इंद्रधनुष्य
☆ “हसरा बुध्द…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
पोखरण येथे १९७४ आणि १९९८ ला भारताने अणुचाचणी घेतली, त्या दोन्ही दिवशी बुध्दपौर्णिमा होती.
१९७४, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने सर्वप्रथम अणुचाचणी घेतली, त्या संपूर्ण प्रकल्पाला *’Operation Smiling Buddha’ (‘हसरा बुध्द’) असं नाव देण्यात आलं होतं.
अणुचाचणी यशस्वी झाली आहे, हे सांकेतिक भाषेत पंतप्रधानांना कळवण्यासाठी ‘The Buddha Has Smiled’ (‘बुध्द हसला आहे’) हा कोड वापरण्यात आला होता.
१९९८ ला अटलजींच्या कार्यकाळात झालेल्या अणुचाचणीचे वैज्ञानिक सल्लागार होते – एपीजे अब्दुल कलाम. यशस्वीतेनंतर त्यांना सर्व शास्त्रज्ञांच्या चमूने ‘बोधीवृक्षाखालील ध्यानस्थ बुध्दा’ची प्रतिमा भेट म्हणून दिली होती.
१९९८ च्या प्रकल्पावर काम केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी पूर्वी माझी भेट झाली. खूप माहिती मिळवल्यावर, वरील बाबींवर आधारलेली मी एक शंका सरांना विचारली,
— “सर, बुध्द हे तर अहिंसेचे प्रणेते आणि अण्वस्त्र हे तर महाविनाशक, हिंसेचं सगळ्यात विक्राळ स्वरूप जगाने हिरोशिमा-नागासाकीच्या अणुहल्ल्यात बघितलं. मग अण्वस्त्रसज्ज होताना, भारताने ‘बुध्द’ या प्रतीकाचा वापर का केला? हे विसंगत नाही का?”
सर हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली —
एका गावाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक जवळची वाट आणि एक वळणाने गेलेली लांबची वाट.
जवळच्या वाटेवर नागाचं मोठं वारूळ होतं. नाग क्रूर होता. वाटेवर कुणी दिसलं की तो दंश करत असे. माणसं जागीच मरत. नागाने अशी अनेक माणसं मारली होती. लोकांनी अखेर ती वाट वापरणंच बंद केलं. गावकरी, गावाला येणारे जाणारे प्रवासी, सर्वजण लांबच्या वाटेने जात.
एकदा त्या गावात एक योगी आला. मोठा सिद्धपुरूष होता. गावक-यांनी योग्याकडून ज्ञान-उपदेश घेतला, त्याचं आतिथ्य केलं. योगी निघाला, तेव्हा गावक-यांनी त्याला जवळच्या वाटेने न जाण्याचा, लांबचा रस्ता पकडण्याचा सल्ला दिला. योग्याने कारण विचारलं, तेव्हा गावक-यांनी नागाची हकीकत सांगितली.
योगी म्हणाला, “मला मृत्यूची भीती नाही. मी नागाला वठणीवर आणतो. चला माझ्या मागोमाग.”
गावक-यांना वाटलं, हा भलताच सिद्धपुरूष दिसतोय. काही चमत्कार पहायला मिळणार, म्हणून गावकरी त्याच्या पाठोपाठ गेले.— योगी वारुळापुढे जाऊन उभा राहिला, गावकरी भयाने जरा दूर थांबले.
आपल्या वाटेवर कुणी आलंय हे बघून नागाचा संताप झाला. नागाने चवताळून फणा काढला, योग्याला डसणार तोच योगी म्हणाला – “मला मारून तुझा फायदा काहीच होणार नाही. उलट तुझ्या भक्ष्यासाठी जमवलेलं तुझं हे बहुमोल विष मात्र वाया जाईल. नुकसान माझं नाही, तुझंच आहे.”
नागाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी न भिणारा भेटला होता.
नाग म्हणाला, ” ही वाट माझी आहे. इथे कुणालाही येण्याची परवानगी नाही.”
योगी म्हणाला, “हा तुझा अहंकार आहे. तुझ्या जन्माच्या आधीही हे गाव आणि ही वाट अस्तित्वात होती. उलट तुझ्या भीतीने लहान मुलं, म्हातारे, रुग्ण, या सर्वांना दूरच्या वाटेनं जावं लागतं. किती लोकांचा जीव घेतलायस तू. सोडून दे ही हिंसा. अहिंसेचा मार्ग धर. लोकांना दंश करणं सोडून दे. ते तुझं भक्ष्य नाहीत.”
नागाला हे पटलं. त्याने अहिंसेचा मार्ग पत्करला. गावकरी आनंदले. योगी तिथून निघून गेला. ती वाट पुन्हा वापरात आली.
काही महिने गेले. योगी परिव्रजा करत परतीच्या मार्गावर होता. पुन्हा ते गाव लागलं. नागाशी भेट होईल म्हणून योगी त्या मार्गाने गेला, वारुळापाशी पोचला.
नाग वारूळाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत, विव्हळत पडलेला दिसला. योग्याने त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं, तेव्हा नाग रडत म्हणाला —
“तुमचं ऐकून मी दंश करणं सोडून दिलं आणि लोक हा रस्ता वापरू लागले. मी त्यांना कुठलाही त्रास देत नाही. पण टवाळखोर लोक मला काटे टोचतात. मला लाथाडून निघून जातात. लहान मुलंसुध्दा मला बोचकून गंमत बघतात.”
योगी म्हणाला, ” तू इतक्यांचे जीव घेतलेस, त्या कर्माचं फळ तुला मिळतंय. बघ, लोकांच्या मनात किती घृणा निर्माण केली होतीस तू स्वतःबद्दल.”
नाग वैतागत म्हणाला, “असंच सुरू राहिलं तर हे लोक जीव घेतील माझा. काय रुबाब होता माझा पूर्वी, तुमच्या अहिंसेच्या उपदेशाने वाटोळं केलं माझं.”
मग योगी म्हणाला—
“बाबा रे, दंश करू नकोस असं मी सांगितलं होतं. पण फुत्कार करण्यापासून तुला कोणी रोखलं होतं? कुणी त्रास देऊ लागल्यावर, तू केवळ फणा उभारून फुस्स केलं तरी समोरचा भीतीने दहा पावलं मागे सरकला असता. तुझी ही अवस्था अहिंसेमुळे नाही, तर अहिंसेचा तू चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे.”
गोष्ट संपली. सर म्हणाले, ” भारताने घेतलेली अणुचाचणी हा स्वसंरक्षणासाठी केलेला फुत्कार होता असं समज. कारण दुबळ्या लोकांच्या अहिंसेला किंमत नसते. तिबेट अहिंसावादी राष्ट्र. दुबळे राहिल्यामुळे चीनने गिळंकृत केलं. अखेर दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने…..
…. स्वतः बलशाली असल्यामुळेच भारत अहिंसेच्या पुजा-यांना आश्रय, संरक्षण देऊ शकतो.”
त्या नागाला कितपत कळलं होतं ठाऊक नाही. मला मात्र पुरेपूर कळलं.
।। बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ।।
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈