सुश्री विभावरी कुलकर्णी
☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.
२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.
इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.
एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.
साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈