सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
☆ आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
बोट माऊलीचे करी
जणू सुकाणू हातात
बोट जीवनाची आता
तरणार प्रवाहात॥
☆
करी कर कोणाचाही
कन्या अथवा पुत्रीचा
करी भलेच तयांचे
स्वभाव या ममतेचा॥
☆
माया कधी न शिवते
स्वार्थाची तिच्या मनास
माया निर्मोही वृत्तीची
करी पुष्ट सकलांस॥
☆
आजी तिने दिधलाहे
जीवनाचा मूलाधार
आजी होईल उद्या ती
व्हावा तिचा स्वप्नाधार॥
☆
हस्त तिचा सदा सवे
त्यामुळे मी बलवंत
हस्त तिच्या वात्सल्याचा
बरसता मी श्रीमंत॥
☆
देणे आई ईश्वराचे
आहे स्वर्गाहून थोर
देणे सुख तिच्या ठाई
तिच्यामुळेच माहेर॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈