कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 171 – विजय साहित्य
☆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – दिलाची सलामी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
बसा सावलीला, जिवा शांतवाया
शिवारात माझ्या, रूजे बापमाया .
परी बापमाया, कशी आकळेना ?
दिठीला दिठीची, मिठी सोडवेना.
☆
घरे चंद्रमौळी, तुझ्या काळजाची
तिथे माय माझी, तुला साथ द्याची
मनाच्या शिवारी ,सुगी आसवांची
तिथे सांधली तू, मने माणसांची.
☆
जरी दुःख आले, कुणा गांजवाया
सुखे बाप धावे , तया घालवाया
किती भांडलो ते, क्षणी आठवेना
परी याद त्याची, झणी सांगवेना.
☆
कुणा भोवलेली , कुणी भोगलेली
सदा ती गरीबी, शिरी खोवलेली .
कधी ऊत नाही, कधी मात नाही
शिळ्या भाकरीची, कधी लाज नाही.
☆
कधी साहिली ना , कुणाची गुलामी
झुके नित्य माथा, सदा रामनामी .
सणाला सुगीला , तुझा देह राबे
तरी सावकारी, असे पाश मागे .
☆
जरी वाहिली रे , नदी आसवांची
तिथे नाव येई , तुझ्या आठवांची
गरीबीतही तू , दिले सौख्य नामी
तुला बापराजा , दिलाची सलामी.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈