श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

घड्याळाचे काटे घड्याळात आडवे झाल्याचे दिसले (सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे.) आणि मी माझा अंथरुणावर पडलेला आडवा देह उभा केला. (सहा वाजता काटे असतात तसा उभा केला. खरेतर सकाळी सहा वाजता असतात तसा. असे म्हणणार होतो पण मी संध्याकाळचेच सहा वाजल्याचे बघतो. सकाळची सहाची वेळ घड्याळात बघायला वेळ कुठे असतो.)

ब्रश काढला. त्यावर पेस्ट पसरवली. तोपर्यंत लगेच माझ्या मोबाईलवर मॅसेज येण्याचे टोन ऐकू येऊ लागले.

आज सकाळी सकाळी इतके मेसेज कसे काय? हा प्रश्न पडला. कोणाचा तरी Birthday असावा अशा विचारात मी मोबाईल हातात घेतला. कारण Birthday wishes चे विशेष सांभाळायचे होते.पण तोंडातला ब्रश, आणि मोबाइलवर बोटे एकाचवेळी फिरवण्याची कसरत जमली नाही.

मग मोबाईल बाजूला ठेवला, आणि ब्रश केला. फ्रेश झालो. न्यूज पेपर हातात घेत सावकाश चहा घेता घेता परत एकदा मोबाईल हातात घेतला. परत तेच. कपबशी, न्यूज पेपर, आणि मोबाईल यांचा हाताशी ताळमेळ बसला नाही. परत मोबाईल बाजूला ठेवला. पण मॅसेज चे टोन सुरुच होते. आज काय विशेष आहे याचा विचार करता करताच अगोदर चहा संपवला.

आणि मग शांतपणे खुर्चीवर बसून अधिरतेने मोबाईल ओपन केला. थोडावेळ सगळे मॅसेज बघितले. एक लक्षात आले.

गुलाब, मोगरा, प्राजक्त, कमळ, बकुळी, चाफा अशा अनेक  छानशा पण टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या सुरेख चित्रांसोबत Hi, Hello, Good morning, Have a nice day असे Pop corn सारखे टणाटण फुटणाऱ्या सगळ्या मॅसेजेस् च्या जागी चक्क नमस्कार मंडळी, सुप्रभात, काय म्हणता…, कसे आहात, आजचा दिवस सुखाचा जावो असे चक्क मराठीत लिहिलेले बरेच मॅसेजेस् मोबाईलवर आले होते.

आणि लक्षात आले. आज मराठी राजभाषा दिन. मग काय?…..

मी कसा काय मागे राहणार. भ्रमराने फुलाफुलांवर जाऊन त्यातील मधुकण गोळा करावेत तद्वतच मी देखील माझ्या भ्रमणध्वनीवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या समुहात पाठवलेले वेगवेगळे पण त्यातल्यात्यात काही वेचक संदेश टिपले. आणि कापा व चिकटवा अथवा नक्कल करा व चिकटवा या मार्गाचा अवलंब करत एकाचे दुसऱ्याला पुढे पाठवायला सुरुवात केली.

सध्या परिक्षेचे दिवस सुरू आहेत. नक्कलमुक्त अभियान राबवले जात असल्याचा भास निर्माण केला जातोय. पण तिथे जसा नक्कल करण्याचा सुळसुळाट असल्याचे वृत्त येते, तसेच मी देखील नक्कल करतोय याचे भान मला राहिले नाही.

निदान आज परत अंथरुणावर आडवे पर्यंत तरी शुभरात्री, शुभरजनी असे मराठीतलेच संदेश येतील.

हे ही नसे थोडके…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments