सौ. विद्या पराडकर
कवितेचा उत्सव
☆ ॥हे शिवसुंदर समरशालिनी॥ ☆ सौ. विद्या पराडकर ☆
हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माउली
युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाऊली धृ ☘️
मराठमोळे वीर मावळे, पराक्रमाची शर्थ करी
सह्याद्रीचे कडे कपारी जय महादेव गर्जना करी
अत्याचाराच्या नाशाकरता सुलतान शाहीची मोडली कंबर
जिजाबाई स्वराज्य पूर्ती करता जणू
शिवबाने जिंकिले अंबर ☘️
अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे
बांधुनी कंकण
तोरणा जिंकून बांधले तोरण
परचक्रापासुन रयतेचे केले रक्षण
स्वधर्माचे पालन करुनी सुलतान शाहीला दिधले उत्तर ☘️
अस्मानी संकटाशी सामना देवुन
एका एका शत्रुशी गनिमी काव्याने लढून
नरसिंहानी प्राणांचे बलिदान देऊन
स्वराज्याची स्थापना करुन केला शिवबाचा छत्रपती महान☘️
शक्तीस्थान तू सामर्थ्याचे,विक्रम वैराग्याचे
धर्म व राजकारण समरसतेचे
वरदान मिळे तुज, समर्थ तुकयाचे
युगपुरुष असे तू अजरामर राजा ☘️
धन्य धन्य हा संभाजी राजा
स्वधर्माचा मूर्तिमंत पुतळा
मृत्युने घातली वीरश्रींची माळा
स्वधर्म पाळला ऐसा राजा☘️
अंलकार ज्याचे पैठण, पंढरपूर
गोदा,कृष्णा,भीमा यांचे गळ्यात शोभे हार
हे माऊली संस्कृतीचे तू माहेरघर
नीती मुल्यांचा इथे मिळेल अहेर☘️
माउली माझी हे लेणे लेऊन सजली
इतिहासाच्या सुवर्ण पानाने ही बहरली
उज्वल इतिहासाने ही नाचली
मजला प्राणाहुन प्रिय महाराष्ट्र माउली☘️
भावभक्तीचे पुन्हापुन्हा तुज अभिवादन भगवती
मनामनांचे दीप लावून तुजला ओवाळिती
लेकरे आम्ही तुझी,तू आमची माउली
युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पाउली☘️
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈