श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ इच्छापूर्ती…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मागील भागात आपण पाहिले– तुलसीदासजींनी “सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी॥“ ही चौपाई लिहिली. या प्रभृतींना संपूर्ण विश्वच श्रीराममय झाल्याचे जाणवत होते, तेव्हा कुठे त्यांना श्रीरामचंद्रप्रभू भेटले. यावरून तुलसीदासजींची एक गंमतीशीर गोष्ट आठवलीय. ऐका तर. – आता इथून पुढे)

ही चौपाई लिहिल्यानंतर तुलसीदासजी विश्रांती घेण्यासाठी घराकडे निघाले होते. रस्त्यात त्यांना एक मुलगा भेटला आणि म्हणाला, “अहो, महात्मा या रस्त्याने जाऊ नका. एक उधळलेला बैल लोकांना ढुशी मारत हिंडतोय. तुम्ही तर त्या रस्त्याने मुळीच जाऊ नका कारण तुम्ही लाल वस्त्रे धारण केली आहेत. 

तुलसीदासजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ‘मला माहीत आहे. सर्वांच्यात श्रीराम आहेत. मी त्या बैलासमोर हात जोडेन आणि निघून जाईन.’  

तुलसीदासजी जसे पुढे गेले तसे उधळलेल्या त्या बैलाने त्यांना जोरदार टक्कर मारली आणि ते धाडकन खाली पडले. त्यानंतर तुलसीदासजी घरी जायच्याऐवजी सरळ रामचरितमानस जिथे बसून लिहित असत त्या ठिकाणी गेले. त्यांनी नुकतीच लिहिलेली ती चौपाई काढून फाडून टाकणारच होते, तितक्यात मारूतीराया प्रकट झाले आणि म्हणाले,    

“श्रीमान, हे काय करताहात?”

तुलसीदासजी खूप संतापलेले होते. त्यांनी ती चौपाई कशी चुकीची आहे, हे सांगण्यासाठी नुकत्याच घडलेल्या घटनेचा वृत्तांत मारूतीरायांना कथन केला.

मारूतीराया स्मित हास्य करत म्हणाले, “श्रीमान, चौपाई तर शंभर टक्के योग्य आहे. त्यात चुकीचं काहीच नाही. आपण त्या बैलामधे श्रीरामांना तर पाहिलंत. परंतु बालकाच्या रूपात तुमचा बचाव करण्यासाठी आले होते त्या श्रीरामांना मात्र तुम्ही पाहिलं नाहीत.”  हे ऐकताच तुलसीदासजींनी मारूतीरायांना मिठी मारली.

आपणही जीवनातील लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि एखाद्या मोठ्या समस्येला बळी पडत असतो. असो.”

बुवा पाणी पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात समोरचे आजोबा पुन्हा बोलले, “म्हणजे श्रीरामप्रभू हे सामान्य भक्तांना भेटत न्हाईत. फक्त मोठ्या भक्तानांच भेटतात असं म्हणायचं.”

“आजोबा, विसरलात काय? अहो शबरी कोण होती? या श्रीरामानेच शबरीला कीर्तीच्या शिखरावर पोहोचवलं आहे. मागासलेल्या समाजातील त्या वृद्ध विधवेने उष्टी करून दिलेली बोरं, हसतहसत चाखणारा हा श्रीराम जगातल्या कोणत्याही सभ्यतेत तुम्हाला भेटणार नाही. एका सामान्य नावाड्याचा मित्र झालेल्या श्रीरामाची गोष्ट सांगतो. ऐका.

सुमंतांचा निरोप घेऊन श्रीरामप्रभू वनवासाला जाण्यासाठी शरयू नदीच्या काठावर पोहोचले. श्रीरामांना पाहताच त्या नावाड्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. श्रीरामप्रभू जवळ येताच त्या नावाड्याच्या मुखातून शब्द उमटले, “यावे प्रभू ! किती वेळ लावलात इथे यायला? किती युगांपासून मी तुमची वाट पाहतोय.”

श्रीरामांनी स्मितहास्य केलं. अंतर्यामीच ते. श्रीराम शांतपणे म्हणाले, ‘मित्रा, आम्हाला पलीकडच्या तीरावर सोड. आज हा राम तुझ्याकडे एक याचक होऊन आला आहे.’      

नावाड्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले, तो कसेबसे म्हणाला, ‘महाप्रभू, तुम्ही येणार आहात हे मला माहीत होतं. मीच नव्हे तर ही धरती, ही सृष्टी, हा शरयू नदीचा तट कितीतरी युगांपासून याच क्षणाची प्रतिक्षा करत आहोत. हा सर्वात महान क्षण आहे. अखिल जगातील प्राणीमात्रांना जे भवसागर पार करवतात, ते प्रभू आज एका निर्धन नावाड्याकडे दुसऱ्या तीरावर पोहोचवा म्हणून याचना करत आहेत.’

श्रीरामांना नावाड्याची भावविवश स्थिती कळली. त्याची मनस्थिती निवळावी म्हणून ते म्हणाले, “आज तुझी वेळ आहे मित्रा ! आज तूच आमचा तारणहार आहेस. चल, आम्हाला त्या तीरावर पोहोचव.”

नावाड्याने श्रीरामाकडे मोठ्या भक्तिभावानं पाहिलं आणि म्हणाला, “प्रभू, तुम्ही मला वरचेवर मित्र म्हणून का संबोधन करताहात? मी तर तुमचा सेवक आहे.”

श्रीराम गंभीरपणे म्हणाले, “एखाद्याने आपल्या जीवनात लहानसेच का होईना उपकार केले असेल तर मरेपर्यंत तो आपला मित्रच असतो. मित्रा! तू तर आम्हाला नदीच्या दुसऱ्या तीरावर सोडणार आहेस. हा राम, हे उपकार कधीच विसरू शकत नाही. या रामासाठी तू जन्मभर मित्रच राहशील. आता त्वरा कर….”

नावाड्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले. तो म्हणाला, “महाप्रभू ! एवढी कसली घाई आहे? आधी त्याचं मोल तरी ठरवू द्या. आयुष्यभर नाव वल्हवत एका वेळेच्या अन्नाची तरतूद करत राहिलो. आज एका फेरीतच मला सात जन्म पुरेल इतकी कमवायची संधी मिळाली आहे. बोला द्याल ना? तुम्ही हो म्हणत असाल तर नाव पाण्यात सोडतो…”

“मित्रा, जे पाहिजे ते माग ! मात्र हा राम आज राजमहालातून बाहेर पडताना काहीही घेऊन निघालेला नाही. परंतु मी तुला तुझ्या इच्छापूर्तीचे वचन देतो. माग, काय मागायचं आहे ते…”

नावाड्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले नाहीत. परंतु त्याचे डोळे स्पष्टपणे सगळंच सांगत होते, “फार काही नको प्रभू!  बस्स. मी आता जी सेवा तुम्हाला देणार आहे, तीच सेवा मला परत करून टाका. इथे मी तुम्हाला नदी पार करवतो आहे. तुम्ही त्यावेळी मला भवसागर पार करवून द्या.” 

श्रीरामाने सीतेकडे क्षणभर पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. नावाड्याला त्याचं उत्तर मिळालं. तो त्या क्षणाचं सोनं करू इच्छित होता. तो हळूच बोलला, ” प्रभू ! मी असं ऐकलं आहे की तुमच्या चरणस्पर्शाने शिळादेखील स्त्रीमध्ये परिवर्तित होते म्हणून. मग माझ्या लाकड़ी नावेचं काय होईल? आधीच माझी बायको डोके खात असते. जर ही नावसुद्धा स्त्री झाली तर ह्या मी दोघींना कसं सांभाळू? थांबा, मी एका लाकडी पात्रातून पाणी आणून तुमच्या चरणांना स्पर्श करवून पाहतो. लाकडावरसुद्धा शिळेसारखा प्रभाव पडतो का नाही ते कळेल…”

नावाडी धावत धावत जाऊन घरी पोहोचला. लाकडाच्या पात्रात पाणी भरून आणलं. जसं तो रामाचे पाय मनोभावे धूत होता, तसं त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. दीर्घ प्रतिक्षेनंतर नावाड्याची कित्येक जन्मांची तपश्चर्या फळाला आली होती. तो भावुक झाला. अश्रूंवाटे तो निर्मळ, निर्विकार होऊन गेला.

त्याने लाकडी पात्राला स्वत:च्या कपाळाला लावलं. नाव प्रवाहात सोडली. सगळेजण नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन नावेतून उतरले. तत्क्षणी श्रीरामांच्या मनात चाललेली चलबिचल, अगतिकता सीतामाईंच्या लक्षात आली.

सीतामाईंनी त्वरित स्वत:च्या बोटातील अंगठी काढली आणि नावाड्याला भेट म्हणून देऊ केली. “माई, तुम्ही वनवास संपवून आल्यानंतर जे काही भेट म्हणून द्याल ते मी आनंदाने स्वीकारेन.” असं म्हणत त्याने अंगठी घेण्यास नकार दिला.

या प्रसंगातून श्रीराम आणि सीतामाई या दोघांतलं सामंजस्य प्रकट होत होतं. एकमेकांवर गाढ प्रेम असेल तर तिथे शब्दांची आवश्यकता नसते. एकमेकांच्या भावना समजून घ्यायला डोळ्यांची भाषाच पुरेशी असते.”

कीर्तनाची सांगता करताना बुवा म्हणाले, “आपण सर्वचजण श्रीरामभक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं एकमेकांशी जोडले गेलो आहोत. प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा प्रयत्न करूया. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला, श्रीराम जयराम, जय जय राम !!”

कार्यक्रमानंतर राघव आणि जानकीचे डोळे मात्र त्या मोटारसायकलवरच्या दोघा युवकांना शोधत होते. परंतु ते दोघे कुठेच दिसले नाहीत.

“कोण जाणे, राघवाची इच्छापूर्ती करण्यासाठी साक्षात श्रीरामचंद्रप्रभू आणि लक्ष्मण हे दोघे बंधू तर आपल्या मदतीला धावून आले नसतील ना?”  हा विचार जानकीच्या डोक्यात घोळत होता. राघवची कार मात्र कोल्हापूरकडे स्वच्छंदपणे सुसाट निघाली होती.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments