सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – २ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.) इथून पुढे —-

ज्या काशीमध्ये महर्षी व्यासांनी आचार्यांना आशीर्वाद दिला होता त्याच काशी पासून आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर प्रवचने सुरू केली.  ही प्रवचनें ऐकून , काशीच्या विद्वानांची  मने तृप्त होऊ लागली.  आचार्य, खूप सोप्या भाषेत, तसेच सामान्य मनुष्यालाही, सहज समजेल अशी भावपूर्ण स्तोत्रे रचू लागले.  आचार्यांनी वैदिक सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.  यात अआध्यात्मिक दृष्ट्या जीवन जगण्याचा मार्ग दाखवला होता. त्यात भक्ती मार्ग,  ज्ञानमार्ग, योग मार्ग इत्यादींचा समावेश होता.  

एक अतिवृद्ध,  जरा जर्जर  व्यक्ती,  पहाटेच्या वेळी ओट्यावर बसून डु व कृं असे क्षीण स्वरात उच्चारण करीत,  पाठ करीत होती.  आचार्यांना त्या वृद्धाची दया आली. क्षणाचाही विलंब न लावता आचार्यांनी,

भजगोविंदं भज गोविंदम

भज गोविंदम मूढमते – हे स्तोत्र रचले.

त्या वृद्धाला, तो, व्याकरणाचा पाठ थांबवायला लावला व हरिनामाचा गजर करण्याचा उपदेश दिला.

बाबा रे, हे .. तुझे व्याकरण पाठ करणे काही तुला सद्गती देणार नाही. तुझ्यावर आता मृत्यू केव्हा झडप घालील, हे माहिती नाही अशा प्रकारे झटून हा व्याकरण पाठ करण्याऐवजी, तू भगवन्- नामस्मरण कर. त्यामुळे तुला सद्गती तरी प्राप्त होईल.  

आनंदित होऊन त्याने आचार्यांना विचारले,  आपण केलेल्या उपदेशाच्या स्तोत्राचे नाव काय बरे?  

तेव्हा त्याच्या तोंडाचे बोळके झालेले पाहून,  आचार्य हसत हसत म्हणाले, चर्पटपंजरी चर्पट म्हणजे खमंग. पंजरी म्हणजे कुटून बारीक केलेले खाद्य. 

अशा प्रकारे, आचार्य, सामान्य मनुष्यांना भक्ती मार्ग दाखवत होते,  तर विद्वानांना ब्रह्मसूत्राच्या भाष्याने प्रभावित करून परमार्थी बनवत होते. वास्तविक पाहता हे स्तोत्र आपल्यालाही कसे लागू आहे याचा विचार करून आपणही गेयम गीता नाम सहस्त्रम हा आचार्यांचा उपदेश आचरणात आणलाच पाहिजे. 

प्रयागमध्ये,  त्याकाळी वैदिक परंपरेमध्ये अनेक पंथ निर्माण झाले होते. उदाहरणार्थ जैन, बौद्ध, मांत्रिक, तांत्रिक, कर्मठ, भैरव, शैव, वैष्णव इत्यादी.  त्या त्या पंथाच्या संस्थापकांनी घालून दिलेले तारतम्य लोप पावलेले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करताना सहिष्णुतेऐवजी कर्मठपणावरच भर दिला जात होता.  जो तो आपल्या पंथाचा अभिमान उराशी बाळगून इतर पंथांना, कनिष्ठ समजत होता. सहकाराची जागा द्वेष, मत्सर व स्वार्थ यांनी जी घेतली होती,  तेच आचार्यांना नाहिसे करायचे होते. आचार्यांनी  शिकवलेल्या धार्मिक सहिष्णुतेमुळे, समाजात एकजूट होऊ लागली. त्यामुळे जैन, बौद्ध, शैव व वैष्णव इत्यादी विविध पंथातील लोकांनी आचार्यांना आपले गुरु मानले.  कारण आचार्य आपले मत कोणावरही लादत नसत.  तर समोर असलेल्या व्यक्तीचे मत-परिवर्तन करीत असत.  घराघरातील वाद नष्ट होऊन एकोपा नांदावा म्हणून आचार्यांनी पंचायतन पूजेची संकल्पना,  भक्ति मार्गातील लोकांना सांगितली.  ती अत्यंत यशस्वी झाली. कारण त्यामुळे भ्रातृभाव वाढत गेला.  अद्वैत तत्त्वज्ञानातील  अति- सूक्ष्म तत्त्वे सुद्धा आचार्यांनी सुलभ पद्धतीने स्पष्ट केल्यामुळे ज्ञानमार्गाचे कट्टर पुरस्कर्ते सुद्धा, आचार्यांना सत्पुरुष मानत.  कारण त्यांच्या प्रवचनांमुळे त्यांना शांती मिळत असे.  केवळ नाम संकीर्तनाने अध्यात्म कसे साध्य होऊ शकते,  ते सामान्य माणसाला समजावून सांगू लागले.   त्यामुळे अगणित लोक त्यांची दीक्षा घेऊ लागले.  जैन व बौद्ध पंथातील लोक सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानू लागले.  जसे सोन्याचा कोणताही दागिना वितळवला की त्याचे निखळ सोनेच होते.  त्याप्रमाणे जीवाचे जीव-पण लोपले,  की,  तो भगवत स्वरूपच होतो.  त्यालाच अद्वैत म्हणतात.  आचार्यांची अशी शिकवण होती की,  आपले वेगळेपण विसरून भगवंतांशी एकरूप होणे म्हणजेच अद्वैत.  

आचार्यांची विजय पताका चारी दिशांना फडकू लागली. प्रभाकरा सारख्या  श्रीवल्ली येथील सुविख्यात मीमांसकानेही,  आचार्यांचे शिष्यत्व पत्करले.  त्यामुळे सर्वसामान्यच काय,  पण वेदांतीही आचार्यांकडे येऊन,  त्यांना आपले मोक्षगुरू मानून,  दीक्षा घेऊ लागले.  प्रयागच्या सर्व परिसरात आचार्यांचा जयघोष, आकाशात घुमू लागला.  घरोघरी आचार्यांच्या प्रतिमा स्थापन होऊन,  त्यांनी रचलेली विविध स्तोत्रे भक्ती भावाने गायली जाऊ लागली.  वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले.  अनेक बुद्धपंथीय,  वेद प्रमाण मानून,  आचार्य जे सांगतात ते प्रमाण मानू लागले.  

कौशांबी नावाच्या गावात आचार्यांनी मृत बालकाला जिवंत केले. देवीची स्तुती गायली,  त्यामुळे हे बालक जिवंत झाले. 

भट्टपाद नावाच्या, मंडन मिश्रांच्या गुरूंनी आचार्याने सांगितले की तू महिष्मती नगरीत जा. तिथे माझा मेव्हणा मंडन मिश्र आहे.  त्याला वादात हरवून घे.  म्हणजे तू सर्वत्र विजयी होशील व धर्म स्थापना होईल.  महिष्मती नगरीत मंडन मिश्रांचे खूप मोठे प्रस्थ होते.  त्यांच्या अनेक पाठशाळा होत्या. पोपटांचे असंख्य पिंजरे होते.  ते पोपट सदा तत्त्व चर्चा करायचे. आचार्य सर्व शिष्यांसहित मंडन मिश्रांचे घरासमोर आले. मंडन मिश्रांचे वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने  कोणालाही आत सोडायचे नाही अशी रक्षकांना आज्ञा होती. आचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना भिक्षाटनासाठी गावात पाठवून दिले. आचार्य स्वतः योग मार्गाने मंडन मिश्रांच्या घरात,  ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन बसले. मंडन मिश्रांना संन्याशांबद्दल राग असल्याने,  त्यांनी आचार्यांबरोबर खूप वाद घातला.  शेवटी आचार्यांनी त्यांना सांगितले, की तुमचे गुरु कुमारीलभट्टपाद यांचे सांगण्यावरून मी येथे आलो आहे.  ते आता या जगात नाहीत. ते ऐकून मंडन मिश्रांना फार वाईट वाटले. झाल्या गोष्टीबद्दल त्यांनी क्षमा मागितली. व चर्चा म्हणजेच वाद विवाद करण्याची तयारी दाखवली.  निर्णय, हा .. मंडन मिश्रांची पत्नी भारतीदेवी यांनी करावा असे ठरले.  भारती देवी अत्यंत विद्वान व वेदज्ञ होत्या.  धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषांच्या त्या अधिकारी होत्या.  पण वाद विवाद करण्यात प्रत्यक्ष आपला पती व दुसरीकडे मानसपुत्र शंकर आहे, त्यामुळे त्या स्तब्ध होत्या.  मंडन ने स्वतः अनुमती दिली व भारती देवींनी त्या पदाचा स्वीकार केला. वादविवाद ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भारती देवींनी दोन हार आणले.  दोघांच्या गळ्यात घातले.  ज्यांच्या गळ्यातील हार प्रथम सुकेल,  तो हरला असे समजावे असे ठरले.  एक, दोन, तीन, चार असे वीस दिवस सलग चर्चासत्र चालूच होते.  आचार्य बोलत होते.  मंडन मिश्रा हे ऐकता ऐकता अंतर्मुख झाले.  त्यांची जवळजवळ समाधीच लागली.  संपूर्ण शरीरभर, उष्णता निर्माण होऊ लागली.  शरीरातील पापांना तेथे राहणे असह्य होऊ लागले. श्वासाची उष्णता वाढून,   हळुहळू संपूर्ण माळ कोमेजू लागली.  मंडन एकदम शांत झाले. भारती देवी पुढे आल्या व म्हणाल्या की जरी माझ्या पतीची माळ कोमेजली असली,  तरी चर्चा मी पुढे चालवणार आहे. आचार्य जोपर्यंत माझ्या प्रश्नांना समर्थक उत्तर देणार नाहीत, तोपर्यंत माझे पती संन्यास घेणार नाहीत. भारती देवी म्हणाल्या की आचार्य,  या सर्व चर्चेत आपण फक्त तीनच पुरुषार्थ विचारात घेतले.  चौथा पुरुषार्थ काम राहिला आहे. मला याबाबत चर्चा करायची आहे.  आचार्य म्हणाले,  माते तू म्हणते तसेच घडेल.  मी नवव्या वर्षी संन्यास घेतला आहे.  त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन. 

– क्रमशः भाग दुसरा. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments