सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा स्वतःच स्वतःशी रँपीड फायर.गेम खेळत बसले होते. खूप मजा येते ह्या खेळात. स्वतःच्या मनाच्या आतल्या कप्प्यात दडलेल्या गोष्टी अलगद बाहेर येतात, एकदम मोकळं वाटतं आणि मुख्य म्हणजे काही वेळी खूप विचार करुनही न मिळणारी उत्तरं अचानक गवसतात.कधीकधी पटकन उत्तरं बाहेर पडण्याच्या नादात सगळ्यात जास्त महत्वाचं उत्तर राहूनच गेलं ह्याची जाणीव पण अनुभवांतून येते.

ह्या गेम मध्ये मी पहिला प्रश्न केला, सुखं म्हणजे नेमकं काय ? त्यावर चटकन उत्तरं आलं आनंदाची परिसीमा. मग दुसरा प्रश्न, हे नेमके कशामुळे मिळतं ? त्यावर माझं उत्स्फूर्तपणे आलेलं उत्तर आर्थिक स्थैर्य,मनासारख्या घडणाऱ्या घटना.

नंतर लगेच आलेल्या अनुभवाने आपल्या उत्तराचा क्रम चुकलायं हे दाखवून दिलं आणि अनुभवांमुळे लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य. सगळ्या सुखकारक गोष्टींची उपलब्धी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या गोष्टींचा उपभोग आणि हा उपभोग आपण आरोग्यात स्थैर्य असेल तरच घेऊ शकतो. खरंच सगळ्या म्हणी ह्या कमी शब्दांत संपूर्ण आशय देणा-या असतात हे “सर सलामत तो पगडी पचास ” ह्या म्हणीवरुन लक्षात येतच. सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात. खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

सोमवारी तसं सकाळपासूनच फ्रेश वाटत नव्हतं परंतु कामाला लागलं की आजारपण विसरायला होतं हा नित्य अनुभव त्यामुळे सगळं आवरून बँकेला पळाले मात्र दुपारी सणसणून बँकेतच ताप भरला.तशीच सुट्टी मागून साक्षात आम्हा बडनेरवासियांसाठी व आजुबाजूच्या गावांसाठी धन्वंतरीचे रुप असलेल्या डॉ. राठी ह्यांच्या दवाखान्यात गेले त्यांनी औषधे देऊन कमीतकमी दोन तीन दिवस सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.न ऐकल्यास अँडमिट करुन घेण्याचा सज्जड दम दिल्यावर  आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेणे ओघानेच आले.

औषधांबरोबरच सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागेलचं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments