डॉ मीना श्रीवास्तव
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆
पुस्तक – ‘अष्टदीप’
लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या – ३०० पाने
पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये
पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे
देशपांडे सरांनी लिहिलेले “अष्टदीप” हे अत्यंत प्रेरणादायी आणि मनोवेधक पुस्तक वाचले. एका विशिष्ट वयोगटाची अर्थात विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याच्या उदात्त हेतूने कांही निवडक भारतरत्न पुरस्कार विजेत्यांचे चरित्र असलेले हे पुस्तक असावे असा माझा समज होता. किंबहुना पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून मला तसे वाटले, मात्र पुस्तकाचे अंतरंग कळल्याबरोबर हा समज निव्वळ गैरसमज होता असे कळले! हे पुस्तक सर्व वयोगटाच्या भारतीयच नव्हे तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्यांना भारताचे अंतरंग जाणून घ्यायचे आहे! या देशाच्या परमपवित्र मातीतून अस्सल मोती कसे जन्माला येतात हे या पुस्तकाच्या वाचनातून कळते. यातील व्यक्ती कुणा एका प्रांताचे, भाषेचे, व्यवसायाचे किंवा आर्थिक दर्जाचे नाहीत. विविधतेत एकता हा भारताचा एकमेकाद्वितीय सद्गुण या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतो. किंबहुना प्रत्येकाचे वैशिष्टय नजरेत ठळकपणाने भरावे, हाच लेखकाचा हेतू दिसतो. भारतमातेच्या चरणी विविध रंगांची व विविध गंधांची सुमने अर्पण करावीत, हा अनवट विचार या पुस्तकाच्या देशभक्तीने भारलेल्या लेखकाच्या विचारात असावा.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
चारित्र्यवान व्यक्तींचे चरित्र लेखन लिहिणे कांही नवीन नाही पण सर्वोच्य नागरी पुरस्कार मिळालेल्या भारतातील आठ गौरवान्वित व्यक्तींविषयी लेखन करणे विश्वास सरांसारख्या सिद्धहस्त लेखकाला शक्य आहे. तारीखवार जन्म, मृत्यू, इतर सन्मान आणि असाच कागदी गोषवारा म्हणजे चरित्र नव्हेच, किंबहुना त्यापलीकडे जाऊन अतिसामान्य कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक विपन्नता, पारंपारिक बंधने, सामाजिक विरोध इत्यादी प्रतिरोधांवर मात करीत या लोकोत्तर व्यक्तींनी मळलेल्या वाटा सोडून आपल्या लक्ष्याकडे जाणारा काटेरी मार्ग कसा पादाक्रांत केला हे महत्वाचे आहे. या सर्व मुद्द्यांचे त्या त्या व्यक्तीच्या चरित्र लेखनात प्रतिबिंब असायला हवे. बहुतेक वेळी आपल्यास त्या व्यक्तींचा खडतर प्रवास माहित नसतो, दिसते ते फक्त त्यांच्या प्रसिद्धी आणि सन्मानाने लखलखणारे तेजःपुंज प्रकाशाचे वलय! परंतु या प्रकाशाच्या वाटा त्यांना सहज गावल्या नाहीत, तिथवर पोचायला खाचाखळग्यांनी आणि काटेरी निवडुंगांनी भरलेली वाट चालतांना त्यांचे पाय रक्तबंबाळ नक्कीच झाले असणार. या आठ सन्मानित व्यक्तींच्या खडतर प्रवासाचे विस्तारित चित्रण या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
लेखन स्वातंत्र्याचे निकष लावून ही या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या प्रतिमेला कुठेही तडा जाऊ नये, मात्र त्या व्यक्तीच्या जीवनातील वादग्रस्त बाबी, गैरसमज, जनमानसात रुजलेल्या कल्पना यांचाही परामर्श लेखकाने घेतलेला आहे, तेही सप्रमाण लेखन करून! माणूस जितका प्रसिद्ध, तितकी त्याच्या विरोधात सामग्री उपलब्ध असणारच. यात लेखकाचा खरा कस लागतो. या आठ व्यक्तींचा कालखंड बघता, हे काम लेखकाने अत्यंत निगुतीने केले आहे असे वाटते. प्रत्येक लेखाच्या शेवटी दिलेली संदर्भांची यादी लेखनाची पारदर्शकता दर्शवते. मात्र लेखकाने या संदर्भापलीकडे जाऊन त्या व्यक्तींच्या मनातले गूज ओळखले कसे आणि पुस्तकात चितारले कसे हा प्रश्न मला पडला! कांही ठिकाणी तर आपण त्या व्यक्तीची प्रकट मुलाखतच बघतोय असे जाणवत होते. ही लेखकाची कल्पनेची भरारी नसून, हे अत्यंत मेहनतीने, विचारपूर्वक आणि मुद्देसूद लिहिलेले रसाळ वाङ्मय आहे.
आजवर भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित ४८ व्यक्तींमधून नेमक्या त्याच आठ व्यक्ती कां निवडल्या याचे उत्तर लेखकाने देणे मला तरी अपेक्षित नाही, मात्र ज्या व्यक्ती त्यांनी निवडल्या, त्यांच्या चरित्रलेखनात त्यांनी यत्किंचितही कुसूर केला नाही, उलट याच व्यक्ती कां, याचे उत्तर त्यांचे चरित्र वाचूनच सापडते. लेखकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच, पण माझे मत आहे की भविष्यात सरांनी टप्याटप्याने या सर्वांचेच व्यक्तिचित्रण लिहावे आणि अष्टदीप या पुस्तकाच्या पुढील मालिका लिहाव्यात.
या पुस्तकात जी अष्टरत्ने आहेत त्यांची नांवेच किती आदरणीय आहेत बघा. मंडळी, त्यांच्या नांवाच्या आधी लागलेली बिरुदावली आणि अर्थवाही शब्द (अनुक्रमणिकेत आहेत तसेच) म्हणजे त्यांची अविभाज्य मानाची पदवी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची अति संक्षिप्त रूपरेखा समजावी. निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे, द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, द्रष्टा उद्योगपती जे. आर. डी. टाटा, निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेला नेता) लालबहादूर शास्त्री, अजातशत्रू नेता अटलबिहारी बाजपेयी, आनंदघन लता मंगेशकर आणि उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम.
या आठही व्यक्तींमधील मला जाणवलेला समसमान गुण म्हणजे देशभक्ती, आपल्या भारतभूमीला सर्वस्व वाहून टाकायची जबरदस्त उर्मी! त्यासाठी कितीही कष्ट, वेदना, मेहनत आणि जिवापाड प्रयत्न करण्याची दुर्दम्य आकांक्षा. ‘भारत माझा देश आहे, त्यासाठी मी हे करणार आणि ते करणार’ या वल्गना करणाऱ्या आजच्या वाचाळवीरांच्या पार्श्वभूमीवर, या व्यक्तींचे बावनकशी सोन्याहून पिवळे असे व्यक्तिमत्व उजळून दिसते. त्या लखलखीत प्रकाशात न्हाऊन निघण्याचा आणि नवचैतन्याने बहरून येण्याचा अनन्यसाधारण अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक आधी वाचावे, नंतर त्याचे मनन आणि चिंतन करून या व्यक्तींचे विचार प्रत्यक्षात जगणे, या पायऱ्या जमेल तशा आणि जमेल तितक्या चढाव्या! असे केल्यास लेखकाच्या या चरित्रलेखनाला न्याय मिळेल असे मला वाटते.
प्रत्येक व्यक्तीची शिकवण न्यारी अन निराळी, महर्षी कर्व्यांनी विधवांचे केलेले सामाजिक पुनरुत्थान व स्त्रीशिक्षणाचा रोवलेला पाया हे महाराष्ट्राच्या सीमा भेदून अखिल देशात फैलावले.सर विश्वेश्वरैयांनी निर्माण केलेली बांधकामाची आधुनिक तीर्थक्षेत्रे आजही दिमाखात उभी आहेत आणि आजच्या तकलादू बांधकामांना आव्हान देताहेत. लोहाला प्रतिष्ठा मिळवून देणारे लोहपुरुष म्हणजे भारताच्या अखंड साम्राज्याचे निर्मातेच! सत्तेचा माज आणि स्वायत्ततेचे विखारी स्वप्न बाळगणारे आणि भारताचा लचका तोडायच्या हेतूने आटोकाट स्वार्थी प्रयत्न करणारे तब्बल ५६५ संस्थानिक एका छत्राखाली आणणारे सरदारांचेही एकमेव सरदार वल्लभभाई पटेल! ऐश्वर्यसंपन्न असूनही निरलस आणि निरभिमानी, समाजकार्यात नंबर एक असे जे. आर. डी. टाटा, ‘बस नाम ही काफी है’, असा ब्रँड! साधी राहणी आणि उच्च विचारांचे धनी, आजच्या जगातल्या राजकारण्यांच्या संदर्भात आणि चौकटीत न बसणारे असे एकमेव पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, सर्वपक्षीयांची निष्ठा अन आदर ज्यांना प्राप्त होता असे कविमनाचे हळवे पण तितकेच खंबीर पंतप्रधान अटलजी आणि वेगळ्या जडणघडणीतले सर्वप्रिय वैज्ञानिक अब्दुल कलाम यांसारख्या रत्नांचे चरित्रलेखन या पुस्तकात केलेले आहे.
शेवटी अति आदराने उल्लेख करते तिचा, जी आहे आपल्या सर्वांची लाडकी स्वरमाऊली लता मंगेशकर! तिचे चरित्र वाचावे, तिची स्वर्गीय गाणी ऐकावी हे ठीकच, पण ती ‘लता’ म्हणून घडली कशी याचे सांगोपांग वर्णन म्हणजे माळेत जसे मोती ओवतात आणि शेवटी मध्यभागी मेरुमणी जोडतात, तद्वतच लेखकाने या पुस्तकात लता दीदींची प्रदीर्घ कारकीर्द वर्णन केली आहे. यात जणू भारतीय सिनेसंगीताचाच सांगीतिक प्रवास आपण करतोय असे वाटते. लेखकाची संगीताची उत्तम जाण आणि लतादीदींवरील अपार भक्ती या भागात अधोरेखित झाली आहे. माझ्यासारख्या लताभक्तांसाठी ही खास पर्वणीच आहे. मित्रांनो, लेखकाने या आठ व्यक्तिरेखांचा शोध घेता घेता आदर्श विचारांचे लक्ष लक्ष दीप उजळून टाकलेत, असा अनुपमेय अनुभव मला हे पुस्तक वाचतांना आला.
श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव. आ. बं. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजमाध्यमांवर उगवतीचे रंग, प्रभात पुष्प, थोडं मनातलं, ही त्यांची सदरे वाचकप्रिय आहेत. रेडिओ विश्वासवर ‘आनंदघन लता’, ‘या सुखांनो या’ आणि ‘राम कथेवर बोलू कांही’ या कार्यक्रमांच्या मालिका अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनल देखील आहे.
‘पुस्तक विश्व, पुणे’ मध्ये हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ च्या यादीत आले आहे. जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि इतरांना देखील वाचायला प्रेरित करावे असे वाटते.
पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव
दिनांक- २८ मार्च २०२३
ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈