श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ इशारा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
बेधुंद वादळाला केला कुणी इशारा
होवून शांत आता सुटलाय गार वारा
रानात श्वपदांच्या बेचैन जीव होतो
आवाज दडपणारा असतो किती पसारा
दमदार पावलांची चाहूल मंद येता
बसतो दडून कोल्हा जोरात भुंकणारा
गर्दीत माणसांच्या असतात खूप दर्दी
लढवून तर्क तेव्हा गाठायचा किनारा
आत्मीक चिंतनाने होते पवित्र वाणी
शब्दात साधकाच्या असतो खरा दरारा
पाऊस छान येतो चैतन्य देत जातो
जगण्यास सावराया मिळतो जरा सहारा
आहे निसर्ग वेडा दाता तरी सुखांचा
लुटतो मजेत त्याला माणूस जाणणारा
जेथे समाज आहे तेथे रिवाज आहे
नेता तिथे असावा संपर्क साधणारा
कार्यात गुंतताना हमखास यश मिळाया
सन्मार्ग दाखवाया देवास त्या पुकारा
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈