श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🌸 सुगंधस्मृती… 🌸 श्री सुहास सोहोनी ☆ 

पहाट समयी विखरुन पडला

सडा अंगणी शुभ्र फुलांचा

प्राजक्ताचा परिमळ पसरे

स्मरण देतसे हरिनामाचा …

 

रामप्रहरी कानि सांगतो

सुगंध मोहक बकुल फुलांचा

राखुन ठेवी दोन घास रे

दुर्मिळ अतिथी आज यायचा …

 

चांफेकळि ये उतून मातुन

सायंकाळी सौेरभ फेकित

शुभंकरोती राहुन जाइल

विसरु नको रे घाईगर्दित …

 

परिमळ सांगे रातराणिचा

घालित रुंजी देइ आठवण

सखे सोबती अन् स्वकियांची

काळाने ज्या दिले देवपण …

 

हलके फुलके गंध सुवासिक

जाग्या करिती स्मृती शुचिर्भुत

गुलाब जाई जुइ चमेली

भरून घ्यावी नित्य ओंजळित …

 

उत्तररात्री गंध न उरती

स्मृतीहि अवघ्या विरून जाती

रिक्त मनाच्या पटलावरती

शून्य भावना केवळ उरती

 

सुगंधापरि ध्वनी स्पर्श अन्

दृष्टीहि चमको सतेजतेने

लाभ मिळो आगळा तयांचा

जीवन अवघे व्हावे सोने …

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

दि. १९-०३-२०२३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments