डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 64 – मातृभूमीचे पहिले दर्शन डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिले,पाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिले,त्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला.वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढी,परंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार ‘लिओ नार्दो द व्हिंची’ च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुधा मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्व्मिजिना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद,आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पाती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्व्गता प्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतं,प्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले

रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते ,स्वामीजी, आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावट,प्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तामिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता.हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापाऊण सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्व जन सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री, अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

त्यानंतर श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर  अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र,३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास … 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments