जीवनरंग
☆ राग… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
“साहेब चला,पाटीलसाहेब बोलावताहेत”
कामात गुंतलेल्या अजितला शिपाई म्हणाला, तसं अजितने मान वर करुन त्याच्याकडे पाहिलं.
” कामात आहे जरा. येतो थोड्या वेळाने”
“अर्जंट आहे असं म्हंटले साहेब. घेऊनच ये म्हणाले साहेबांना”
” ठिक आहे.तू चल पुढे ,मी येतोच आवरुन” मोठ्या नाराजीने अजित म्हणाला.शिपाई गेला तसा त्याने लँपटाँप बंद केला.खरं तर त्याचा कामाचा मुडच गेला होता.पाटीलसाहेबांनी बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट सुनावण्यासाठी बोलावलं असणार याचा त्याला अंदाज होता.कारण आजपर्यंत पाटीलसाहेब चुकूनही त्याच्याशी कधी चांगलं बोलला नव्हता.आपल्याकडून काय चुक झाली असावी याचा विचार करतच तो साहेबाच्या केबिनजवळ पोहचला.” संतोष पाटील,प्राँडक्शन मँनेजर ” या पाटीवर त्याची नजर गेली.”संतोष” या नावाचं त्याला हसू आलं.”कसला संतोष?हा तर असंतोष फैलावणारा माणूस” त्याच्या मनात आलं.दारावर टकटक करुन तो आत गेला.नाकावर घसरलेल्या चष्म्याने पाटील साहेबांनी त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं.
” सर तुम्ही मला बोलावलंत?”अजितने विचारलं.
“मि.शेवाळे कलकी डे शिफ्टमें प्राँडक्शन कम क्यू हूँआ?”
मराठी असुनही साहेबाने पुन्हा त्याच्याशी हिंदीत बोलावं हे पाहून अजितचं डोकं सणकलं. ” सर मशीन खराब झाली होती ती रिपेअर करण्यात दोन तास गेले. तसा रिपोर्टही मी सबमिट केलाये”
” मशीन क्यूँ खराब हुई?आप लोग मशीनको मेंटेन नही रखते हो इसलिए ना?”
“सर मशीन जुनी झालीये.तिचे बरेच पार्टस गंजलेत.तिला रिप्लेस करणं आवश्यक आहे”
“मेरेको सिखा रहे हो क्या?और मैने तुमको कितनी बार बोला है की हिंदीमें बात करो लेकीन तुम्हारी तो मनमानी चल रही है.”
साहेब उध्दटपणे बोलला तशी संतापाची एक तिडीक अजितच्या डोक्यातून गेली.तो जरा जोरातच बोलला, ” साहेब तुम्ही मराठी मी मराठी.मग आपण हिंदीत बोलायचं कशाला?”
” इस कंपनीचा मालिक बिहारका है. तो वो जिस भाषामें बात करता है उसी भाषामें हमे बात करना है.”
“साहेब असा कुठे नियम आहे?आपले जी.एम.साहेब तर साऊथ इंडियन आहेत ते तर नेहमी इंग्रजीतून बोलतात.आपल्या एच.आर.ही साऊथ इंडियन आहेत त्यांच्याशी ते तामिळ भाषेत बोलतात.”
‘ याचा अर्थ असा झाला कीबमी चुकीचं बोलतोय. हे बघ, मला काहीवुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मी ज्या कामासाठी तुला बोलावलं, त ऐक. जरखंडाच्या राची मध्ये आपला एक प्लांट सुरू होतोय. तिथे काही इंजींनीयर्सची गरज आहे. मी तुझं नाव प्रपोज केलय, एव्हा तयार रहा. एका आठवड्यात तुझी ऑर्डर येईल. ते ऐकून अजित सुन्न झाला. त्याच्यावर जणू आकाश कोसळलं.
” साहेब माझी आई खेड्यावर रहाते तिला कँन्सरच्या ट्रिटमेंटसाठी वारंवार मुंबईला न्यावं लागतं. घरात चार महिन्यांचं बाळ आहे. कसं शक्य आहे मला इतक्या दुर जाणं?आणि आपल्याकडे दुसरे बिहारी इंजीनियर्स आहेतच की, त्यांना पाठवा ना तिकडे. ते एका पायावर तयार होतील “अजित गयावया करत म्हणाला.
” मै कुछ नही सुनना चाहता. अपने यहा इतने बिहारी काम करते है.इनकी भी तो कोई प्रॉब्लेम होगी! क्या उनको माँ-बाप, बिवीबच्चे नही है? ये तो कभी तुम्हारे जैसी कहाँनियाँ सुनाते नही.”
“साहेब ही कहाणी नाही……”
“देखो भाई तुमको जाना तो पडेगा. नही तो नोकरी छोडके घरपे बैठ जाना. जाओ अपना काम करो.आँर्डर के लिए तय्यार रहना”
अजित खचलेल्या मनाने तिथून बाहेर पडला.संताप,निराशा आणि रांचीला गेल्यावर आईवडिलांचे,बायकोचे होणारे हाल यांच्या चित्रांनी त्याच्या मनात वादळं निर्माण होत होती.
ही कंपनी एका बिहारी मालकाची होती.स्थापन केल्यानंतर त्याने अगोदर स्थानिक मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची भरती केली होती.अजित त्याचवेळी इथं एका बिहारी मित्रामुळेच जाँईन झाला होता.काही दिवसांनी मराठी कामगार आणि सुपरव्हायजर्सची गळती सूरु झाली.मराठी कामगार काम करत नाहीत असं मालकाचं म्हणणं होतं.काम सोडून गुटखा,तंबाखू खाणं,वेळीअवेळी चहा प्यायला जाणं,गप्पा मारणं,सुपरव्हायजर्सला दमदाटी करणं असे प्रकार सुरु होते.अजून काही दिवसांनी स्थानिक राजकीय नेते कंपनीत युनियन स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजल्यावर मालकाने मराठी कामगारांना डच्चू द्यायला सुरुवात केली.अजितचं काम चांगलं होतं.खेड्यातल्या शेतमजुराच्या गरीब कुटुंबातून तो आला असल्यामुळे त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळे तो आपलं काम इमानेइतबारे करत होता.शिवाय तो मेहनती आणि हुशारही होता.त्यामुळे कंपनीने त्याला धक्का लावला नाही. हळूहळू कंपनी बिहारी कामगार आणि सुपरव्हायजर्सनी भरुन गेली.अजित एकटाच मराठी इंजीनियर तिथे उरला.मागच्या वर्षी संतोष पाटील नावाचा प्राँडक्शन मँनेजर कंपनीत रुजू झाला तेव्हा अजितला आपला मराठी माणूस आल्याचा खुप आनंद झाला होता.पण हा आनंद फार काळ टिकला नाही.संतोष पाटील इतर बिहारी सुपरव्हायजर्सशी प्रेमाने बोलायचा.त्यांना शाबासकी द्यायचा.पण अजितशी तुसडेपणाने वागायचा.त्याच्या कामात मुद्दामच चुका काढून कामगारांसमोरच पाणउतारा करायचा.अजित त्याच्याशी मराठीत बोलायला लागला की तो हटकून हिंदीत बोलायचा.मराठीत बोलण्यावरुन त्याने अजितला ” मेरे मराठी होनेका गलत फायदा उठानेकी कोशीश मत करना” अशी अनेकदा ताकीदही दिली होती.बिहारी मालकाला इंप्रेस करण्यासाठी तो हे करतोय हे अजितला समजत होतं.तो मनातल्या मनात त्याला खूप शिव्या घालायचा.पण बाँस असल्याने मर्यादेने वागणं भाग होतंच.
शिफ्ट संपली.अजित कंपनीतून निघाला तो डोक्यात राग घेऊनच.एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाचा जाणूनबुजून छळ करावा याचा त्याला राहूनराहून संताप येत होता.
ऐका वळणावर तो डावीकडे वळणार तोच राँगसाईडने एक बाईकवाला येऊन त्याला धडकला.अजित वाचला पण त्याची बाईक खाली पडली.
“काय रे हरामखोर.ट्रँफिक रुल माहित नाहिये तर गाडी चालवतोच कशाला?” अजित त्याच्यावर ओरडला.तसा तो बाईकवाला बाईकवरुन खाली उतरला.
” हरामखोर कुणाला म्हणतो रे ×××××”
दोघांची बाचाबाची सुरु झाली.शब्दाला शब्द वाढत गेला.दोघांभोवती गर्दी जमा होऊ लागली.लोक दोघांना समजावू लागले.पण दोघं पेटले होते.दोघांची हाणामारी सुरु होणार इतक्यात ट्रँफिक पोलिस पळत आला.दोघांना समजावून बाजुला केलं.अजित जायला निघाला.पोलिसाने गर्दी पांगवली आणि राँग साईड घुसणाऱ्या पोराला बाजूला कोपऱ्यात नेलं.त्या पोराने पाचशेची नोट काढून पोलिसाच्या हातात ठेवली आणि बाईकला किक मारुन तो ऐटीत निघून गेला.अजितने ती देवाणघेवाण पाहिली आणि तो अधिकच संतापला.पण स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आपल्या बाईकचं तुटलेलं मडगार्ड पाहून त्याने बाईक उचलली आणि घराकडे निघाला.
तो घरात शिरला तेव्हा बेडरुममधून बाळाच्या रडण्याचा आवाज त्याला आला.बँग ठेवून तो बेडरुममध्ये गेला तेव्हा अनू बाळाला कडेवर घेऊन त्याला थोपटत फिरत होती.
” काय झालं का रडतोय तो?” अजितने विचारलं. त्याच्या स्वरातला कठोरपणा पाहून ती चकीतच झाली पण शांत स्वरात त्याला म्हणाली.
“अहो काही नाही त्याने सू केलीये म्हणून रडतोय.बदललेत मी त्याचे कपडे.जरा बेडवरची चादर बदलायची राहिलीये.जरा धरता का याला.थोडं फिरवा.तोपर्यंत मी चादर बदलून घेते.”
अजितने त्याला कडेवर घेतलं आणि त्याला घेऊन बाहेरच्या हाँलमध्ये आला.त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला.पण आज बाळानेही त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घ्यायचं ठरवलं असावं.तो रडणं थांबवायचं नाव घेत नव्हता.दिवसभर घडलेल्या घटनांनी तापलेल्या अजितच्या डोक्यात आता संताप शिरु लागला.
“ए बाबा,बस कर ना आता. किती रडशील?आधीच डोकं तापलंय माझं.बस कर” पण बाळ शांत व्हायचं नाव घेत नव्हता.अजितने जरा जोरातच त्याच्या पाठीत चापट मारली. ” पटकन शांत हो म्हंटलं ना तुला.बस कर”अजित त्याच्यावर खेकसला.पण चापट मारण्याने आणि अजितच्या खेकसण्याने बाळ अजूनच जोरात रडायला लागला. अजितचा आता संयम संपला.बाळाला दोन्ही हाताने त्याने समोर धरलं आणि तो मोठ्याने ओरडला, ’”बंद कर तुझं रडणं.”
एक क्षण बाळ शांत बसलं. दुसऱ्याच क्षणी त्याने दुप्पट आवाजात भोकाड पसरलं.अजितचा संताप अनावर झाला आणि त्याने बाळाला सोफावर फेकून दिलं.अजितच ओरडणं पाहून बाहेर येत असलेल्या अनूने ते दृश्य पाहिलं आणि ती जोरात किंचाळली
“अहो काय करताय…..?”आणि ती सोफ्याकडे धावत गेली.इतक्या वरुन फेकल्यामुळे क्षणभर स्तब्ध झालेलं बाळ आता किंचाळू लागलं.अनूने पटकन त्याला उचलून छातीशी धरलं.
“असं फेकतात बाळाला?”अजितकडे रागाने आणि दुःखाने पहात ती म्हणाली.तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.
” लवकर शांत कर त्याला.त्याच्या रडण्याने डोकं फाटतंय माझं” अजित तिच्यावर ओरडला.
“अहो आजारी आहे तो. ताप आहे त्याला.तापात रडतातच मुलं! ” रडतरडत अनू म्हणाली आणि बाळाला घेऊन बाहेर अंगणात गेली.अजित कपडे न काढताच बेडरुममध्ये गेला आणि बेडवर त्याने स्वतःला झोकून दिलं.मणामणाचे घाव त्याच्या डोक्यात पडत होते.दिवसभरातल्या घटनांनी त्याचं मानसिक संतुलन पार बिघडून गेलं होतं.बराचवेळ तो तळमळत पडला होता.एक तासाने त्याला जरा बरं वाटू लागलं.त्याने कानोसा घेतला.बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता.आपण मगाशी बाळाला फेकल्याचं त्याला आठवलं आणि भीतीची एक शिरशिरी त्याच्या शरीरातून निघून गेली.बापरे!त्याला काही झालं तर नाही ना?अनू त्याला दवाखान्यात तर नाही घेऊन गेली?खरंच त्याला काही झालं असेल तर?मानेला काही झटका बसून…..! त्याविचारासरशी तो घाबरून उठला.बाहेरच्या हाँलमध्ये आला.अनू आणि बाळ दोघंही तिथे नव्हते.तो बाहेर अंगणात आला मग गेट उघडून तो बाहेर रस्त्यावर आला.पण कुठेही त्या दोघांचा पत्ता नव्हता.तो परत आत आला.मोबाईल उचलून त्याने अनूला फोन लावला.रिंग वाजली पण अनूचा मोबाईल समोरच टेबलवर होता.ती मोबाईल घरातच ठेवून गेली होती.बाळाच्या काळजीने आता अजितला घाम फुटला.त्याचा तो गोड ,हसरा चेहरा आठवून त्याच्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली.जीव कासावीस होऊ लागला.तिरीमिरीत तो उठला.अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.
क्रमश: भाग १
© श्री दीपक तांबोळी
9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈