श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ कर्मवीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(९ मे २०२३ – कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त या महामानवाला मी वाहिलेली काव्यश्रद्धांजली)
भावसुमांची गुंफून माला पूजा तव बांधली
हृतपटलावर मुहूर्त करूनी श्रद्धांजली वाहिली
अज्ञानाचा संहारक तू ज्ञानदीप आमुचा
अनेक वलया मधुनी तुझिया सूर्य तळपतो ज्ञानाचा
तू वीरांचा वीर अग्रणी कर्मवीर माऊली
महाराष्ट्राच्या कडेकपारी तूच बांधली ज्ञानमंदिरे
उद्धरली अन् त्यांच्यामधूनी रयतेची बलशाली पोरे
सरस्वतीच्या हातामधली विणा झंकारली
कर्मवीरा तुज म्हणती अण्णा यातच तव श्रेष्ठत्व वसे
शिक्षणक्षेत्री कामधेनू तू तुझे भले पण तिथे दिसे
कर्तव्याच्या तुझ्या मेरुतही रत्न खाण लागली
राजांना ही लाजवील तव कर्तव्याचा अमोल ठेवा
श्रद्धा आमुची तुझ्याच चरणी देवाला ही वाटे हेवा
तू देवातील देव आमुचा चरणधुली चर्चिली
करू कशी सांगता याची शब्द अपुरे पडती
अंतरात परी लाख लाख त्या तिथे नौबती झडती
तुझ्या कृपेच्या कल्पतरूतळी समाधीच लागली
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈