जीवनरंग
☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆
“ए पोरी, ऊठ ना. ऊठ गं, किती जीव खाशील माझा. बाप फुटकी कवडीही देत नाही घरात. मीच कमवायचं, तुम्हां भावंडांना आणि त्यालाही खाऊ घालायचं. वरून त्याच्या दारूलाही पैसा पुरवायचा. काय जन्म आहे माझा ? नवरा म्हणून कपाळावर लाल कुंकू आणि गळ्यात काळेमणी मिरवायचे एवढाच काय तो त्याचा सहभाग. त्यानं फक्त पोरं जन्माला घालायची. त्यांचं संगोपन नको कि जवाबदारी नको, हिच काय समाजाची रूढी परंपरा ?
मायबापाचंही हेच म्हणणं ‘बाई तुला कुंकवाचा धनी करून दिलाय, आता तू तुझं बघ.’ नवरा नावाचं लायसन माझ्या गळ्यात, तेच माझं सुरक्षा कवच म्हणे ?
ए, ऊठतेस का बर्या बोलानं कि घालू लाथ तुला. मी एकटी कुठे कुठे पुरे पडू. जा कचरा गोळा करायला. त्यातून काय मिळतं का बघ. थोडं उशीरा गेलीस तर तुझ्या हाती काही लागायचं नाही. आधीच सगळे घेऊन गेलेले असतील. ऊठ पोरी ऊठ, माझ्या आजच्या चुलीला हातभार लाव गं बाई. काय करू गं, मी हतबल आहे. तुमचं पालन पोषण माझी जिम्मेदारी, पण दिवसरात्र कष्ट करुनही मी नाही पूरी करू शकत गं” म्हणत माय ढसढसा रडू लागली .
“नको रडू माय, मी उठलीय,” मी चूळ भरली, पेला भरुन पाणी प्यायली, आणि कचर्यासाठी थैली उचलली.
“लक्ष्मी, थांब बेटा, थोडी चहा पिऊन जा आणि टोपलीत पोळी आहे, चहासोबत खाऊन घे बेटा.”
“ए संतोषी, चल ना.”
“हो ग लक्ष्मी, आलेच मी” म्हणत संतोषी बाहेर आली. दोघीजणी उकीरड्यावर कचरा शोधू लागल्या, काही मिळतं का पाहू लागल्या. जुने सेल, बॅटरी, बिसलेरीच्या बाटल्या, फटाफट त्यांच्या थैलीत टाकत होत्या. लक्ष्मीच्या हाती जुना ट्रान्झिस्टर व जुने दिवार घड्याळ लागले. जणू आज लाॅटरीच लागली. ती आनंदली, मनोमन खुलली.
या आनंदातच घरी येतांना ती शाळेजवळ थबकली. रोजच ती शाळेजवळ थबकायची. युनिफाॅर्म घातलेल्या, दोन वेण्या, पाठीवर दफ्तर घेतलेल्या मुलींचा लक्ष्मीला हेवा वाटायचा. आपल्याला का नाही शाळा शिकवत आपली आई.
“सुलोचना, तुझ्या लक्ष्मीला पाठवत जा गं शाळेत. शिक्षणा प्रगती होईल, ज्ञान वाढेल आणि जे आयुष्य तुझ्या वाटेला आलं ना ते नाही येणार तिच्या वाटेला, कारण ती शिकलेली राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील, आत्मनिर्भर बनेल.” शाळेच्या शिक्षिका तिला समजावित होत्या.
“खरंय बाई तुमचं, पण आमची पण मजबुरी समजून घ्या ना. लक्ष्मी सकाळी कचरा गोळा करते ४०- ५० रूपयं सुटतात. दुपारी आपल्या धाकट्या भावाला सांभाळते. ती त्याला सांभाळते म्हणूनच मी काम करू शकते बाई, आणि मी काम करते म्हणूनच घर चालतं माझं.”
लक्ष्मीला शाळेचं दर्शन काही झालं नाही. ती रोज अशी आशाळभूतपणे शाळेकडे बघायची. आज शाळेत वेगळंच वातावरण होतं. शाळेतील मुले महिला शिक्षिकांना कर्मचार्यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देत होती. “Happy women’s day . महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा” देत होते.
“ए संतोषी, महिला म्हणजे काय गं?”
“काय माहीत, पण ती मुलं बाईंना गुलाब फुलं देत आहेत, म्हणजे बाई म्हणजे महिला असेल बहुतेक,’
‘आणि महिलादिन म्हणजे ? ‘
‘ते नाही बाई मला माहित.”
दोघी घराच्या वाटेला लागल्या. लक्ष्मी ने आपल्या झोपडीचे दार उघडले. छोटा चेतन झोळीत झोपलेला होता. माय कामावर गेलेली होती. जाण्यापूर्वी तिनं वांग्या बटाट्याची भाजी करून झाकून ठेवली होती.
इतक्यात चेतन रडायला लागला. “अरे, झाली का झोप ? जागा झालास दादा. आली हं मी, म्हणत लक्ष्मीने त्याला अलगद झोळीतून बाहेर काढले आणि त्याला आपल्या छोट्याशा बाथरूमकडे (घरात केलेला छोटासा आडोसा) घेऊन गेली. चेतनची शी शू झाली तशी तिने त्याला स्वच्छ केले, आंघोळ घातली आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बाजेवर आणले. त्याला कपडे घातले. पावडर टिकली केली. बाळ खूपचं साजिरं दिसायला लागलं. ” माझा गोड गोडुला भाऊ…” म्हणत तिने त्याचा गालगुच्चा घेतला. मायनं सकाळी दूध आणून गरम करुन ठेवलं होतं. लक्ष्मीने दूध वाटीत घेऊन भावाला भरवलं. तो ही भराभर दूध पीत होता. दूध पिऊन झाले तशी तिने भावाला खाली उतरविले, ” खेळ हं राजा आता, ताईला काम करू दे.” लक्ष्मीने घर स्वच्छ केलं, झाडून, पूसून काढलं, कपडे धुतले, वाळत टाकले, स्वतःची वेणी घातली, तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. तिने भावाला वरणात पोळी चुरून बारीक बारीक घास त्याला भरविले, स्वतःचेही जेवण उरकले.
आज कचर्यात तिला मूळाक्षरांचं पुस्तकंही मिळालं होतं, अन ते पाहून ती मनोमन आनंदली होती. अ अननसाचा अ सोबत अननसचं चित्र, लक्ष्मी मन लावून, भान हरपून ते पुस्तक पाहात होती. एवढ्यात आळीत शेवंता मावशी सगळ्यांना सांगत होती,
“आज आपल्या वार्डच्या नगरसेविकेने सगळ्यांना महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलंय, चला सगळ्यांनी.”
महिला दिन ?’ लक्ष्मीला पुन्हा प्रश्न पडला. चला आपणही पाहूया महिला दिन म्हणजे काय आहे ते ? तिने चेतनला कडेवर घेतले व ती ही निघाली आळीतल्या महिलांसोबत.
सभामंडपात अनेक स्त्रिया जमल्या होत्या. व्यासपीठावरही आज समाजातील उच्चपदस्थ महिला विराजमान होत्या. आयोजिका नगर सेविकेने प्रास्ताविकात म्हटले, “स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कामाचे समान तास, समान वेतन, महिलांना मतदानाचा हक्क, अशा विविध मागण्यांसाठी हा लढा सुरू झाला आणि १९१० सालापासून ८ मार्च महिला दिन साजरा होऊ लागला व १९७७ या वर्षी युनो ने ८ मार्च जागतिक महिलादिन म्हणून घोषित केला.”
आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरु झालं. आपण महिला घर व नोकरी व्यवसाय अशी दुहेरी कसरत करतो. घरातील मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, सण वार, व्रत वैकल्य, येणारा जाणारा, पाहुणा रावळा, सगळंच पाहातो. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावत स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. पण तरीही तिचं आज विविध पातळीवर शोषण सुरू आहेच, मग हे शोषण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, सर्वच स्तरावर होत आहे, ते थांबलं पाहिजे, स्त्रियांना न्यायहक्क मिळालाच पाहिजे, ही जनजागृती व्हावी म्हणून हा महिला दिन. आज रोजच्या कामकाजातून उसंत मिळून तुम्ही क्षणभर विसावा घ्यावा म्हणून हा प्रपंच. आज महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना बक्षिसे, पैठणीची सोडत व शेवटी स्नेह भोजन आपण करणार आहोत.”
लक्ष्मी कान देऊन ऐकत होती, समजण्याचा प्रयत्न करीत होती. माझा बाप दारू पिवून धिंगाणा घालतो, मायनं दिवसभर केलेल्या कष्टांची कमाई काढून घेतो, वरुन तिला मारहाण व शिवीगाळ, ही कसली समानता.
लक्ष्मी घरी आली. “कोठे गेली होतीस गं”
“माय महिलादिनाच्या कार्यक्रमाला आळीतल्या सगळ्या बायांसोबत गेले होते पण महिलादिन म्हणजे काय ते मला समजलं माय.”
“मोठी आली हुशार, मला सगळं समजलंय म्हणणारी….” सुलोचनाच्या डोळ्यात लेकीविषयी कौतुक होतं.
रात्री लक्ष्मीचा बाप सदा झिंगतच घरी आला. “ए, जेवाय वाढ.” त्यानं गुर्मीतच सुलोचनाला सुनावलं. सुलोचनानं कांदा घालून केलेला झुणका, लोणचं, हिरव्या मिरचीचा खर्डा वाढला.
“हे काय जेवाण आहे ?” म्हणत त्यानं अन्नाचं ताट भिरकावलं. चेतन भितीने रडायला लागला, लक्ष्मी दचकून कोपर्यात उभी राहिली. सदा आता सुलोचनाला मारहाण करू लागला तशी लक्ष्मी चिडली वॉर्डातील नगरसेविकेकडे गेली, “मॅडम, लवकर चला, माझा बाप मायला खूप मारतोय.”
मॅडमनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला व स्वतः लक्ष्मीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. नगरसेविकेला पहाताच सदा मारायचा थांबला, वरमला व माफी मागू लागला.
“आता माफी मागतोय, रोज बायकोला मारहाण करायची, दारूत पैसा उडवायचा, संसाराची राखरांगोळी करायची, लाज नाही वाटत काय रे तुला. माफी कसली, तुला तर जेलची हवाच पाहिजे, तेव्हा कोठे तुझी अक्कल ठिकाणावर येईल.”
इतक्यात पोलीस आले, “घेऊन जा याला. सुलोचनाला घेऊन येते मी पोलीस स्टेशनला, कौटुंबिक हिंसाचाराखाली करा याला जेरबंद.” नगरसेविका मीनाक्षीताई बोलत होत्या.
“सुलोचना, लक्ष्मीला शिकू दे. गुणी मुलगी आहे तुझी. शाळेत तिला वह्या, पुस्तके, गणवेष, मध्यान्ह भोजनही मिळेल. चेतनसाठी पाळणाघर आहेच की. कष्टकरी, कामकरी महिलांच्या मुलांसाठी शासनाने पाळणाघराचीही योजना आणली आहे.”
“मग तर प्रश्नच मिटला ताई. पण यांना पोलिसांनी बंद केलंय.”
“राहू दे चार आठ दिवस तिथेच, येईल अक्कल ठिकाणावर, नंतर घरी येंणारच आहे तो. काही काळजी करू नकोस. येते मी.”
आज लक्ष्मीला महिला, महिलादिन, महिलांचे हक्क समजले होते. तिची शिक्षणाची वाटही मोकळी झाली होती. खर्या अर्थाने आज महिलादिन साजरा झाला होता.
© सुश्री शैलजा करोडे
संपर्क – नेरूळ, नवी मुंबई. मो.9764808391
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈