श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 159 ☆ संत मीराबाई…☆ श्री सुजित कदम ☆
कृष्णभक्त मीराबाई
थोर भक्ती परंपरा
बारा तेराशे भजने
भक्तरस वाहे झरा…! १
जन्मा आली संत मीरा
रजपूत कुटुंबात
मातृवियोगात गेले
बालपण आजोळात…! २
सगुणाची उपासक
कृष्ण मुर्ती पंचप्राण
हरी ध्यानी एकरूप
वैराग्याचे घेई वाण….! ३
एका एका अभंगात
वर्णियले कृष्णरूप
प्रेम जीवनाचे सार
ईश्वरीय हरीरुप….! ४
कृष्ण मुर्ती घेऊनी या
मीराबाई वावरली
भोजराज पती तिचा
नाही संसारी रमली..! ५
कुल दैवताची पूजा
कृष्णा साठी नाकारली
कृष्ण भक्ती करताना
नाना संकटे गांजली…! ६
अकबर तानसेन
मंत्र मुग्ध अभंगात
दिला रत्नहार भेट
मीरा भक्ती गौरवात…! ७
आप्तेष्टांचा छळवाद
पदोपदी नाना भोग
कृष्णानेच तारीयले
साकारला भक्तीयोग…! ८
राजकन्या मीरा बाई
गिरीधर भगवान
भव दु:ख विस्मरण
नामजप वरदान…! ९
नाना वाद प्रमादात
छळ झाला अतोनात
वैरी झाले सासरचे
मीरा गांजली त्रासात…! १०
खिळे लोखंडी लाविले
दृष्टतेने बिछान्यात
गुलाबाच्या पाकळ्यांनी
दूर केले संकटास…! ११
दिलें प्रसादात विष
त्याचे अमृत जाहले
भक्त महिमा अपार
कृष्णानेच तारियले…! १२
लपविला फुलांमध्ये
जहरीला नागराज
त्याची झालीं फुलमाळा
सुमनांचा शोभे साज….! १३
गीत गोविंद की टिका
मीरा बाईका मलार
शब्दावली पदावली
कृष्ण भक्तीचा दुलार..! १४
प्रेम साधना मीरेची
स्मृती ग्रंथ सुधा सिंधू
भव सागरी तरला
फुटकर पद बिंदू….! १५
भावोत्कट गेयपदे
दोहा सारणी शोभन
छंद अलंकारी भाषा
उपमान चांद्रायण….! १६
विसरून देहभान
मीरा लीन भजनात
भक्ती रूप झाली मीरा
कृष्ण सखा चिंतनात….! १७
कृष्ण लिला नी प्रार्थना
कृष्ण विरहाची पदे
भाव मोहिनी शब्दांची
संतश्रेष्ठ मीरा वदे…! १८
गिरीधर नागरही
नाममुद्रा अभंगात
स्तुती प्रेम समर्पण
दंग मीरा भजनात…! १९
द्वारकेला कृष्णमूर्ती
मीराबाई एकरूप
समाधीस्थ झाली मीरा
अभंगात निजरूप….! २०
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈