श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आईवर गदिमांचं अपार प्रेम ! त्यांची आई बनूताई ही विलक्षण करारी स्त्री. ‘माडगूळ्यात’ तिचा अतिशय दरारा. अख्ख्या गावात तिच्या शब्दाला वजन. नंतर ‘कुंडल’मधे रहाताना तर ती संपूर्ण कुटुंबाचं ‘कवचकुंडल’च बनली. एकदा, गदिमांच्या वडिलांना, गावच्या मामलेदारीण बाईनं घरचं पाणी भरायला सांगितलं म्हणून बनूताईनं चारचौघात तिला थप्पड मारली व ‘पुन्हा घरची कामं सांगायची नाहीत’ असा सज्जड दम भरला. आत्यंतिक गरिबीतही मुलांमधला स्वाभिमान तिनं जोपासला. पण एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं तेव्हा मठातल्या गोसाव्यासमोर पोरांसाठी पदर पसरण्यातही संकोच मानला नाही. ती स्वतः ओव्या रचत असे. गदिमा आपल्या गीतांना, ‘आईच्या ओव्यांच्या लेकी’ म्हणत असत. ‘वाटेवरल्या सावल्या’मधे त्यांनी आईच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. आईचं व्यक्तित्व असं प्रभावी असल्यानं, गदिमा मातृभक्त झाले नसते तरच नवल.
सिनेगीतं ही कथानुसारी असतात हे खरंच. पण गदिमांचं ‘मातृप्रेम’ त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं.
‘वैशाख वणवा’ मधे ‘आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही’ हे गीत त्यांनी लिहिलं आहे. त्यात,
‘नकोस विसरु ऋण आईचे
स्वरुप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरुन तियेचा
होई उतराई’
अशा ओळी त्यांनी लिहिल्या. स्वतः ‘थोर पुरुष’ ठरुन मातृऋणातून ते उतराई झाले.
‘खेड्यामधले घर कौलारु’ मधे ‘माजघरातील उजेड मिणमिण.. वृध्द कांकणे करिती किणकिण’ असे भावोत्कट शब्द लिहून ‘दूरदेशीच्या प्रौढ लेकराच्या’ वाटेकडे डोळे लावून बसलेली आई त्यांनी रंगवली. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गीत तर ‘मातृत्वाचं सायंकालीन स्तोत्र’च आहे. ‘लिंबलोण उतरु कशी असशी दूर लांब तू’ हे गाणंही आईच्या सनातन वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरुप आहे.
‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला‘ या बालगीतात,
‘कुशीत घेता रात्री आई
थंडी वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे
सुगंध तिचिया पाप्याला’
हे शब्द लिहिताना त्यांना आपलं लहानपण आठवलं असेल का?
‘वैभव’मधल्या ‘चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा’ या गाण्यात गीताची नायिका, ‘खिडकीतून हळूच डोकावून माझ्या माऊलीची मूर्त न्याहळा’ असं चंद्रकिरणांना विनवते. ‘पाडसाची चिंता माथी, करी विरक्तीची पोथी’ अशा ओळी यात गदिमांनी लिहिल्या आहेत.
‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’ हे संपूर्ण गीत रुपकात्मक आहे असं प्रतिपादन नरहर कुरुंदकरांनी केलं होतं. यात ‘वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे’ म्हणजे ‘वृध्द वडील’ आणि ‘कौलावर गारवेल वा-यावर हळू डुलेल’ मधली ‘गारवेल’ म्हणजे ‘आई’ असा अर्थ त्यांनी लावला होता. उन्हापावसापासून घराला आडोसा देणारी ही ‘गारवेल’ रंगवताना गदिमांच्या नजरेसमोर कदाचित ‘कुंडल’मधली ‘बनूताई’ही असेल.
गदिमांच्या सिनेगीतात मातृमहात्म्याच्या अशा अनेक पाऊलखुणा आढळतील. त्यांची भावगीतं, कविता यातून तर असे भरपूर संदर्भ वेचता येतील.
‘तुझ्या वंदितो माउली पाऊलांस’ ही ‘मातृवंदना’ तर त्यांनी खास स्वतःच्या मातेसाठीच लिहिली होती.
‘धुंद येथ मी स्वैर झोकितो’ या गाण्यात ‘एकीकडे बाळाला अमृत पाजणारी आई आणि दुसरीकडे मद्यरुपी विष रिचवणारा तिचा पती’ असा पराकोटीचा विरोधाभास त्यांनी रेखाटला होता. आपल्या जीवनातदेखील असा दाहक विरोधाभास घडेल याची त्यांना कल्पनाही नसेल. बनूताईना ‘आदर्श माता पुरस्कारानं’ गौरवलं जात असतानाच घरी त्यांच्या लाडक्या ‘गजाननानं’ … गदिमांनी या जगाचा निरोप घेतला. (14 डिसेंबर 77) केवढा हा दैवदुर्विलास !
गदिमांच्या अंत्यसंस्कारावेळी सुधीर मोघेंनी ‘मातृवंदना’ मधे चार पंक्तींची भर घातली…
‘क्षमा मागतो जन्मदात्री तुझी मी
निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी’
सुखाने घडो अंतीचा हा प्रवास
तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस !’
लेखक : धनंजय कुरणे
9325290079
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈