सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ सय ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
मन पाखरू पाखरू,
आजोळास धावे!
मोगऱ्याच्या सुगंधात,
मनोमनी न्हाऊन निघे!
आठवणींचा गंध,
मनात दरवळतो!
बालपणी चे दिवस,
पुन्हा मनी जागवतो!
मामाच्या अंगणात,
जाई जुई चा वेल,
शुभ्र नाजूक फुलांचा,
सडा घालीत दिसेल!
बेळगावी लाल माती,
गंध फुलांना देते !
मनाच्या परसात,
एकेक फूल उमलते !
जास्वंदीचे रंग,
मना लोभवती !
सोनटक्क्याचा गंध,
दरवळे सभोवती !
आजोळाची वाट ,
माझ्या मनात रुजलेली!
कधी मिळेल विसावा,
भेटीस मी आतुरली !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈