प्रा. बी. एन. चौधरी
(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)
जीवनरंग
☆ खिचडी – भाग – २ ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆
(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—-
(तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी हळूच आत डोकावलं.) इथून पुढे —-
सुभाषनं हातातली पिशवी जवळच्या लाकडी कपाटावर ठेवली. दोन खांबांना बांधलेल्या झोळी जवळ तो गेला. झोळीत लहान बाळ होतं. ते पडू नये म्हणून त्यास साडीच्या फडक्याने बांधलेलं होतं. त्याने फडक्याची गाठ सोडली. झोळीतून चार पाच वर्षाच्या लहान मुलीला बाहेर कढलं. ती रडून रडून थकली असावी. तिचे केस अस्ताव्यस्त होते. त्याने हातानेच तिचे केस व्यवस्थित केले. हातातलं फडकं जवळ पडलेल्या तांब्यातील पाण्यात बुडवून ते त्याने त्या लहान मुलीच्या चेह-यावर फिरवलं. आता तिला हुशारी आली होती. ती भावाकडे बघून खुदकन हसली. त्याला प्रेमानं बिलगली. त्यानंही तिला ” छकूली माझी ! ” म्हणत पोटाशी लावली. मग तो तिला म्हणाला…..
“छकुली बघ मी तुला काय आणलं, ओळख ? “
लहान छकुली आश्चर्याने त्याच्याकडे पहात म्हणाली…..
” दादा, ताय आणलं तू माझ्यासाठी ? “
” छकुली, अगं तू रात्री खिचडी मागत होती नं आई जवळ ? ….. रात्री आईला खिचडी देता आली नाही नं
तुला ! ……. म्हणून तूला खिचडी आणली बघ शाळेतून ! ….. गलम गलम खिचडी आहे.”
असं म्हणत सुभाषनं कापडी पिशवीतून डबा काढला. डबा उघडला. त्यात खिचडी होती. त्याला शाळेत मिळालेली. त्याने तिथं स्वतः न खाल्लेली. डब्यातून त्याने खिचडीचा एक घास हातात घेतला. आणि तो त्याच्या बहिणीच्या तोंडात भरवू लागला. तिनेही आनंदाने तो घास तोंडात घेतला. तो भरवत होता. ती खात होती. आनंदत होती. खाता खाता तिनं तिचा हात डब्यात घातला. डब्यातून तिनं चिमूटभर खिचडी घेतली. तो घास तिनं तिच्या भावाच्या तोंडाजवळ नेला.
” दादा, तू पण घे ना ले खिची ….. तू पन जेवला नाही ना राती.”
सुभाषनं बहिणीच्या हातातला घास मोठ्या आपुलकीनं तोंडात घेतला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आणि तोही तिच्याबरोबर खिचडी खाऊ लागला.
” एक घास चिऊला, एक घास काऊला, एक घास माझ्या छकुलीला ! ” असं म्हणत तो तिला भरवू लागला. डब्यातली गरम खिचडी ओठाजवळ नेत, त्यावर फुंकर मारत तो तिला निववत होता. छकुलीला भरवत होता. गरम घासाचा चटका तिला लागू नये याची काळजी घेत होता. छकुलीही त्याच्याकडून आपले लाड पुरवून घेत होती. तो जणू तिची आईच झाला होता. तीही त्याच्याकडे आर्द्र नजरेने पहात त्याला मायेने बिलगत होती. त्याला बिलगतांना तिचे खिचडीने उष्टे भरलेले हात, तोंड त्याच्या कपड्यांना लागत होते. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. रात्री घरात खायला काहीच नसल्याने आईसह तो, त्याची बहिण उपाशीच झोपले होते. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. आपल्या पोटात ओरडणा-या कावळ्यांमुळे नव्हे, तर…. बहिणीच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही म्हणून तो दु:खी होता. रात्रीच त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. सकाळी शाळेत खिचडी मिळेल. तीच आपण घरी आणून बहिणीला खावू घालू या विचारात त्याला रात्रभर झोपच आली नव्हती. याचसाठी सकाळ केव्हा होते याची वाट पहात त्याने भल्या पहाटे शाळा गाठली होती. मधली सुटी झाल्यावर त्याला मिळालेली खिचडी घेवून त्याने घराकडे धूम ठोकून बहिणीला जेवू घातले होते. त्याच्या चेह-यावर समाधान पसरले होते. अचानक तो मोठा झाला होता. कर्ता झाला होता.
बहिणीला पोटभर खिचडी भरवून त्याने तिचे तोंड, हात, पाय कापडाने स्वच्छ पुसले. तिला पुन्हा झोळीत टाकून त्याने तिला कापड गुंडाळले. त्याची गाठ मारली. तिचा एक छानसा मुका घेत तो म्हणाला…..
” छकुली, झोप हं आता. मी शाळेत जावून येतो. तोवर आई येईल हं कामावरुन. मग आपण पुन्हा जेवण करु.”
ती पुन्हा हसली निराससपणे. आताचं तिचं हसणं तृप्ततेचं होतं.
झोळीतूनच तिनं हात हलवत टाटा केलं. जणू ती आपल्या लाडक्या भावाला निरोप देत होती.
दाराआडून हे दृष्य पाहणा-या पाटील सरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शाळेत होणा-या किरकोळ चो-या करणारा चोर सापडल्याच्या त्यांच्या आनंदावर असं अनपेक्षित विरजण पडलं होतं. चोर म्हणून ज्यावर अविश्वास दाखविला, ज्याचा पाठलाग केला तोच सुभाष नात्यांच्या व कर्तव्याच्या कसोटीवर खरा उतरला होता. परिस्थिती माणसाला खोटं बोलायला, चोरी करायला लावते हे सरांना वाटणारं मत सुभाषनं खोटं ठरवलं होतं. उलट त्याच्या आताच्या वागण्यानं त्याने आदर्शाचं सर्वोच्च शिखर गाठलं होतं. दिसतं, वाटतं ते सारं खरंच नसतं या गोष्टीवर पाटील सरांचा आता विश्वास दृढ झाला होता. गरीबी, कठीण परीस्थितीतही काही माणसं आपलं इमान विसरत नाहीत. आपल्या कर्तव्याला भुलत नाहीत याचं विहंगम उदाहरण त्यांना सुभाषच्या रुपानं संजयनगरच्या झोपडपट्टीत बघायला मिळालं होतं. सुभाष घरातून बाहेर पडायच्या आत त्यांनी स्वतःला लपवत बाहेरची वाट धरली. आणि ते माणसांच्या गर्दीत मिसळून गेले. थोड्याच वेळात सुभाष दार बंद करून खोपटाच्या बाहेर पडला. त्याने दुडकी घेत शाळेची वाट धरली. मधल्या सुटीनंतरची शाळा सापडावी म्हणून. त्याच्या पाठमो-या देहाकडे पहात पाटील सर स्वतःशीच पुटपुटले ” दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं ! ” आणि तेही शाळेची वाट चालू लागले. आता त्यांच्या वागण्यात ती लगबग नव्हती. ती ओढ नव्हती. होती ती एक बोच. एका प्रामाणिक मुलावर आपण उगाच अविश्वास दाखविल्याची. गरीबीची उगाच चेष्टा केल्याची. एका पराभूत मानसिकतेत ते शाळेत पोहचले. तत्पूर्वी सुभाष शाळेत पोहचला होता. त्याच्याच वर्गातून पू. साने गुरुजींची प्रार्थना ऐकू येत होती…….
खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे.
जगी जे दीन पददलित,
तया जाऊन उठवावे !
— समाप्त —
© प्रा.बी.एन.चौधरी
संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈