मनमंजुषेतून
☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -1… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो. भटारखाना म्हणजे ‘दृष्टीआड सृष्टी’ असते, ती म्हण रेसिपी शोज्ना तंतोतंत लागू पडते! तिथे वेळ पडली तर काय काय करावं लागतं, हे सांगताहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर.
कोणत्याही भटारखान्यात डोकावून बघू नये.. दृष्टिआड सृष्टीच ठीक , असं म्हणतात पण ते काही फारसं खरं नाही. निदान माझ्याबाबतीत तर नाहीच नाही..माझ्या म्हणजे आमच्या ‘विष्णुजी की रसोई’ बाबतीत.. या ‘रसोई’च्या भटारखान्यात कोणीही जावं..खाण्याची इच्छा मरणार नाही तर तिथला खमंग दरवळ नक्कीच जठराग्नी प्रदीप्त करील!..रसोईचं ओपन किचन असतं..म्हणजे दृष्टी समोरच सृष्टी म्हणायला हरकत नाही! पण ही ‘दृष्टी आड सृष्टी’ असते ना ती म्हण रेसिपी शोज् ना तंतोतंत लागू पडते! तिथे वेळ पडली तर काय-काय करावं लागतं हे नंतर आठवलं तरी आमचं आम्हालाच आश्चर्य वाटतं!
गंमत म्हणून एक आठवण सांगतो, एका हिंदी सिनेमाच्या सेटवर गेलो होतो. मस्त झाडं-नदी वगरेचा सेट लावला होता. नदीत पाणीही होतं. शॉट ओके झाला. हिरो-हिरॉईन निघून गेले आणि मग मी माझ्या दिग्दर्शक मित्राबरोबर बोलत होतो. त्यालाही कोणी तरी बोलावलं म्हणून तोही गेला. इतक्या वेळ गजबजलेला सेट एकदम रिकामा झाला. तो सेट जवळून बघू या म्हणून मी गेलो, एका झाडाला हात लावला आणि ते झाड धाडकन खाली पडलं. माझं चांगलंच धाबं दणाणलं पण त्या सेटवाल्यांना स्वयं असावी. सेटवाला आला त्यानं खिळे वगरे ठोकून दोन मिनिटांत परत ते झाड होतं तसं उभं केलं. तेव्हा मला कुठे माहिती होतं की पुढे हे असं ‘चिटिंग’ आपल्यालाही करायचं आहे ते!
माझा पहिला अनुभव होता तो ‘क्रिम’ करण्याचा. सेटवर खूप लाइट्स, कॅमेरे असतात यामुळे वातावरणात उष्णता भरून राहिलेली असते. अशा वेळी एखाद्या पदार्थात जर क्रीमचा वापरायची वेळ आली तर ते वितळून जातं. मग प्रेक्षकांना दाखवणार काय? मग मी नकली क्रीम करायला शिकलो ते मदा, दूध, कॉर्नस्टार्च आणि तेलाचा वापर करून. पण एकदा तर क्रीम करण्यासाठी हे पदार्थच नव्हते. शूट झाल्यावर पुन्हा फोटोशूटही करायचं होतं म्हणजे क्रीमचा परिणाम फक्त शूटिंगपुरता साधला जाऊन उपयोगाचा नव्हता. आमचा फोटोग्राफर इतका हुशार निघाला की त्यानं क्रीम म्हणून चक्क फेव्हिकॉलचा वापर केला.
जाहिरातीमध्ये किंवा रेसिपी शोमध्ये छान वाफाळता पदार्थ दाखवतात. एकदा केलेला पदार्थ शॉट होईपर्यंत कसा वाफाळता राहील? मग त्यासाठी एक खास तंत्र असतं. टेबलावर मांडलेले पदार्थ असतील तर त्यात कापूस जळत ठेवतात किंवा एखाद्या पदार्थामध्ये कापसाचा जळता बोळा टाकतात. तुम्ही इडली किंवा वडा-सांबारची जाहिरात बघता ना त्या कशा मस्त फुगलेल्या वाफाळत्या असतात. त्या दोन इडल्यांमागे कापसाचा बोळा जळत असतो. पदार्थावर चकचकीतपणा आणण्यासाठी त्यावर ग्लिसरिन टाकतात. तांदळाची जाहिरात दाखवताना छान दाणेदार भात दाखवतात किंवा मग त्यांच्या भाज्या छान हिरव्यागार दिसतात..कोणत्याही गृहिणीला असा भात कसा करायचा? किंवा अशी हिरवीगार भाजी कशी ठेवायची, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नसेल. पण या भात किंवा भाज्या पूर्ण शिजवलेल्या नसतात तर फक्त उकळत्या पाण्यात घालून बाहेर काढतात.
अशा अनेक गमतीजमती आमचा कार्यक्रम ‘मेजवानी’च्या शूटिंगच्या वेळीही घडतात. सेट लागलेला असतो, चार-चार कॅमेरा सेटअप असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाला तीन/चार कधी कधी पाच एपिसोड पूर्ण करायचंही बंधन असतं. त्यामुळे सगळ्यांनाच खूप घाई असते. काय सामान हवंय याची मी आधीच यादी दिलेली असते. रेसिपी सांगितलेल्या असतात. तरीही आयत्या वेळी व्हायचा तो घोळ होतोच. चवीपुरतं मीठ घालू, असं मी बोलतो पण लक्षात येतं की तिथे मीठ ठेवलेलंच नाही. कॅमेरा तर ऑन आहे. आता जर शूट थांबवलं तर अर्धा तास वाया जाणार म्हणून मग मी काही तरी बोलत क्षण-दोन क्षण घालवतो आणि तितक्या वेळात त्या ओटय़ावर काय-काय पदार्थ आहेत त्यावर नजर टाकतो आणि मग मदा, तांदळाची पिठी जे काही हाती लागेल ते मीठ म्हणून घालतो. चाट मसाला, धणे-जिरे पावडर, तेल, तूप या पैकी कोणत्याही गोष्टी बाबत हे असं ‘चिट’ करावं लागतं. कधी कधी रेसिपी करताना ही ‘चिट’ करावं लागतं. दुधाची रबडी दाखवायची असेल तर दूध आटेपर्यंत थांबण्याइतका वेळ नसतो. मग दुधाला उकळी आली की भाजलेली कणिक दुधात भिजवून ती पेस्ट दुधाला लावतो. लगेच दूध रबडीसारखं दाट दिसू लागतं. थोडय़ा वेळात खास शूटिंगसाठीची रबडी तयार! आता ही रेसिपी वाचून घरी प्रयोग करू नका! घरी करताना दूध आटवूनच रबडी किंवा बासुंदी करा.
एकदा हिरव्यागार मिरच्या फोडणीला टाकण्याचा शॉट होता. मी तेलात मिरच्या टाकल्या आणि जो खखाणा उठला त्यानं मला चांगलाच ठसका लागला. शॉट वाया गेला. पुन्हा तेच घडलं. शेवटी मी लाँग शॉट घ्या म्हणून सुचवलं. पण दिग्दर्शकाला शॉटमध्ये धूरही हवा होता आणि मीही हवा होतो. आता हे दोन्ही साधायचं तर काही तरी युक्ती करायलाच हवी होती. मग सिमला मिरची बारीक चिरून घेतली. बियांसकट ती बारीक चिरलेली सिमला मिरची घातली. त्यामुळे दिग्र्शकाला हवा तसा शॉट मिळाला आणि मला ठसकाही आला नाही. ग्रेव्ही किंवा रश्शाला तेल सुटलेले दाखवण्यासाठी माझी नेहमीची युक्ती म्हणजे तेलात लाल तिखट कालवून, एक उकळी आली की ते वरून घालायचं! मस्त तेलाचा तवंग येतो.
कोणताही शेफ हा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञसुद्धा असतो! तंत्रज्ञ कारण तो अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं सहजी हाताळतो आणि वैज्ञानिक कारण त्याला पदार्थाच्या रसायनाच्या अनेक युक्त्या माहिती असतात. तुम्हाला माहितेय का की बिटाच्या रसात हळद घातली की केशरी रंग येतो ते! अनेक शेफ ही युक्ती अनेकदा वापरतात. अशा अजूनही युक्त्या आहेत.. बिटाच्या रसात काजूची पेस्ट मिसळा, जांभळा रंग तयार! सोडय़ात हळद मिसळली की लाल रंग येतो. पदार्थाला छान रंग येण्यासाठी शूटिंगच्या वेळी कृत्रिम रंग सर्रास वापरले जातात. पण नंतर चॅनलनं कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी आणली. माझ्या एका पदार्थासाठी केशराचा रंग हवा होता. आता चांगल्या प्रतीचं केशर आणता येईलच असं नाही. मग मी काही प्रयोग करून बघितले आणि त्यातला यशस्वी झालेला प्रयोग म्हणजे हळदीच्या पाण्यात लिंबू पिळून ते उकळलं आणि त्याचा अगदी केशरासारखा रंग आला. लिंबाचा विषय निघालाच आहे म्हणून एक गंमत आठवली. एकदा एका रेसिपीच्या वेळी मी वरून लिंबू पिळा असं म्हटलं आणि लिंबू पिळू लागलो तो पिळलंच जाईना. ते लिंबू कच्चं होतं. मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : शेफ विष्णू मनोहर
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈