सौ. यशश्री वि. तावसे

अल्प परिचय 

एक साधक व नर्मदा भक्त – १ एप्रिल २०१७ ते २० एप्रिल २०१८….

भगवंत व सद्गुरुंनी १७० दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. संत साहित्याचा अभ्यास यथाशक्ती चालू आहे.

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

अखंड मंडलाकारम्

व्याप्तं येन चराचरम्।

तत्पदं दर्शितं येन 

तस्मै श्री गुरुवे नमः।।

जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म, वैशाख शुद्ध पंचमी, नंदन नाम संवत्सर, युधिष्ठिर-शक 2631,  वसंत ऋतू,  रविवारी,  इसवी सन पूर्व 509 ला…. केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी, कालडी नावाच्या, गावात झाला.  त्यांच्या पित्याचे नाव शिवगुरू व आईचे नाव आर्यांबा. कुशाग्र बुद्धी,  तल्लख स्मरणशक्ती,  अत्यंत देखणी व बळकट शरीरयष्टी,  आजानुबाहू,  असे त्यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते.  

शब्दोच्चार व लिपी यांचे ज्ञान पाचव्या वर्षीच झाल्याने त्यांच्या पिताजींनी पाचव्या वर्षीच,  त्यांचा व्रतबंध केला. आठव्या वर्षी ते चतुर्वेदी झाले. बाराव्या वर्षी सर्व शास्त्र संपन्न होते.

१६ व्या वर्षी  प्रस्थान-त्रयी…. म्हणजे उपनिषदे, ब्रह्म -सूत्र व श्रीमद् भगवद्गीता यावर जगप्रसिद्ध असे भाष्य केले.  

३२ व्या वर्षी ते दिव्यलोकी परतले. 

चार वर्षांचे असताना “देवी भुजंग स्तव” हे २८ श्लोकांचे स्तोत्र  त्यांच्याकडून रचले गेले.

बालशंकरांचे उपनयन झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांचे पितृछत्र हरपले.  म्हणून त्यांच्या मातोश्रींनी, त्यांना गुरुकुलात दाखल केले. गुरुकुलात असताना एक दिवस ते भिक्षा मागायला गेले असता, त्या घरातील ब्राह्मणाची पत्नी, त्यांना देण्यासाठी,  घरामध्ये भिक्षा शोधू लागली.  घरात काहीच नव्हते.  तिला एक वाळलेला आवळा दिसला.  तोच तिने त्यांना दिला.  त्यावरून , त्यांना त्या घरातील दारिद्र्याची कल्पना आली. तेव्हा त्यांना स्फुरलेल्या कनकधारा स्तोत्राने,  त्यांनी श्री लक्ष्मी देवींची स्तुती केली.  तत्काळ लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, देवींनी,  सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला व त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे दूर झाले. त्यामुळे त्या गावचे नाव कनकांबा असे पडले.

तीन वर्षांच्या कालावधीतच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेची ख्याती राजदरबारात पोहोचली.  राजाने त्यांना बरीच संपत्ती देऊन,  राजदरबारात आणण्यासाठी,  पालखी पाठवली.  ती संपत्ती नम्रतापूर्वक परत करून, ती प्रजेसाठी वापरावी. मला याचा काय उपयोग? असा निरोप राजाला दिला. आपण विद्वानांविषयी आदर बाळगता,  त्यामुळे आपले भलेच होईल असा राजाला आशीर्वाद दिला.  त्यांची विद्वत्ता पाहून गावातले प्रतिष्ठित त्यांना खूपच मान देत असत.  शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता. पण आईला कोण सांभाळणार?  त्यांनी विचार केला.  त्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांपैकी अग्नि शर्मा या आवडत्या असलेल्या शिष्याच्या नावावर सर्व संपत्ती करून आईची जबाबदारी सोपवली. अग्निशर्मांनी पण आचार्यांना त्यांच्या आईची काळजी घेण्याचे वचन दिले.  

आईला स्नानासाठी गंगेवर लांब जायला नको म्हणून आचार्यांनी गंगेचा प्रवाह आपल्या घराजवळ आणला.  एक दिवस आचार्य स्नानाला गंगेत उतरले असता मगरीने त्यांचा पाय पकडला.  तेव्हा आचार्यांनी आईला सांगितले,  आता मगर मला खाऊन टाकणार. तर तू मगरीच्या तावडीतून सोडवायला प्रार्थना कर.  आईच्या प्रार्थनेवरून ते मगरीच्या तावडीतून सुटले.  तेव्हा ते आईला म्हणाले, आता तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दे. तू माझी आठवण काढलीस की मी नक्की परत येईन व तुला भेटेन.  असे म्हणून ते कालडी सोडून निघून गेले.  त्या दिवशी कालडी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.  

गुरूंच्या शोधात प्रथम ते गोकर्ण महाबळेश्वरला आले. तिथे त्यांना विष्णू शर्मा नावाचा त्यांच्याबरोबर गुरुकुलात शिकत असलेला मित्र भेटला.  एके दिवशी एका संन्याशाने त्यांना सांगितले,  की ते ज्यांच्या शोधात आहेत ते “गुरुगोविंदयती” नर्मदा नदीच्या तीरावर,  ओंकार मांधाता येथे,  आश्रम स्थापून राहात आहेत.  गुरुगोविंदयती हे गौडपदाचार्यांचे शिष्य. गौडपदाचार्य पतंजलीचे शिष्य.  

आचार्य ओंकारेश्वरला गुरूंच्या गुहेत आले. गुरूंनी विचारले “ बाळा तू कोण?” आणि आचार्य उत्स्फूर्त उद्गारले …… 

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम्।

नचश्रोत्र जिव्हे, नच घ्राण नेत्रे।

नचव्योम भूमिर्नतेजो न वायुः।

चिदानंद रूप शिवोsहम् शिवोsहम्।।

 गुरु गोविंदयतींना,  बद्रिकाश्रमात, व्यासमुनींनी,  या शिष्याची कल्पना आधीच दिली होती… की पृथ्वीवरील शिवाचा अवतार तुझ्याकडे शिष्य म्हणून येईल.  ते त्यांची वाटच बघत होते. तीनच महिन्यात आचार्यांचा अभ्यास पाहून गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली, व या बाल बृहस्पति शिष्याला, ‘ शंकराचार्य ‘ म्हणून उद्घोषित केले.  तिथे शंकराचार्यांनी अत्यंत अवघड अशा ‘ विवेक चूडामणी ‘ नावाच्या  ग्रंथाची निर्मिती केली.  नर्मदामाई वाट पाहत होती की, या  शंकराचार्यांचे लक्ष आपल्याकडे कधी जाईल? 

एकदा खूप पाऊस आला.  मोठाच पूरही आला.  ही संधी साधून शंकराचार्य व त्यांचे गुरु ज्या गुफेत होते,  त्या गुफेत वरपर्यंत मैय्या प्रवेश करू लागली.  तेव्हा श्री शंकराचार्यांनी नर्मदा मैय्याची स्तुती करून, नर्मदाष्टक रचले व कमांडलूमध्ये मैय्याला बंदिस्त करून,  गुरूंच्या गुफेत येण्यापासून रोखले.  

नंतर बद्रिकाश्रमात गुरूंचे गुरु गौडपादाचार्य यांचे दर्शनास ते गुरुगोविंदयतींबरोबर गेले.  

त्यानंतर गुरूंनी त्यांना वाराणसी म्हणजेच, वारणा + असी या दोन नद्यांचा संगम,  त्यावर वसलेले वाराणसी येथे पाठवले. तेथे प्रस्थान त्रयीवर भाष्य करण्यास सांगितले. 

गणेश पंचरत्न स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, कालभैरवाष्टक इत्यादी अनेक स्तोत्रे, त्यांनी  रचली.

वाराणसीत आचार्यांची प्रवचने होऊ लागली.  प्रवचनाला भरपूर गर्दी होत असे.  आचार्यांचे शिष्यवैभव अपूर्व होते. एकदा एक वृद्ध भेटले. खूप प्रश्नोत्तरे झाली.  जेव्हा ते साक्षात विष्णू आहेत हे समजले,  तेव्हा आचार्य त्यांच्या पाया पडले.  तेव्हा श्रीविष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले. 

आचार्यांचे प्रस्थान- त्रयीवरचे भाष्य-लेखन पूर्ण झाल्यावर ते आपल्या शिष्यांसह गुरूंना भेटायला बद्रिकाश्रमात आले.  त्यांच्या या कर्तृत्वावर खूष होऊन,  आपल्या गुरूंच्या संमतीने,  गुरू गोविंदयतींनी आचार्यांना अद्वैत-वादाचा प्रसार करण्याचा आदेश दिला.

तिथून पुढे जात असता आचार्यांना साक्षात भगवान शिवांचे दर्शन झाले.  आचार्यांच्या प्रार्थनेवरून शिवांनी त्यांना अध्यात्म-संन्यास दिला.  त्याच क्षणी आचार्यांनी भगवान शिवांची मानसपूजा केली व रचली.  

एके दिवशी आचार्यांना समजले, की आपल्या मातेचा अंत जवळ आला आहे.  ती आपली आठवण काढत आहे.  ते कालडीला आले. आईच्या इच्छेनुसार आचार्यांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडवले. “विजयी भव” असा आशीर्वाद देत,  तृप्त नजरेने पुत्राकडे पहात असतानाच आर्यांबा अनंताकडे झेपावल्या व चैतन्य, चैतन्यात विलीन झाले.

आचार्य संन्यासी असल्याने गावातील वैदिक ब्राह्मणांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना विरोध केला.  पण आचार्यांनी आईला तसे वचन दिले होते.  त्यामुळे आईचे अंत्यसंस्कार करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.  सर्व मंडळी निघून गेली. आचार्यांचा शिष्य सुखाचार्य व आचार्य दोघेच राहिले. मध्ये काही वेळ गेल्यामुळे आईचा देह जड झाला होता.  तो एकट्यांना उचलणे शक्य नव्हते.  त्यांनी त्या देहाचे तीन तुकडे केले.  मृत्युंजयाचे स्मरण केले. आणि स्वतःच्या योगसामर्थ्याने त्या चितेला अग्नी दिला. आपल्याच हाताने मातेचे दहन केले.  

आईचे दिवस करण्यासाठी गावातील कोणी ब्राह्मण येईनात. त्याच वेळी तीन ब्राह्मण अतिथी म्हणून आले. आचार्यांचा वाडा रोज वेदघोषाने दणाणू लागला.  गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.

– क्रमशः भाग पहिला. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments