श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

जगण्याचा पायाच नाच आहे. नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच डोळ्यासमोर येतात. आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्व आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं ऐकूनच आपण वयाने मोठे झालो आहोत. आज नृत्य पुराण आठवण्याचे कारण म्हणजे आज 29 एप्रिल आहे. हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बॕले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या  आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नृत्य कलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागे आहे.

हर्ष, भीती, नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत. वर्ण, प्रांत, देश, भाषा, वंश इत्यादी अनेक प्रकाराने मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद, भीती, हातवा-यांच्या खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे. उदा. भूक लागली, तहान लागली, इकडे ये, तिकडे, जा, नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणांनी दाखवू शकतो. नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे. मनासारखं घडलं की माणुस मनातून डोलतो.

आपल्या भारतात दहा नृत्य शैली प्रसिध्द आहेत. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संंबंधित अति प्राचिन ग्रंथ मानला जातो. कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिशी, कथकली, मोहिनीअट्टम या भारतातील अतिप्राचिन नाट्यपद्धती आहेत. भगवान शंकराचे तांडव नृत्य हा ही एक नृत्य प्रकारच. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचे अविभाज्य अंग आहे. पंजाबच्या भांगड्यावर व गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारेही खूपजन आहेतच.

नृत्य व नाचणे हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडे नृत्य शब्द प्रतिष्ठेचा आब राखून आहे. नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही. नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली व त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली. नाचता येईना अंगण वाकडे हे तेव्हापासून सुरु झाले. खरं म्हणजे नाचण्याचा व अंगणाचा काही संबंधच नाही. नाचणे ही पूर्णतः मानसिक क्रिया आहे. मनातारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देते हा नाच कलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे.

दुःख विसरुन पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. आंतरिक सुख भावनेशी शरीराचे पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारतच घडते. आपली भारतीय सिनेसृष्टी तर नृत्यावरच उभी आहे. ताल, दिल तो पागल है, एबीसीडी, तेजाब, हम आपके है कौन, रबने बना दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्याने घराघरात पोहोचवलं. माधुरी, ऐश्वर्या, हेमामालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का ? तेरी मेहरबानियाँ मधला प्रामाणिक कुत्रा व त्याच्यावरचं टायटल साँग डोळ्यात पाणी आणतं. जय हो, सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते. ते यामुळेच. शांताबाई व शांताराम, आईची शपथ, चिमणी उडाली भूर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे.

नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. जगाची चिंता न करता, लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणे हा आनंद निर्मितीचा सहजभाव आहे. संगिताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वताःच्या तालातच नाचतं डुलतं ते सहजभावनेमुळेच. पण माणुस वयाने मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो व माणसं नाचणं सोडून देतात. जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही, तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा व लहाणपणीचं अंगण. अन् एकच मालिक आहे असा आहे की जो आपल्या नृत्याचं भरभरून कौतुक करतो तो म्हणजे आपली आई. एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार नियमाधिन झालेले, त्यामुळे बंधनं येतात. शोलेमधला धर्मेंद्र (वीरू) बसंतीला (हेमा)  इन कुत्तोंके सामने मत नाच असं ओरडून ओरडून सांगतो. त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी(अमिताभ बच्चन) चालत्या ट्रकवरच नृत्य करते. गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं वा इप्सित साध्य, साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच. म्हणजेच नृत्य ही दिल लुभानेकी बात है, तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे.

शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे. नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंगविक्षेपाची जोड देणे होय. नृत्य कलेची प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच. दीर्घ, निरोगी व सहज सुंदर आयुष्यासाठी नाच मित्रा नाच.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments