डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंद म्हणजे… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
उदासी म्हणजे भूतकाळ… !
तणाव म्हणजे भविष्यकाळ…!!
आणि आनंद म्हणजे वर्तमानकाळ…!!!
पण भूतकाळात काय घडलं ? ते पुन्हा घडायला नको, याचा विचार करून भविष्य काळाची तजवीज करता करता …आपण वर्तमान काळात जगायचं विसरूनच जातो, खरं तर…!
गंमत अशी आहे, की “आनंद” मिळवायला खूप काही घ्यावं लागतं …. असं आपण आयुष्यभर समजतो, पण पुढे खूप चालून गेल्यानंतर कळतं, आपण घेताना नाही…. पण ज्यावेळी दुसऱ्याला काही देत होतो, त्याचवेळी खरे “आनंदी” होतो… !
हरकत नाही, हे उशिरा का होईना, ज्याला समजलं तो खरा सुखी !
माझ्या या कामात, मला नेहमी असं वाटतं, की मी गुलाबाच्या बागेतून फिरून गुलाब गोळा करत आहे… सुखाचे आणि आनंदाचे क्षण झोळीत टाकत आहे… !
आपल्याच माध्यमातून जमा केलेले आनंदाचे हे क्षण आणि गुलाबाची काही फुलं, लेखाजोखाच्या निमित्ताने आपल्या पायाशी सविनय सादर !
वैद्यकीय
१ . या महिन्यात एकूण १५ लोक, जे रस्त्यावर असहायपणे पडून होते, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती तर ते हे जग सोडून गेले असते अशांना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून पूर्णपणे ते खडखडीत बरे झाले आहेत.
जगण्याचंच भय वाटू लागतं… त्यावेळी मरणाची भीती संपून जाते…! आत्मसन्मान… स्वाभिमान… आत्मप्रतिष्ठा…असे मोठाले शब्द मग पुस्तकांच्या पानातच दबून राहतात…. यानंतर सुरू होते जगण्याची लढाई….! अशावेळी पाया पडून तरी किंवा कोणाचे तरी पाय ओढून तरी, जगण्याची स्पर्धा चालू होते… !
पाया पडून / याचना करून जे जगतात, ते भिक्षेकरी…!
पाय ओढून हिसकावून घेतात, ती गुन्हेगारी… !!
— दोघेही मला एकाच तराजूत भेटतात…
तराजू मग हाताने तोलत, ” हाताची किंमत कळली की कोणाचे पाय धरायची किंवा ओढायची वेळ येत नाही…” या शब्दांचे वजन मी थोडं या तागडीत, थोडं त्या तागडीत टाकत राहतो…
— ज्याला हे समजलं….त्याचं मोल माझ्या मनात वाढतं… आणि मग त्याला / तिला उभं करण्यासाठी तुमच्या मदतीने प्रयत्न करतो आहे… !
२. या महिन्यात भीक मागणारे ९०० लोक…. त्यांच्या सर्व टेस्ट आपण रस्त्यावर करून घेतल्या आहेत, एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉपलर अशा ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, अशा सर्व तपासण्या रेड क्रॉस सोसायटी, पुणे यांच्याकडे करून घेत आहोत.
— सायन्स कितीही पुढं गेलं, तरी मनातले घाव मात्र कोणत्याही मशीनमध्ये दिसत नाहीत…
तुम्हा सर्वांच्या साथीने, हे घाव शोधून, त्यावर फुंकर मारण्याचा एक प्रयत्न करत आहे…!
- नेत्र तपासणी
२७ मार्च २०२३ – या दिवशी रस्त्यावर बेवारस राहणाऱ्या अनेकांची डोळे तपासणी केली आणि डॉ समीर रासकर, माझे मित्र यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन कमीत कमी खर्चात करून दिले.
— “दृष्टी” आल्यानंतर आता व्यवसाय करण्याचा “दृष्टिकोन” ठेवावा, असं या सर्वांना बजावून सांगितलं आहे.
आता, दिसायला लागल्यानंतर रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळतील…. पर्यायाने मृत्यू वाचतील.
… श्वास बंद पडल्यानंतरच मृत्यू होतो असं नाही, तर जगत असताना, चार चौघांनी खांद्यावरून उतरवून, त्यांच्या आयुष्यातून आपल्याला बाद करणे, म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यू !!!
भिक्षेकर्यांनी, “कष्टकरी” व्हावे…. स्वयंपूर्ण व्हावे आणि त्यानंतर सन्मानाने “गावकरी” म्हणून स्वाभिमानाने जगावे, समाजाने आईच्या मायेने त्यांनाही उचलून कडेवर घ्यावे, यासाठी मी काम करत आहे….आणि हा विचार हाच माझा श्वास आहे… !
अन्नपूर्णा प्रकल्प
रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे…. असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे.
जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत, त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे.
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈