनलाच समोरच्या सीटवर एक चाळीस पंचेचाळीस वर्षांचा माणूस येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून एक general स्मितहास्य केलं, मीही प्रत्युत्तर दिलं. 

सर्वसाधारण दिसणारा माणूस, पण थोडासा खंगल्यासारखा दिसणारा. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता. प्रचंड खुश दिसत होता तो. अर्थात संपूर्ण अनोळखी माणसाला आपण कसं विचारणार, “का हो, एवढे खुश का आहात ?”

तो, डोळे मिटून, स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. आणि हळूहळू तो स्वतःच्याच भावविश्वात एवढा रममाण झाला की, त्याच्या नकळत, तो ते गाणे मोठ्याने म्हणू लागला. गाणं होतं – “होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.”

आजूबाजूचे सगळे आधी आश्चर्याने – कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. मग कोणीतरी त्याच्या सुरात सूर मिसळला, मग आणखी एकाने, आणखी एकाने. आम्ही सगळे “होंगे कामयाब” म्हणत होतो. अंगावर शहारा येत होता. प्रत्येकालाच सगळ्या ओळी ठाऊक होत्या असं नाही. पण त्याला ते गाणं पूर्ण पाठ होतं. जणू अनेक वर्षे तो हे गाणं म्हणत होता. त्याने ओळ म्हणायला सुरुवात केली, की बाकीचेही त्याला साथ देत होते. वातावरण नुसतं भारावून गेलं होतं. 

गाडीची गती हळू हळू कमी होऊ लागली. स्टेशन येत होतं. गाणं संपलं. त्याने डोळे उघडले. आम्ही सगळे उभे राहून गाणं म्हणत होतो. गाणं संपल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होतो.

तो अवघडला, संकोचला. मग तोही उठून उभा राहिला. रंगमंचावर, कलाकार अथवा जादूगार, प्रयोगानंतर जसा कुर्निसात करतात तसा त्याने सगळ्यांकडे बघत लवून कुर्निसात केला आणि म्हणाला, ” मी आज खूप खूश आहे. आत्ताच टाटा हॉस्पिटलमधून येत आहे. Today is my first cancer free day. आज माझा कॅन्सर पूर्णपणे निघून गेल्याचं, मी कॅन्सरवर मात केल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. आज मी माझ्या मुलाबाळांकडे, बायकोकडे गावाला परत जाणार आहे. Thank you all for joining in.”

गाण्यामागचं कारण समजल्यावर गाण्याची अर्थपूर्णता आणखीनच वाढली, त्यानं हेच गाणं का म्हटलं तेही कळलं. आमच्या टाळ्यांचा जोर वाढला, आणि कॅन्सरवर मात करणारा तो योध्दा ताठ मानेने गाडीतून उतरून निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments