चित्रकाव्य
नुपूर कुठे…कुठे बेडी… श्री प्रमोद जोशी ☆
(जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्कल्प्चर गोल्डमेडॅलिस्ट श्री.सुहास जोशी, देवगड याने पाठवलेलं चित्र.)
☆
वरवर मुद्रा कथ्थकची पण,
नुपूर कोठे,कोठे बेडी !
गुंतू पाहे कुणी आणखी,
कुणा मुक्तीची आशा वेडी !
☆
मेंदी रंगली एका पायी,
दुसऱ्या पायी ठिबके रक्त !
एक शारदा भक्त असावा,
दुसरा स्वातंत्र्याचा भक्त !
☆
छुमछुम कोठे,कोठे खणखण,
सुख कुठे तर कोठे वणवण !
अलौकिक दोघांची श्रद्धा
समर्पणास्तव उत्सुक कणकण !
☆
कुणी तुरुंगी,कुणि मंचावर,
प्रत्येकाचे विभिन्न हेतू !
दोघांच्याही स्पष्ट जाणिवा,
मनात नाही किंतु-परंतू !
☆
नृत्यासाठी अशी कल्पना,
सुचली तो तर केवळ ईश्वर !
चिरंजीविता लाभे त्याला,
कधिही होणे नाही नश्वर !
☆
ता थै थैय्या सूर अचानक,
वेदीवरती जाई मुक्तीच्या !
लिहिल्या जातील कथा चिरंजीव,
रसीक आणि देशभक्तीच्या !
☆
कृष्णधवल कुणी,कोणी रंगीत,
ज्याचे त्याचे कर्म वेगळे !
काय करावे,काय स्फुरावे,
ज्याचे त्याचे मर्म वेगळे !
☆
एका जागी भिन्न येऊनी,
सादर होईल अपूर्व चिंतन !
इतिहासावर लिहिले जाईल,
दोघांचेही नाव चिरंतन !
☆
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈