सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
(मागील भागात आपण पाहिले – जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.” आता इथून पुढे)
पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू खाऊन अनुप आणि प्रकाशला बर वाटत होतं….त्यांचा श्वास आता सामान्य झाला होता…..दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच…..तो तरुण त्या दोघांना त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे ह्या विचाराने अनुप त्याच्या सॅककडे बघत बोलला….कारण कदाचित ह्यामुळे ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत.
“भाऊ….एवढी मदत केली अजून एक मदत कराल का??”
तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला.
“आव बोला की बिनधास्त”
सॅककडे बोट करत अनुप बोलला,
“तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटो आहे ना….तो घरच्या रस्त्यापर्यंत माझ्याजवळ द्याल का??”
तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला,
“हातीच्या मारी…..काय राव….लाजवताय व्हय आम्हाला….आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय….हे घ्या”
बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या…..अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही…..अनुप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता…..देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले…..ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच,
‘आर अन्या…आलो रे आलो….कमानीजवळ आलो आपण”
प्रकाशचे अश्रूंनी डबडबले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकित झाला होता….पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं…..कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारख वाटत होतं….जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान….कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाश त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली….अनुपने मागे बघितले तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार स्पष्ट दिसत होते…..हा पाठलाग इथपर्यंतच होता…
– समाप्त –
लेखक : श्री शशांक सुर्वे
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈