सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 180
पुण्याई… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
किती पैलू असतात ना,
बाईच्या जगण्याला,
कसे असतो आपण,
मुलगी म्हणून ?
बहिण म्हणून ?
बायको म्हणून?
आई म्हणून ?
एका लेखिकेने लिहिल्या होत्या,
आदर्श मातांच्या,
विलक्षण कथा!
मी दिली होती भरभरून दाद,
त्या लेखनाला!
तिने मला मागितला ,
माझ्या आईपणाचा आलेख,
“मला लिहायचंय तुमच्यावर,
“आदर्श माता” म्हणून!”
माझा सविनय नकार,
“किती महान आहेत
त्या सा-याजणीच तुम्ही
ज्यांच्यावर लिहिलंय!”
मी असं काहीच नाही केलेलं,
माझ्या मुलासाठी!
अंतर्मुख होऊन,
घेतली होती स्वतःची,
उलटतपासणी !
आता परत आलंय आवतंन,
आदर्श माता पुरस्कार
स्वीकारण्याचे !
हसले स्वतःशीच,
आठवल्या माझ्याचं
कवितेच्या ओळी,
“भोग देणं आणि घेणं
सोपं असेलही
किती कठीण असतं
आई होणं !”
दूरदेशीच्या मुलाशी बोलले,
मिश्किलपणे,
या पुरस्काराबद्दल–
हसत हसत..आणि…
त्याचं बोलणं ऐकून वाटलं,
आई होणं हेच
एक पुण्य,
नव्हे जन्मजन्मांतरीची
पुण्याई —
निसर्गाने बहाल केलेला,
केवढा मोठा पुरस्कार!!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈