श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “म्यान” ☆ श्री आशिष मुळे ☆
काळाच्या नवीन लढाईत आता
धार निरर्थक झाली आहे
संपलेल्या आव्हानांना आता
शरण मी गेलो आहे
जिंकून जगण्याचा दिवस आता
मावळतीला लागला आहे
जिंकूनही हरण्याची रात्र आता
वीरांच्या नशिबात आहे
का लढतोय कोणासाठी लढतोय
याला आता अर्थ नाही
सगळेच पराजित येथे
कोणालाच कुठले सुतक नाही
काळाच्या या झुंडी समोर
माझ्यातला मी हतबल आहे
तुटलेली तलवार मी आता
म्यान काळजात केली आहे
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈