श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 187
☆ ओठ कोरडे… ☆
☆
दुष्काळाच्या सोबत मी तर नांदत होते
ओठ कोरडे घामासोबत खेळत होते
☆
किती मारले काळाने या जरी कोरडे
काळासोबत तरी गोड मी बोलत होते
☆
जरी फाटक्या गोणपटावर माझी शय्या
सवत लाडकी तिला दागिने टोचत होते
☆
शिकार दिसता रस्त्यावरती डंख मारण्या
साप विषारी अबलेमागे धावत होते
☆
उंबरठ्याची नाही आता भिती राहिली
नवी संस्कृती तिरकट दारा लावत होते
☆
रक्त गोठले भांगेमधले कुंकू नाही
जखमा काही केसामागे झाकत होते
☆
सरणावरती अता कशाला हवेय चंदन
दुर्भाग्याचा रोजच कचरा जाळत होते
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈