सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
काही गीतांच्या रचना ह्या जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंगच बनल्यात. ह्या ऐकल्यावर स्फूर्ती, स्वाभिमान, देशप्रेम, निष्ठा, जागृत होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत, वंदेमातरम, ए मेरे वतन के लोगो, रंग दे बसंती, महाराष्ट्र गीत,मेरे देश की धरती आणि अशी कित्येक स्फुरणगीतं.
“वंदेमातरम” ह्या आपल्याला अतिशय पूज्य असणा-या गीताचे रचयीते बंकीमचंद्र ह्यांची जयंती नुकतीच आठ मे ला झाली.त्यांना विनम्र अभिवादन.काही बाबी,काही घटना, काही प्रसंग तर काही गीतं ह्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान असतं.
आज अशी काही गीतं आठवलीत की आपण चटकन आदराने स्तब्ध उभे राहतो , काही गीतं ऐकली की स्फुरण चढतं. आजही “जन गण मन ” व “वंदेमातरम”गीत कानी पडले की आपली मान गर्वाने उंच होते.
१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं ” वंदेमातरम” हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.
मुळात वंदे मातरम् हे गीत बंगाली व संस्कृत ह्या दोन भाषांच्या मदतीने फुललयं,तयार झालयं. ह्या दोन्ही भाषांचा सरसकट अभ्यास नसल्याने वा त्या नीट अवगत नसल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.
वंदेमातरम गीताचा विषय निघाल्यावर एका छोट्या मुलाने त्यातील काही शब्दांचा अर्थ विचारल्याने मला स्वतःला देखील त्याचा नीट, अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेण्याची अनिवार ईच्छा झाली.
पहिल्यांदा ह्यातील सुरवातीच्या तीन चार ओळी म्हणजेच ध्रुवपद आणि नित्य गायल्या जणारे कडवे ,त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे,
वंदे मातरम्, वंदे मातरम्!
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!
शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,
सुखदाम् वरदाम्, मातरम्!
वंदे मातरम्, वंदे मातरम्॥
ह्या गीताचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे,
हे माते मी तुला मनोमन वंदन करते, पाणी म्हणजेच आपले जीवन,ह्या पाण्याने भरभरून ओसंडून वाहणारी, परिपूर्ण, फळांनी लदलदलेली,बहरलेली, पण त्याच बरोबर दक्षिणेकडील वा-याच्या झुळकांनी,लाटांनी शांत असणाऱ्या निरनिराळ्या पिकांनी समृद्ध असलेल्या अश्या माझ्या मातेला,माझ्या भारतभू ला मी प्रणाम करते.
शुभ्र धवल चमकत्या चांदण्यांमुळे बहरलेल्या ह्या पवित्र भूमीवरील रात्र ही आल्हाददायक असते. फुलांच्या मदतीने फुललेली, वृक्षांच्या साथीने मढलेली, येथील ही आमची भूमाता ही खरोखरीच विलक्षण शोभून दिसते. म्हणूनच येथील पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी ची अनूभुती देणा-या ह्या भूमातेला माझे वंदन, माझा प्रणाम !
ह्या गीताचे रचयिते मा.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
बंकीमचंद्र ह्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण करून वंदेमातरम ह्या गीताने दिवसाची चांगली सुरवात करत जाऊया.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈