सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
“गप्प बैस गं, काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का..? तुला जी भाजी वाटते ती कर, मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर.
तशी आवंढा गिळून बळचं हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली. “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी,” असं कापऱ्या आवाजात म्हणाली…
सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता, त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्याजवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला, आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झालीय आपली.. हा, सगळे शानशोक बंद झाले, पण ते तसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते, मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे?’ म्हणत आई जरा रागावली त्याला…
तितक्यात त्याचा फोन वाजला, कामावरच्या राजूचा होता. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो, आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं. कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणूस होता, पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं, रक्ताची कारंजी उडाली होती आणि राजू त्या दिवसापासून कामावर नव्हता.….
राजूच्या बायकोने फतवाच काढला होता, लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती त्याची. खरंतर फार गरज होती त्याची कामावर. खूप विश्वासू होता तो.
‘बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल…’ असा विचार करत त्याला कॉलबॅक केला,.. “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”
तिकडून आवाज आला.. “सर, कामावर दोन दिवसात येईन पण आज मला थोडे पैसे पाहिजे होते, उद्या मदर्स डे आहे. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?
त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला.. “अरे राजा, तूझं डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट देतोस तू,..?”
राजू तिकडून म्हणाला, “हसू नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं. अगदी खाऊ सुद्धा घातलं, तिनं पाच पाच घरं जास्त भांडी घासायची कामं घेतली. माझ्या कमाईची तिनं भरपाई केली, मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही.
आता मी पूर्ण बरा झालोय सर.. आपल्या त्या साईटच काम मीच पूर्ण करीन. पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खूप फोटो काढायचं स्वप्न आहे तिचं….
माझ्या मित्राचं साड्यांचं घरगुती दुकान आहे, तो म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या,.. आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या.. साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”
गडबडत हा म्हणाला, “हो, तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली.. छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती.. कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एक दिवस ओरडलो होतो.. ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं, त्याकडे आपलं लक्ष पण नाही.
राजूसारखा माणुस त्याच्या बायकोची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो.. आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे.. आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय..
तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली, “डबा तयार आहे रे….”
निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं, आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी.”
आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही… म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी. आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे. आता कधी योग येतो की बिचारीला,….?”
साईटवर राजू वाटच बघत होता.. ह्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात.. मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो.”
सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला व आईला कॉटनची साडी घेतली.. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले.. “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”
दुसऱ्या दिवशी दोघींना सोफ्यावर बसवल्ं, औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला.. “हॅप्पी मदर्स डे, मला माहित आहे आई तुला ही पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही. मनात प्रेम तर असतंच, पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवला एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो ही आईसाठी आहे.. सेलिब्रेशन घरात तर करतोय..” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… तिला खूपच आवडला तो हिरवागार रंग.. आईचे तर डोळेच पाणावले, “अरे मला कशाला आणत बसलास ॰..?”
त्याने आईला जवळ घेतलं, “आई सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीय तर त्यासमोर ही तर छोटीशी भेट आहे.. पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईन मी तिला.. आणि तेही मदर्स डे ला.. कारण बघ ना, ती बायको असली तरी.. मला मुलासारखं समजून तर पटकन सावरून धरलंय तिने. आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई, ती त्याच्या बायकोतली आई असते…”
आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला…. “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे….”
तितक्यात राजूने व्हिडीओ कॉल केला “साहेब तुमचे आभार, आमची आई एकदम खूश आहे बघा..” ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती, आईने तिचं फोनवर कौतुक केलं.. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघून ती आणखीनच खुलली.
फोन ठेवला तर समोर.. ही पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी.. गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी..!
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
मो +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈