सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे  पितामह. संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं….. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आदरांजली.

वाकणकर म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते भीमबेटका. भोपाळच्या जवळ असलेल्या भीमबेटकाच्या गुहांत पुराश्म युगातली दगडावरची चित्रे शोधली ती हरिभाऊनी. भीमबेटकाला जगाच्या नकाशावर आणून त्यांनी मानाचे स्थान दिले. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता. किंबहुना भारत  हे नावच अस्तित्वात नव्हते, ते देण्याची महान कृपाही इंग्रजांनी  केली असं आपल्या डोक्यावर मारलं जात होतं. शत्रूच्या मनावर हल्ला केला,आत्मबल खच्ची केलं की राज्य करणं सोपं जात हे त्या धूर्त, मतलबी व्यापाऱ्यांना उमजले नसते तरच आश्चर्य. आपला इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचे यशस्वी प्रयत्न  त्यांनी केले आणि आपल्याकडच्या काही ‘थोर’ विद्वानांनी त्यावर विश्वास ठेवला ! हरिभाऊंच्या या शोधामुळे आपला देश किती पुरातन आहे, इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचे सज्जड पुरावे मिळाले. हा मोठा विजय आहे. प्रत्येकाची लढाई वेगळी,रणांगण वेगळं,शस्त्र वेगळी आणि शत्रूही वेगळे. समानता फक्त एकच –लक्ष्याप्रती असलेली प्रतिबद्धता ! हरिभाऊंनी याच बळावर लढाई जिंकली होती.

भीमबेटकातली शैलचित्रे त्यांनी कशी शोधली यापाठी एक लहानशी कथा आहे. ते कामाच्या निमित्ताने भोपाल  ते नागपूर ट्रेनने प्रवास करत असत. भोपाळजवळ असलेल्या जंगलात त्यांना नेहमी दगडांचे उंच सुळके दिसत. इथे काय असेल याबद्दल त्यांना नेहमीच कुतूहल वाटायचं. सहप्रवाशांना विचारल्यावर तिथे गुहा आहेत, दाट जंगल आहे, तिथे कोणी जात नाही, असं समजलं. हरिभाऊना आता आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून सरळ भीमबेटका गाठलं आणि आजवर काळोखात दडपून राहिलेला इतिहास जगासमोर आला. १९६१ पासून सलग सहा वर्ष त्यांनी भीमबेटकामध्ये संशोधन केले. साडेआठशे गुहांत पुराश्म आणि मध्य पुराश्म युगात राहिलेल्या माणसांनी दगडांवर काढलेली  चित्रे सापडली. प्राणी, पक्षी,  माणसे, झाडे, पाने,फुले आदी त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्याची चित्रे सापडली. पांढऱ्या आणि लाल नैसर्गिक, खनिज रंगांत असलेल्या या चित्रांत काही ठिकाणी हिरवे ठिपके दिसतात. जणू मोठा खजिना हाती लागला होता. माणसाच्या विकासाचा एक टप्पा उलगडायला मदत होणार होती.

त्यांनी सहा वर्षे सलग संशोधन कसं केल असेल हा विचार मनात येताच त्यांच्याविषयी आदर दाटून येतो. एवढे निबिड अरण्य, तिथे खायलाप्यायला काय मिळणार? ते पिशवीत बटाटे घेऊन जात.  जंगलात गेल्यावर ते जमिनीत गाडत. सूर्याच्या प्रकाशाने, मातीच्या उबेने बटाटे शिजले की सोलून खात. हेच अन्न …. किती कठोर तपश्चर्या आहे ही ! भीमबेटकाचं महत्व सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी हरिभाऊना वार्षिक १०००० रुपये इतके  (घसघशीत !) अनुदान दिले होते. या रकमेतून त्यांचा चरितार्थ चालवणेही अवघड होते, मग संशोधनाला पैसा कुठून पुरणार ? तरीही संशोधनात खंड पडला नाही. रानात प्राण्यांचे भय असतेच. इतक्या जुन्या गुहांत वटवाघळाचा कुबट वास असतो. तिथेच तासनतास संशोधन करायचं योद्ध्याप्रमाणे ! युनेस्कोने भीमबेटका (भीमाची बैठक ) जागतिक वारसा जाहीर केलं. भारतात सापडलेले पुरातत्वीय पुरावे,वस्तू,चित्र आदी बाकी जगात सापडणाऱ्या पुराव्यांपेक्षा अधिक मोलाचे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही, महत्व समजलं जात नाही याची त्यांना खंत होती.

‘सरस्वती शोध अभियान ‘ हाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सरस्वती नदीचा उल्लेख वेदात वारंवार येतो. पण प्रत्यक्षात ती शोधता आलेली नव्हती. वैदिक संस्कृती सरस्वतीच्या काठावर फुलली होती. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन इस्त्रोने त्यांना मदत केली. पाकिस्तानातल्या आदिबिद्री पासून कच्छच्या रणापर्यंतचा चार हजार किलोमीटरचा प्रदेश त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासला.  हरीभाऊनी सरस्वती नदीचा शोध लावण्यासाठी संस्था स्थापन केली.  त्यांच्याबरोबर पुरातत्व शास्त्रज्ञ, लोककला अभ्यासक, फोटोग्राफर आदी तज्ञ मंडळी होती. सेटेलाईट चित्रांच्या आधाराने त्यांनी सरस्वतीचा मार्ग शोधला. वैज्ञानिक कसोटी लावून तिची लुप्त होण्याची कारणे सिद्ध केली. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती नष्ट केली ही समजूत चुकीची आहे हे सिद्ध केलं. आर्य युरोपातून भारतात आले असा शोध युरोपियन लोकांनी लावला होता. तसे नसून आर्य मूळचे इथलेच आहेत हे त्यांनी ठासून सांगितले.  सरस्वतीच्या अस्तित्वाबद्दल अविश्वास दाखवणाऱ्या लोकांसमोर भरभक्कम पुरावा ठेवला. तरीही लोक या संशोधनाला दुजोरा द्यायला धजावत नव्हते.  कारण युरोपीय संशोधकांच्या विरुद्ध बोलल्यावर आपली किंमत कमी होईल अशी मनोधारणा होती. त्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेचे वैषम्य वाटत असे. स्वातंत्र्य मिळाले तरीही मनाने स्वतंत्र झालो नाही. हरिभाऊनी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने संशोधन ठेवले आणि आजवर थोपलेल्या मिथकांना आव्हान दिले.

१९५४ पासून त्यांनी भारतात आणि बाहेरच्या जगात शैलचित्र अभ्यासायला सुरवात केली. त्यांनी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेला शैलचित्रांचा अभ्यास करून पुरातत्वावर पुस्तके लिहिली. केवळ भारतात त्यांनी ४००० गुहा शोधल्या. त्यांनी चंबळ आणि नर्मदेच्या खोऱ्यांत संशोधन केले. त्यांनी महेश्वर, नेवाडा, मनोती, आवरा, इंद्रगड,कायथा, मंदसौर, आझाद नगर, दंगवाडा भागांत खोदकाम करून पुरातत्वीय पुरावे गोळा केले. त्यांनी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीसमध्ये १९६१-६२ साली संशोधन केले.  ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यामुळे शैलचित्र त्यांनी कागदावर उतरवली. अशी ७५०० चित्र वाकणकर संस्थानाकडे आहेत. त्यांनी सहा पुस्तके आणि ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. ‘ वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण न्यासा ‘च्या संग्रहालयात त्यांनी गोळा केलेली ५००० नाणी आहेत. ते नाणकशास्त्राचे तज्ञ होते. जी.डी.आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर त्यांना पुरातत्वात विशेष रस वाटू लागला. भारतीय कलांमध्ये त्यांना रस होताच. कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी संस्कारभारतीची स्थापना केली. उज्जैनच्या विश्व विद्यालयातल्या पुरातत्व उत्खनन विभागाचे आणि रॉक आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. ललित कला संस्थान आणि शैलचित्र कला संस्थानाचे ते संचालक होते. त्यांनी ‘मेरा पुरातत्त्वीय उत्खनन ‘आणि ‘भारतीय शैलचित्र कला’ ही पुस्तके लिहिली.  हिंदीमध्ये कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आर्य प्रश्नावर रोबर्ट आर. यांच्यासह लेख लिहिला. २५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. भीम बेटकाच्या शैलचित्रांवर प्रदर्शने भरवली. १९७५ साली हरिभाऊना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

माळव्यातल्या मंदसौर जिल्ह्यातल्या नीमचमध्ये ४ मे १९१९ रोजी हरीभाउंचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीला सर्वजण लक्ष्मीवाहिनी नावाने ओळखत. पतीच्या कार्यात त्यांचा तन मन धन अर्पून सहभाग होता. लक्ष्मी वहिनींचा त्याग तितकाच मोठा आहे.  हरिभाऊच्या पायावर चक्र पडलं होत. अशा व्यक्तीबरोबर संसार करणे किती कठीण असते ते लक्ष्मी वहिनीच जाणो. हरिभाऊचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ नसले तरी समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम या शिकवणीची शिदोरी त्यांना कुटुंबाकडून मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी उज्जैनमध्ये एक आर्ट सेंटर चालवून अर्थार्जन केले. कालिदासाने मेघदूत लिहिले ती जागा या परिसरात असायला हवी असे त्यांना वाटत असे. त्यानुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर जाऊन शोधायला सुरुवात केली, पूर्ण प्रदेश विंचरून काढल्यावर एका गुहेवर ‘मेघदूत’ अशी अक्षरे सापडली. एका बाजूला ‘सुतनुका’ लिहिलेले दिसले आणि थोडे पुढे गेल्यावर ‘कालिदास’ असे लिहिलेले दिसले. पुढे कालिदासावर अधिक संशोधन केल्यावर हेच ते स्थान हे सिद्ध झाले. 

त्यांनी अजून एक महत्त्वाचे संशोधन केले. उज्जैनजवळच्या डोंगला गावात २१ जून रोजी सूर्यकिरण पृथ्वीशी लंबकर्ण अवस्थेत  पडतात. त्यामुळे सावली पडत नाही. हे गाव प्राचीन काळाचे time meridian होते.  कर्कवृत्त आणि रेखावृत्त इथे एकमेकांना छेद देतात. हरिभाऊनी कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता ती जागा दाखवून दिली. प्राचीन काळी हे वृत्त उज्जैनमधून जात असल्याने तिथे कर्कराजेश्वर मंदिर बांधले होते ! उज्जैनच्या वेधशाळेला वाकणकरांचे नाव दिले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे हरिभाऊंच्या नावे पुरस्कार दिला जातो. पुरातत्वात रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

१९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेले असताना खिडकीतून दिसणाऱ्या चित्राचे रेखाटन करताना त्यांना मृत्यू आला. उणेपुरे सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, जे खऱ्या अर्थाने ‘जीवन’ होते. संशोधकाचा मूळ पिंड असलेले हरिभाऊ कलाकार होतेच, राष्ट्रभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करत  होते. आनंदी,खेळकर स्वभावामुळे संकटाना सहज सामोरे जात. आपला ‘खरा’ इतिहास समोर येण्याची नितांत गरज आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हरिभाऊनी सुरु केलेल्या कार्याची पताका पुढे नेण्यासाठी संशोधक काम करत आहेत, निश्चितच हे कार्य लवकर सुफळ होईल. मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेला त्यांच्या स्वप्नातला भारत नवा, स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण भारत असेल, हीच आपणा सर्वांकडून त्यांना वाहिलेली आदरांजली असेल.

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची इथे आठवण होते:

रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा, 

नव्या मनूचा घोष घुमे हा, दुमदुमतात दिशा…  

जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा …. 

डॉ. अस्मिता हवालदार

इंदूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments