श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 188
☆
लागले सूर्यास येथे ग्रहण आहे ?
चंद्र करतो चक्क त्याचे हरण आहे ?
☆
पांढरे बगळे इथे आले चराया
देश म्हणजे एक मोठे कुरण आहे
☆
साखरेचा रोग आहे अन् तरीही ?
दाबुनी खातो फुकटचे पुरण आहे
☆
लाज वाटावी कशाला वाकण्याची
माय-बापाचेच धरले चरण आहे
☆
भासला नाहीच तोटा अश्रुचाही
दोन भुवयांच्याच खाली धरण आहे
☆
मार्ग भक्तीचाच आहे भावलेला
कृष्णवर्णी शाम त्याला शरण आहे
☆
भरजरी वस्त्रात गेली जिंदगी पण
शेवटाला फक्त मिळते कफण आहे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈